October 15, 2024
Home » Privacy Policy » विश्वरुपाकडे असे पाहावे…( एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

विश्वरुपाकडे असे पाहावे…( एकतरी ओवी अनुभवावी)

विश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

तरि मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । 

सैंध पसरिलीं आणि तोंडे । आतां ग्रासीन हें आघवें ।। 451 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – तर अरें, मी काळ आहें हें पक्के समज, मी जगाचा नाश करण्याकरितां मोठा होत आहे. माझी तोंडे चहुकडे पसरलेली आहेत व मी ( त्या तोंडांनी ) हे सर्व आतां गिळून टाकीन. 

दुष्टांच्या सहाराकरिता भगवंताचा अवतार होतो. मग हा भगवंत कोणाच्याही रुपात प्रकट होऊ शकतो. कारण तो सर्वांमध्ये आहे. विश्वरुप हे काही भिती दाखवण्यासाठी नाही. तर आपणाला जागे करण्यासाठी आहे. हे जाणून घ्यायला हवे. विश्वरुपाने दहशत निर्माण होत नाही तर जागृती येते. माणसाला त्याचे खरे स्वरुप समजावून सांगण्यासाठी विश्वरुप दर्शन आहे. सध्याच्या काळात म्हणाल, तर निसर्गाचा प्रकोप असेल किंवा एखादा महामारीसारखा आजार असेल. हे पूर्वीच्या काळीही होते. पण ही संकटे माणसाला भानावर आणण्यासाठी आहेत. माणसा माणसातील वाढत चाललेला दुरावा दूर करण्यासाठीही आहेत.

माणसात माणूसकी निर्माण करण्यासाठी आहेत. यादृष्टिने त्याकडे पाहायला हवे. आपण या संकटाकडे कसे पाहातो यावरही सर्व काही अवलंबून आहे. संकटाकडे सकारात्मकदृष्टिने पाहिल्यास त्यातील समस्या सहज सुटु शकतात. नकारात्मक दृष्टिने पाहिले तर समस्या वाढतच राहतात. आलेली संकटे झेलायला शिकले पाहिजे. हसत हसत त्यांना सामोरे जायला हवे. मनाला विचलित न होऊ देता त्यांचा सामना करायला हवा. विश्वरुपदर्शनाकडेही जसे आपण पाहातो तसेच या समस्यांकडे पाहायला हवे.

विश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल. सुख होऊ दे किंवा दुःख होऊ दे. दोन्ही गोष्टीने मन विचलित होता कामा नये. मनाची स्थिरता दोन्ही गोष्टीमध्ये सारखीच ठेवायला हवी. मनाचा समतोल साधता आल्यास आपली प्रगती होईल. अध्यात्मिक विकासात या गोष्टींना महत्त्व आहे. आपण काही करत नाही. हे माझ्यामुळे झाला हा आपला अहंकार आहे. मी याला मारले. त्याला मारले. या सर्व अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्यातील अहंकार जायला हवा. म्हणजेच आपल्यातील मी पणा जायला हवा. हा अहंकार, मीपणा, क्रोध गिळायला आपण शिकले पाहीजे. तो पचवायला आपण शिकले पाहीजे. हे आपण जर करू शकलो. आपण हा आपल्यात बदल घडवू शकलो, तर आपण निश्चितच प्रगती करू शकू. आत्मज्ञान प्राप्तीसाठी याची गरज आहे. 

Posted by Iye Marathichiye Nagari on Sunday, December 13, 2020

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading