March 29, 2024
grace of the self-knowledgeable saints is needed
Home » आत्मज्ञानी संतांचा अनुग्रह हवा
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानी संतांचा अनुग्रह हवा

नुसती भगवी वस्त्रे घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे संत झाले, असे म्हणता येत नाही. संत हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो, तर तो अंतरंगात डोकावणारा असायला हवा. मनकवडा असायला हवा. असे संतच योग्य मार्ग दाखवू शकतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापुनि घातले ।।२३०।। ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा

ओवीचा अर्थ – प्रभुंच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पाहा ! अर्जुनाचें पाहणें व न पाहणें हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले.

आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेमके काय करतात ? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असताे. सद्गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला, असे म्हटले जाते.

नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरुमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. गुरूविन कोण दाखवील वाट असे हे यासाठीच म्हटले गेले आहे ते यासाठीच. गुरूंच्या कृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे. सद्गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो; पण सध्याच्या युगात आत्मज्ञानी गुरू आहेत कोठे?

नुसती भगवी वस्त्रे घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे संत झाले, असे म्हणता येत नाही. संत हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो, तर तो अंतरंगात डोकावणारा असायला हवा. मनकवडा असायला हवा. असे संतच योग्य मार्ग दाखवू शकतात. अशा संतांचे मार्गदर्शन, अनुग्रह घ्यायचा असतो, पण आजकाल असे संत विरळ झाले आहेत. नव्या पिढीला यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेनासे झाले आहे. म्हणून साधना सोडायची नाही. कारण संत हे अमर आहेत.

त्यांची समाधीही अमर आहे. संजीवन आहे. ते भक्तांना मार्ग दाखवत राहतात. अशा संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्गुरू परंपरेचा मार्ग ते निश्चितच दाखवतील. खऱ्या सद्गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा. असे संतच योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. शिष्याला आत्मज्ञानी करू शकतात.

Related posts

लोकगीत – भेट

जास्वंदीच्या फुलाचे सरबत..!

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख संवाद कौशल्य धोरण राबवण्याची  गरज !

Leave a Comment