गाऱ्हाणं या कवितासंग्रहानंतरचा धनाजी धोंडीराम घोरपडे या मुख्यत्वाने खोल अभ्यासपूर्ण समीक्षा लिहिणाऱ्या कवीचा हा दुसरा कवितासंग्रह “जामिनावर सुटलेला काळा घोडा” या संग्रहात एकूण पंच्याऐंशी कविता आहेत.
प्रा. प्रतिभा सराफ
भ्र. ९८९२५३२७९५
व्यवस्थेचा काळाभोर मस्तवाल रेडा
त्यांच्याच घरी होतो गाभणा
त्याच्या प्रसूतीच्या भूकंपकळा
पसरताहेत आमच्या चुलीपर्यंत
जगण्याला जाताहेत न बुजणारे तडे
( रंडकी अवस्था पृष्ठ क्र.५०)
अशा कविता लिहिणाऱ्या धनाजी घोरपडे यांनी वर्तमानाची गरज ओळखून, आपल्या कवितेतून व्यवस्थेवर कोरडे ओढलेले आहेत आणि हेच त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले आहे की व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ चौथ्या खांबाची नसून, आज सर्व लिहित्या हातांनी मूळ विषयाला हात घालण्याचे धारिष्ट दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे.
मलपृष्ठावरचा अमक्या
तमक्याचा मजकूर घेऊन
वाढत नसते आतल्या आशयाची
उंची आणि खोली
( लेखणीचं टिकाव करावं पृष्ठ क्र.७२)
अशा शब्दात त्यांनी सपक लेखन करणाऱ्या कवी आणि लेखकावरही ताशेरे ओढले आहेत. नाविन्यपूर्ण प्रतिमा, तटस्थ आणि थेट अभिव्यक्ती वास्तववादी अनुभवकथन आत्मशोध घेताना वाचकांना जगण्याचे तीव्र भान देणारी कविता, राजकीय सामाजिक घडामोडी तसेच कर्मकांड धार्मिकता याविषयी जागृती निर्माण करणारी कविता, कविताशी सुसंगत असलेले संग्रहाचे समर्पक शीर्षक असे या संग्रहाच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. कवीची मूळं कवितेत खोलवर रुतलेली आहेत. याचे उदाहरण म्हणून काही ओळी
व्यक्तीस्वातंत्र्याचा सेल्युलर
खुल्या अर्थव्यवस्थेचा येरवडा
मानवमुक्तीचा चिरेबंदी तिहार
जगण्याच्या भोवती गुंफलेली बॅरिकेटची तटबंदी
( सर्वच काही पृष्ठ क्र.९७)
परंपराधिष्ठित व्यवस्थेला विरोध करण्याची ताकद या कवितांमध्ये निश्चितपणाने आहे. कमीत कमी शब्दांत पूर्णपणे व्यक्त होता येणे हाही कवितेचा गुण आहे. जो कवी घोरपडे यांच्या अनेक कवितांमधून दिसून येतो. उदा. एक पूर्ण कविता देत आहे.
इथल्या भारतीय भूप्रदेशात
विहिरी आणि पोरी
दोन्ही जातात चोरीला
व्यवस्था मात्र घेत राहते
पिढ्यांन पिढ्या कागदाचाच भोग
( भूप्रदेश पृष्ठ क्र.५९)
कवी म्हणून असलेली सर्जनशीलता, अस्वस्थता तसेच स्वतंत्र विचार प्रणालीचे द्योतक असलेल्या काही ओळी
मांत्रिकांने दिलेली
देव्हाऱ्यातली शीघ्र विवाह यंत्र
कुठल्या मुलीच्या कानात जाऊन
रात्री अपरात्री कुजबूजणार होकाराचे हुंदके फुटावेत म्हणून?
( हिरवा कंदील पृष्ठ क्र.६३)
या स्वातंत्र्याला आजही शिवता आल्या नाही हिंदू-मुस्लिम गल्ल्या
या स्वातंत्र्याला टोक नाही
दोरा ओवायला भोक नाही (चौथी नापास पृष्ठ क्र.५३)
“स्वागत झुलीबाहेरच्या उत्तराधुनिक काळ्या घोड्याचे” अशा यथायोग्य शीर्षकाने डॉ. आनंद पाटील- संकपाळ यांनी या संग्रहासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली आहे. तर सर्व सत्ता केंद्रामध्ये अधिक बळकट असलेल्या धार्मिक सत्तेलाही कवी आपल्या कवितेतून फैलावर घेतो. अशा अचूक शब्दांमध्ये ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांनी या संग्रहाची पाठराखण केली आहे. वैचारिक भूमिकेची साक्ष देणारा हा संग्रह, शीर्षकाच्या मूळ कवितेसहित वाचावा आणि संग्रही ठेवावा असा आहे.
कवितासंग्रह – जामिनावर सुटलेला काळा घोडा
कवी – धनाजी धोंडीराम घोरपडे
प्रकाशक – ललित पब्लिकेशन मुंबई
पृष्ठसंख्या –१३७
मूल्य – २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.