॥ ‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची ॥
प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या ‘रानमळ्याची वाट’ या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा, आरींग मिरिंग, मळ्याची माती, गाय आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या बालकविता खूप वाचनीय ठरल्या आहेत.
शंतनु वि. गौतम
कवी प्रा इंद्रजित भालेराव यांनी तमाम वाचक वर्गासाठी सलग हॅट्रिक करून टाकली आहे. अवघ्या मराठी बालसाहित्याच्या क्रिकेटमैदानावर तीन बालसाहित्य पुस्तके देऊन वैचारिक मंथन केले आहे. गाणे गोजिरवाणे (मुलांची लोकगीते), नातूऋतू आणि रानमळ्याची वाट ही बालकवितेची पुस्तके नुकतीच दाखल झाली आहेत. मुलांना तसेच थोर मंडळी यांना गावाकडे घेऊन जाणारे हे ‘रानमळ्याची वाट’ पुस्तक मनाचा ठाव घेणारे आहे. यात एकूण बावीस विविध बालकवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक कवितेसोबतची चित्रकार सरदार जाधव यांची चित्रे खूप काही सांगून जातात. हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे. यामुळे लहान लहान बालवाचकांचे ते लक्ष वेधून घेतात. ते घेण्यासाठी चित्रकार अन् कवी प्रा. इंद्रजित भालेराव हे यशस्वी झाले आहेत, असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
बालकवितेसोबत आकर्षक चित्रे असलीच पाहिजेत. त्याशिवाय पुस्तक वाचनीय वाटत नाही. इथे याचे तंतोतंत पालन केले आहे. मुलांना काय पाहिजे. कधी अन् कशी भाषा असावी, याचे भान यांनी पाळले आहे. ही खऱ्या अर्थाने कसरत असते. ती त्यांनी करून दाखवली. हे विशेष म्हणावे लागेल. मोराचे पाय,भाऊ हरपला,बाल मित्र या कविता दीर्घ आहेत. विविध झाडे, फुले, वेली, गावातील सुंदर मंदिर असे वर्णन करीत ही रानमळ्याची वाट आगळीवेगळी ओळख निर्माण करून देते.
वाट नव्हे
ही कुस मायेची
मातीच्या
काळया कायेची
ओढ मला घनदाट
रानमळ्याची वाट.
विशाल वडाचे झाड अन् त्याच्या फांद्या पारंब्या म्हणजे झोक्याची पर्वणीच असते मुलांसाठी. याच झाडाखाली बसून मस्त गार गार सावली या ठिकाणी कितीतरी मुकी जनावरे, माणसे आसरा घेतात. ज्येष्ठ नागरिक तर इथे वामकुक्षी घेतात.
पदराखाली गावच अख्खा
घेते ती मायेनं
प्रत्येकाच्या डोक्यावरती
रुवाळी छायेने.
प्रत्येकाला पाऊस खूप आवडतो. पाऊस म्हटले की, येरे येरे पावसा तुला देतो पैसा, हेही आठवते. याचीच ओळख येथे जाणवते. त्याचेच प्रतिबिंब इथे उमटलेले दिसते. पाऊस या कवितेत प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो. चातक पक्षी वाट बघत बसतो, तसेच पाऊस या कवितेत वाट पाहणारे आहेत. प्रत्येकाला एक आशा देणारा पाऊस कधी कधी येईल असे झालेले असते.
झाली आषाढाची वारी
कधी येईल पाऊस ?
दिंड्या परतल्या घरी
कधी येईल पाऊस.?
मोराचे पाय ही कविता तर विनोदी शैलीत झाली आहे. वेगळाच विषय अन् अनुभवसंपन्न कविता येथे रंगून जात आहे. मोर अन् साळुंकी यांच्यातील संवाद कसा रंगतदार ठरतो ते येथे व्यक्त होते.
केका मागून केका
मोर टाहो फोडतो
सुरू होतो पाऊस
तेव्हा मेघही रडतो.
पावसाची झड म्हणजे श्रावण महिना, हे सूत्र सगळ्यांना माहीत आहे. अशी झड एकदा लागली की पाठ सोडत नाही. आपल्याकडे मराठी भाषेत सुंदर प्रचलीत म्हण आहे. ती म्हणजे, ‘मघा तर मघा, वरतीच बघा नाही तर चुलीपशी हागा’ हा विनोदाचा भाग सोडला तर झड लागली की कुठेच जाता येत नाही. पण आईला आपल्या मुलाची काळजी वाटते. झड लागली आहे, तू बाहेर कुठ जाऊ नको, शांत गोधडी घेऊन झोपी जा. पायळू असल्याने वीजेचं कधी बोलवनं येईल हे सांगता येत नाही.
वीज तुला बोलावते
जन्म तुझा पायाळू
पदराखाली घेईल तुला
माय तुझी मायाळू
यासाठी बाहेर जाऊ नको अशी विनवणी करणारी प्रेमळ आई झड या कवितेत दिसून येते.
उगा बाहेर जाण्यासाठी
करू नको धडपड
तुझ्याकडे पाहून मला
खूप वाटते अवघड.
शेत अन् त्यातून जाण्यासाठी असलेली बैलगाडी, तीत बसून जाणे म्हणजे निसर्ग जवळून पाहण्याचे भाग्य मिळत असते, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. खालून गाडी पळत असली तरी डोक्यावर घनदाट झाडांची सावली आशीर्वाद रुपी जवळ असते.
वर झाडांनी
धरली छाया
जशी भाच्यावर
मामाची माया
पुढं आजोळ
लपलय झाडीत.
बहिण-भाऊ यांचे काही वेगळेच नातेसंबंध असतात. बहिण सासरी गेली की भाऊ मात्र मनातून खूप उदास झालेला असतो. सारखी बहिणीची आठवण काढत असतो. सासरी गेल्यावर भाऊ तिला भेटण्यासाठी घरी येतो. बहिणीला काय आनंद झालेला, तो कोणीच व्यक्त करू शकत नाही. गगनात मावेनासा असा आनंद असतो. मनाचे समज अन् गैरसमज निर्माण झाले की, असा प्रसंग ‘भाऊ हरपला’ या कवितेत व्यक्त होतो. आपल्याला पाहून बहिण आत गेली. पुन्हा आलीच नाही. पण बहिणाबाई मात्र लाडक्या भावासाठी गोड धोड करत आहे, याची खात्री भावाला नव्हती. तो तिची वाट पाहून शेवटी निघून गेला. पण बहिणबाई मात्र रडून घेत म्हणते.
सच्चा मनाचा
दिढा पाण्याचा
संसार करपला
भाऊ हरपला..
या सुंदर कवितेबरोबर मुलांना कोडं घालणारी, थोडे बुचकळ्यात पडणारी कविता आहे.
प्रत्येकाला बालमित्र असतात. आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे बालमित्र असतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कायम असतात. चॉकलेट खावे ते पण रेंगाळत रेंगाळत, तसे या सुंदर मनामनात आठवणी दडलेल्या असतात. याचे सार्थ वर्णन बालमित्र कवितेत आले आहे.
मित्र आठवेल तेव्हा
आता टोचेल ही उशी
रात्र जागवित मग
मीही बदलीन कुशी.
गावाकडची घरे किती लहान लहान असतात. पण प्रत्येकाच्या आठवणीत ती खूप मोठी असतात. एकदा का होईना पण जावसे वाटतेच गावाकडे. त्या आपल्या प्रेमळ जिव्हाळा, आपुलकी, माणुसकीने भरलेली घरे असतात. मनात घर करून राहिलेली असतात.
लहान त्या घरी आज
मला जावेसे वाटते
रांजणात डोकावून
पुन्हा पहावासे वाटते
काळाने या पुसलेल्या
धुळीतल्या पायखूणा
काळजात दिसतात
माझ्या मला पुन्हा पुन्हा..
गाय प्रत्येकाच्या घरा समोर येत असते.पण लहान मुलांना फार वेगळेच आकर्षण असते. द ई .. दई… हम्मा. आजोबा- आजी यांना या गाई दाखवण्यासाठी वेगळीच कसरत करावी लागते. मुलं या सुंदर गाय-वासरासोबत, कधी जवळ जाऊन बोलेल, याचा मेळ नसतो. कपिला गाय तिला गोग्रास आपल्या हाताने देणं म्हणजे वेगळाच आनंद असतो. अंगावरून हात फिरवतानाचा तो स्पर्श मुलांना वेगळाच आनंद देऊन जातो. याचे वर्णन ‘दारी आली कपिला’ मध्ये आहे.
पुढे निघून जाताना ती
पाहे मागे फिरून
दोन डोळे मायाळू
करुणेने भरून.
जशी गाय खूप प्रिय तसेच शेळीचे पिल्लू मुलांना खूप आवडते. प्राणिमात्रांवर दया करणारे हे प्रसंग असतात. तसेच ‘शेळीच पिल्लू’मध्ये आलेले आहे. कवी अन् कवितेची आठवण ओळख कशी असू शकते याचे उत्तम उदाहरण देणारी कविता म्हणजे ‘गावाकडचा कवी’ होय. या कवी मुळे आपल्या गावाची प्रतिष्ठा वाढलेली आहे. कीर्ती वाढली आहे.
माणस म्हणायची
शहाणी सुरती
कवीन वाढवली
गावाची कीर्ती.
गावातील शाळा अन् तेथील वातावरण म्हणजे एक प्रकारे निसर्गशाळा असते. ती जगण्याची प्रेरणा देते. याच शाळेतून बाहेर काय काय दिसते ? निसर्ग, झाडी, हिरवेगार डोंगर, शेत, निळे निळे आकाश याचे सुंदर वर्णन ‘खिडकीतून’ या कवितेत आलेले आहे.
शाळेच्या खिडकीतून दिसती
रानामधले थवे
शाळा सोडून मला वाटते
रानावनात जावे.
प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या ‘रानमळ्याची वाट’ या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा, आरींग मिरिंग, मळ्याची माती, गाय आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या बालकविता खूप वाचनीय ठरल्या आहेत. कोरोना काळातल्या लॉकडाऊनमध्ये यातील अनेक कविता समाजमाध्यमावर सादर करून लोकप्रिय केल्या त्या श्रावणी बरकुले या चिमुकलीस हा कविता संग्रह सप्रेम भेट दिलेला आहे. म्हणजे या कवितेची अर्पणपत्रिका कवीने तिच्या नावाने केलेली आहे.
प्रत्येकाच्या मनात वाचनसंस्कृतीची परंपरा निर्माण करणारी, कायम घर करून राहणारी आठवणीची शिदोरी म्हणजे ही ‘रानमळ्याची वाट’ बालकवितासंग्रह आहे.
पुस्तकाचे नाव – रानमळ्याची वाट.
कवी – प्रा इंद्रजित भालेराव
प्रकाशक – विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन
पृष्ठ – ३६, मूल्य – १६० रुपये.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.