July 20, 2024
Sayajirao Gayakwad and Sant Tukaram article by Dr Rajendra Magar
Home » सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’
संशोधन आणि तंत्रज्ञान

सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’

तुकाराम आणि सयाजीराव गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविस्तार धोरणामुळे गुजरातमध्ये मराठी साम्राज्याचा पाया रोवला गेला. पुढील सेनापतींनी त्यास अधिक बळ दिले आणि मुघल साम्राज्य गुजरातमधून नेस्तनाबूद केले. परिणामस्वरूप मराठा साम्राज्याची एक शाखा गुजरातमधील बडोदा येथे निर्माण झाली. युद्ध, लढाया आणि तहनाम्यानंतर गुजरातमधील मराठी साम्राज्याला ‘बडोदा’ राजधानी मिळाली. अनेक नृपतींनी राज्य केल्यावर इ.स. १८७५ मध्ये बडोदा राज्याला ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’(१८६३-१९३९) नावाचा राजा मिळाला. इतिहास विषय त्यांना आरंभापासून अत्यंत प्रिय होता. पुढे तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र विषय त्यांच्या आवडीचे झाले. ‘पाश्चात्य देशातील तुलनात्मक (comparative) व गुणदोषविवेचकबुद्धी (critical faculty) स्वीकारून त्यांनी भाषेचे व निरनिराळ्या विषयांचे अध्ययन केले. तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र या विषयांतील वाचनाने प्राविण्य मिळवले होते.

महाराजांनी जरी पाश्चात्य देशातील साहित्याचे वाचन केले असले, तरी त्यांची देशी साहित्यावर कमालीची श्रद्धा होती; पण ही श्रद्धा डोळस होती. प्रजेच्या सुधारणा करण्यासाठी वाचन हाच सर्वोत्तम पर्याय आहे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. आवश्यक नवीन ग्रंथांची माहिती जाणकार व्यक्तींकडून करून घेत.

अशा चौफेर वाचन असणाऱ्या विद्वान आणि प्रज्ञावंत वाचकांकडून संत तुकाराम महाराजांची (१६०९-१६५०) गाथा कशी काय सुटेल ? लवकरच त्यांच्या वाचनात ‘तुकाराम गाथा’ आली आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनली. त्यांनी परमार्थिक जीवनात सुख, शांती आणि भक्तीचा मार्ग अभंगातून शोधला. प्रापंचिक दुःखावर जालीम औषध म्हणून अभंगाकडे पाहिले. महाराजांचे चित्त उद्विग्न, दुःखी आणि संकटाची चिंता असेल, त्यावेळी तर हमखास तुकारामगाथा वाचत असत. याबद्दलच्या अनेक आठवणी महाराजांचे वाचक आणि पुढे रियासतकार म्हणून प्रसिद्ध झालेले गो.स. सरदेसाई यांनी लिहून ठेवल्या आहेत. प्रजेच्या सुधारणांसाठी धडपड असणाऱ्या राजाला एकामागून एक संकटाला सामोरे जावे लागले. एकीकडून कुटुंबात छोट्या-मोठ्या कुरबुरी होत्या, तरी दुसरीकडे इंग्रजांसारख्या महाभयंकर राक्षसाचा त्रास सुरूच होता. यामुळे त्यांना लवकरच निद्रानाश जडला. रात्र-रात्र झोप लागत नसे, अशावेळी रात्री-अपरात्री ते सरदेसाई यांना बोलवून घेत. त्यांच्याकडून तुकाराम गाथा वाचून घेत. अभंगावर चर्चा करत. यामुळे या वास्तववादी कवीविषयी त्यांच्या मनात आकर्षण, ममत्व आणि कुतूहल निर्माण झाले. संत तुकाराम महाराज त्यांचे आवडते कवी बनले.

तुकाराम गाथेचे प्रकाशन

सयाजीराव महाराजांनी तुकाराम गाथेचे वाचन सुरू केले, त्याकाळात अगदी बोटावर मोजण्याएवढ्या प्रकाशकांनी गाथा प्रकाशित केल्या होत्या. त्यामध्येसुद्धा दोन गाथा प्रचलित होत्या. एका गाथेत साडेचार हजार अभंग होते, तर दुसऱ्या गाथेत नऊ-दहा हजार अभंग होते. दोन्ही गाथेचे प्रकाशक आपलीच गाथा प्रमाण असल्याचा दावा करत असत. महाराजांनी गाथेचे एक-दोन वेळा वाचन केल्यावर त्यातील गोंधळ त्यांच्या लक्षात आले. साडे चारहजार अभंग असणाऱ्या गाथेत संत तुकारामांचे काही अभंग वगळले होते, तर नऊ-दहा हजार अभंग असणाऱ्या गाथेत तुकाराम महाराजांच्या शिष्यांचे आणि त्यांच्या भक्ती परंपरेतील इतर मंडळींचे अभंग समाविष्ट केलेले होते. थोडक्यात, पाठशुद्ध केलेली गाथा उपलब्ध नव्हती. महाराजांच्या ही बाब लक्षात येताच नवीन गाथा प्रकाशित करण्याचा संकल्प केला. हे काम ग्रंथसंपादक आणि प्रसारक मंडळीच्या दामोदर सावळाराम यंदे यांच्याकडे सोपवले. दामोदर यंदे इ.स. १८८५ पासून बडोद्यात वृत्तपत्र आणि ग्रंथ प्रकाशित करत होते.

सयाजीराव महाराजांसारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या राजाने गाथा प्रकाशित करण्याची सूचना केली म्हणजे त्याच श्रेष्ठतेची गाथा प्रकाशित केली पाहिजे याची कल्पना यंदेंना आली. त्यांनी लागलीच उपलब्ध गाथा जमा केल्या. त्यामध्ये इंदुप्रकाश वृत्तपत्राचे भूतपूर्व मालक विष्णूशास्त्री पंडित यांनी इ.स. १८६९ मध्ये सरकारच्या आश्रयाखाली ४,६४६ अभंगाची एक गाथा प्रकाशित केली होती. त्यामध्ये तळटीपा दिल्या होत्या. प्रस्तावनेत ‘यापेक्षा अधिक अभंग सापडत नाहीत’ अशी विशेष नोंद केली होती. थोडक्यात, उपलब्ध सर्व गाथांमध्ये अभ्यासकांच्या मते हीच गाथा सर्वोत्तम होती. हीच गाथा आधारभूत मानून यंदे यांनी तुकाराम गाथा प्रकाशित करण्याचे ठरवले. या गाथेमध्ये सुद्धा काही दोष होते.

अनेक अभंगांचा अनुक्रम चुकला होता आणि वर्णानुक्रमणिकेचा मेळ नव्हता. यामुळे गाथा दुरुस्त्या करून प्रकाशित करण्याचे ठरवले. नवीन गाथेतील विषयांचा आणि अभंगाचा अनुक्रम लावण्याचे काम बडोद्यातील कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका काशीबाई हेरलेकर आणि शिक्षक भास्कर सखाराम शास्त्री यांच्याकडे सोपवले. त्यांनी परिश्रम घेतले. अभंगाची वर्णानुक्रमणिका तयार केली. त्याचबरोबर शेवटी ‘गाथेतील कठीण शब्दांचा कोश’ जोडला. हे एक गाथेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वाचकांना अनोळखी शब्दांचा अर्थ पाहता येत असे. समजत असे. अशा प्रकारे महाराजांना अपेक्षित असणारी ‘तुकारामाची गाथा’ दोन भागात ग्रंथसंपादक आणि प्रसारक मंडळीच्या ग्रंथमालेअंतर्गत २६ वा ग्रंथ म्हणून इ.स. १९०३ मध्ये प्रकाशित केली. एकूण १,१३४ पृष्ठांची ही गाथा आजही आदर्श मानली जाते. तेथून पुढे ही गाथा महाराज कायम सोबत ठेवत असत. अगदी परदेश प्रवासातसुद्धा त्यांच्यासोबत हीच गाथा असे.

तुकाराम गाथेचा प्रभाव

सयाजीराव महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा विश्वास होता. ‘उच्च प्रतीची विद्वत्ता असूनही तुकाराम महाराज सर्वसामान्य जनतेशी समरस होत असत. सामान्य जनतेलाही त्यांच्याविषयी आपलेपणा वाटत असे. त्यांनी देशवासियांची व्यवहारबुद्धी जागृत केली. सूक्ष्मतेच्या बिकट जंगलातून व्यवहाराच्या धोपट मार्गावर आणून सोडले. मानवी सामर्थ्याची शक्यशक्यता व सौंदर्य आम्हाला पटवून दिले.’ अशी महाराजांची धारणा होती.

नियमित गाथा वाचनामुळे सयाजीराव महाराजांचे काही अभंग मुखोद्गत झाले. भाषण करताना तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि सुधारणांचा आवर्जून उल्लेख करत. इतिहासातील सुधारणांचे दाखले श्रोत्यांना देताना तुकाराम महाराजांचा उल्लेख करत. बडोदा येथे चौथी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद इ.स. १९१० मध्ये आयोजित केली होती. त्यावेळी शिवाजी महाराज आणि संतांच्या सुधारणा यावर बोलताना म्हणाले, ‘शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे. शिवाजी महाराजांपूर्वी या देशाची स्थिती कशी होती, कोणत्या कारणांनी उदयास आले, त्या कारणांचा विचार केला पाहिजे. युरोपमध्ये मार्टिन लुथरच्या वेळी धर्मसुधारणा ज्या कारणांनी व ज्या प्रयत्नांनी झाली, त्याचवेळी आणि त्याच कारणांनी आपल्याकडे तुकाराम महाराजांनी धर्मसुधारणा केली.’ संतांनी दाखवून दिलेल्या राजमार्गानुसार प्रत्येक व्यक्तीने नीती, अंतःकरण चांगले ठेवले पाहिजे. यामुळेच प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग होणार आहे आणि हे सर्व संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयात आहे. असे सयाजीराव महाराजांचे प्रांजळ मत होते.

प्रत्येक व्यक्तीच्या अंगी सेवाभाव असेल कोणतीही सुधारणा होण्यास विलंब लागणार नाही. याच अनुषंगाने महाराजांनी ‘सेवामहात्म्य’ विषयावर बडोद्यात उपस्थित जनसमुदायासमोर भाषण केले. यावेळी तुकाराम महाराजांच्या अभंगातील सेवा, समर्पण वृत्ती आणि त्यातून प्रगती याविषयी दोन अभंगाचे दाखले दिले. कामाशी एकरूप होण्यानेच म्हणजे कामाची अत्यंत आवड मनात उत्पन्न झाल्यानेच कामाचे महत्त्व ध्यानात येते. काम चांगले होण्यासाठी प्रत्येकाला त्याचा ध्यास लागला पाहिजे. त्यानुसारच त्या कार्याचा यशस्वीपणा ठरत असतो. याचे उदाहरण देताना महाराजांनी
उत्कंठीत होणे मन ।
तेचि खूण सेवकाची ॥
या अभंगाचा दाखला दिला. तर सेवाधर्म व्यवस्थित संभाळला तर भक्तीचीदेखील आवश्यकता राहत नाही याचे उदाहरण देताना
तुका म्हणे फळ आहे सेवेपाशी ।
शरण देवाशी जाणे नलगे ॥
हा अभंग उद्धृत केला.

संत तुकाराम महाराज श्रेष्ठ कवी आहेत, ते जनसामान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या अभंगात आणि काव्यात समाजातील न्यूनतम पायरीवरील व्यक्तींचा विचार केला आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळेच तुकाराम महाराजांच्या अभंगाविषयी २७ डिसेंबर १९३२ रोजी कोल्हापूर येथील सतराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘तुकारामबुवांची कविता, भावनाप्रधान, स्वतंत्र विचार प्रदर्शित करणारी, अनुभवाचे बोल काढणारी, लोकस्वभावास पक्की निरखणारी व लोकांच्या साध्या प्रचलित भाषेमध्ये जिव्हाळ्याने लिहिली असल्यामुळे मनास पटणारी अशी आहे. ‘Spontaneous overflow of powerful feeling.’ प्रबळ भावनांचा सहजोद्रोक, ही वर्डसवर्थची कवितेची व्याख्या तुकोबांच्या कवितेस तंतोतंत लागू पडते.’ तुकाराम महाराजांच्या कवितेचे महत्त्व सयाजीराव महाराजांनी अशा प्रकारे प्रथमच लोकांना विदित केले.

सयाजीराव महाराजांच्या मते गाथेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाथेचे वाचन, मनन केल्यावर आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारता येते. म्हणून स्वतःचे, देशाचे भवितव्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थी, राजकारणी, विविध क्षेत्रात कार्य करणारांना गाथा प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराज लोककवी म्हणून, जनसामान्यांना भक्तीचा सुगम मार्ग दाखवणारे, वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा निर्माण करणारे आणि सतराव्या शतकामध्ये प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत, समाजातील दांभिकतेवर रोखठोक प्रहार करणारे वास्तववादी कवी म्हणून त्यांना संत तुकाराम महाराज आदर्श तत्त्ववेत्ता वाटत होते.

डॉ. राजेंद्र मगर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी

रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग

नवदुर्गाः धर्मांचा अभ्यास करून सुधारणांसाठी जनजागरण करणाऱ्या रझिया सुलताना

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading