November 13, 2024
Book review of Jivanachi kaiphiyat Balasaheb labade
Home » सर्वसामान्य माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी जीवनाची कैफियत
मुक्त संवाद

सर्वसामान्य माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी जीवनाची कैफियत

फक्त गाण्याची आवड नाही तर उत्तम गायक असलेल्या डॉ. बाळासाहेब लबडे हे कवितांच्या सोबतीने गझलरचनांकडे वळले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मुळातच शब्द- लय- स्वर हे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहे. त्यांचे ‘महाद्वार’ आणि ‘मुंबई.. बंबई.. बॉम्बे’ हे संग्रह मी वाचलेले आहेत. या पार्श्वभूमीवर “जीवनाची कैफियत” हा गझलसंग्रह वाचताना जाणवले की या दोन संग्रहांपेक्षा खूप वेगळ्या ट्रॅकवर लबडे यांनी आपल्याला नेले आहे.

प्रा. प्रतिभा सराफ

87 गझला या संग्रहात आहेत याचा अर्थ अनेक वर्ष ते गझल लिहीत आहेत. डाॅ. लबडे यांनी योजलेल्या वृत्तांमध्ये विविधता आहे तसेच बहारदार लयीचा प्रत्ययही त्यांची गझल देते. अशी ही त्यांची गझल कोणत्याही प्रवाहापासून मुक्त आहे. असे गौरवोद्गार आद्य मराठी गझल संशोधक आणि ज्येष्ठ गजलकार प्राचार्य अविनाश सांगोलेकर यांनी ‘एक कैफियत’ साठी काढले आहेत, याचा प्रत्यय आपल्याला संग्रहातून येतोच!

गझलच व्याकरण आणि तंत्र कोणत्याही कवीला सहज आत्मसात करता येते परंतु ‘गझलियत’ करता येत नाही. ती ज्याला जमते तो उत्कृष्ट गझल लिहू शकतो. हे तंत्र डाॅ. लबडे यांना जमले आहे असे आपल्याला अनेक रचनांमधून दिसून येते.

आत दिसलीस तू गायली प्रार्थना

मानले देव मी ना तुला गाळले

(गझल: मी तुला पाहता)

ही गझल तरन्नुममध्ये पेश करताना मी डॉ. लबडे यांना ऐकले आहे. आपल्या गझलेतील भावनेशी तादात्म्य पावून जगाचा विसर झाल्याचे मी अनुभवले आहे. त्यामुळे गझलरचना निर्मितीच्या वेळेसही हीच अनुभूती त्यांनाही आली असेल! सुफी काव्याचा प्रभावही आपल्याला त्यांच्या गझलेत जाणवतो.

भोगल्या वेदना जाळल्या पाहिजे

वेदनेच्या कळ्या माळल्या पाहिजे

(गझल: पाहिजे)

प्रत्येक माणसाचे आयुष्य हे अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामुळे जेव्हा डॉ. लबडे लिहितात की ‘भोगल्या वेदना जाळल्या पाहिजे’ ही गोष्ट खरी आहे/ ठीक आहे परंतु ते जेव्हा पुढची ओळ लिहितात की ‘वेदनेच्या कळ्या माळल्या पाहिजे’ तेव्हा त्या शेरातील गझलियत आपल्याला ‘वाह’ म्हणायला भाग पाडते.

पेटली ओली लाकडे आता

माणसे झाली माकडे आता

तो पुढारी हो देव त्यांचाही

साजरे होती काकडे आता

(गझल: लाकडे आता)

जगभरात जे राजकारण चालू आहे. त्यावर उत्तमरीत्या चपराक मारलेली आहे. जिथे शिते तिथे भुते ही म्हण मात्र इथे आपल्याला आठवून जाते. राजकारणावरील अनेक शेर डॉ. लबडे यांनी लिहिले आहेत-

रोज आम्हास कापण्या घाई

लोकशाहीत हीच नवलाई

(गझल: नवलाई)

किंवा

स्वार्थात इतका बुडला असा की

उरला नसे माणसांच्याच गावा

(गझल: कावा)

किंवा

आश्वासन हे धावत येते लाटेवाणी

लाटेखाली सरते वाळू झुरळे झुरळे

(गझल: झुरळे)

‘झुरळे’ हा वेगळा काफिया वापरलेला आहे. ज्याला आपण किळसवाणे मानतो, आपल्यापासून दूर लोटतो अशा झुरळाला घेऊन रचलेले सगळे शेर उत्तम आहेत.

अजूनही कितीतरी उदाहरणे देता येतील.

आपण समाजाचा एक भाग असतो. या समाजात आपल्याला दिसणारी असंगती, विरोधाभास सामाजिक आशयाच्या गजलेतून डॉ. लबडे यांनी मांडले आहे. डाॅ. लबडे मोठ्या प्रमाणात सामाजिक गझला लिहिलेल्या आहेत.

कर लादता सांगा किती मोजून हा

आता जराशे व्याज ते मरणात बघ

(गझल: सारी मजा)

किंवा

टाळले धर्म सारे माझिया आतड्यांचे

ह्या भुकेचे तरी कोंडावळे पाहिले मी

(गझल: पाहिले मी)

या गझलमधील ‘भुकेचे कोंडावळे’, तसेच इतर गझल मधील ‘गोवऱ्या दुःखाच्या’, ‘जीवनाला लावू काजळ’, ‘एसीमधल्या पायांना’, ‘भुईच्या जावळांना’, ‘पोटामध्ये चांदोमामा’, ‘ रंजलेल्या कातडीचा कोट’ यासारखे कित्येक नाविन्यपूर्ण शब्द कित्येक कल्पना ज्या सहसा गझलेमध्ये सहसा आढळत नाहीत त्या उत्तमरीत्या गजलेच्या मात्रेत बसवलेल्या आढळतात.

मराठीचे प्राध्यापक आणि पीएचडीचे मार्गदर्शक असलेल्या डॉ. लबडे यांनी मोठ्या प्रमाणात गद्य साहित्यात योगदान दिलेले आहे त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत या पार्श्वभूमीवर त्यानी लिरिकल रचना लिहिण्याची संवेदनशीलता टिकवून ठेवली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. माणसाच्या प्रगतीचा चढता आलेख हा इतरांना नेहमीच त्रासदायक होतो. एक लेखक म्हणून त्यांनी लिहिलेल्या शेर हा नक्कीच दादलेवा आहे-

काय बदनामी रकाने केवढे

अलीकडे झाले सुरू माझे सदर

(गझल: नजर)

जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या गझला आहेत. यातील मला आवडलेली एक गझल म्हणजे ‘बायका.’ डॉ. लबडे यांच्या निरीक्षणशक्तीला दादच द्यावी लागेल!

आपलेच प्रश्न प्रश्न मांडतात बोलक्या

नेमकीच नस तशीच दाबतात बायका

(गझल: बायका)

काही वैचारिक शेर या संग्रहात आढळतात-

तो तुका तेव्हा कसा गेला विमानी?

कालची सारी कथाही दंत नाही

(गझल: शाश्वती)

प्रत्येक काव्यप्रकार सफाईदारपणे हाताळणे आणि त्याला कसदार आशयाने व्यक्त करणे, तसे एक आव्हान असते. आपण सतत काही ना काही शिकत असतो. गझल हा तर मोठा आवाका असलेला कवितेचा छंद आहे. अशा शब्दात बाळासाहेब लबडे यांनी आपले मनोगत मांडले आहे तर लबडेसरांचं मन कलासक्त आहे. त्यांच्या गझलेची भाषा, आशय, सामान्य, सर्वसामान्य माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी आहे. अशा शब्दात ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांनी या गझलसंग्रहाचे भरभरून कौतुक केले आहे.

संतोष घोंगडे यांनी समर्पक मुखपृष्ठ रेखाटले आहे. पु. ल. देशपांडे यांनी गझलची व्याख्या केली आहे. गझल ही केव्हा वृत्त नसून वृत्ती असते आणि तिच्यात सूक्ष्म व सुंदर निवृत्ती असते! डॉ. लबडे यांच्या कितीतरी शेरातून आपल्याला ही व्याख्या पडताळून पाहता येते! डाॅ. लबडे यांचा हा पहिलाच गझलसंग्रह वाचकांना भावेल, अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देते!

पुस्तकाचे नाव – एक कैफियत
लेखक – डॉ बाळासाहेब लबडे
प्रकाशक – महाजन पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे: 104, मूल्य: दोनशे दहा रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading