जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी३
प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा हे चळवळीतील मोठे नाव. परंतु यांची कन्या असा कोठेही ओळख व मोठेपणाचा आव न आणता सामान्यात मिसळून समाजात विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व महिलाविषयक उपक्रम राबवून स्वतःची ओळख व स्थान निर्माण केलेल्या ॲड. आरती सोनग्रा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
मो. 9823627244
पुणे शहरातील पूर्व भागातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण, नागरी समस्या अशा विविध क्षेत्रात सतत सक्रिय असणाऱ्या आरती सोनग्रा. विमाननगर ही त्यांची कर्मभूमीच म्हणावी लागेल. या भागात आरतीताईंचे नाव ऐकले नाही असे कोणी सापडणार नाही. अत्यंत लाघवी, हसतमुख, नम्र स्वभावाच्या आरतीताई आर. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व सक्षमीकरण यासाठी कार्यरत राहून महिलांना स्वावलंबी बनवत आहेत. काही माणसं कामामुळे आवडतात तर काही त्यांच्या व्यक्तिमत्व व सौंदर्यामुळे. पण आरतीताई यांच्याकडे सौंदर्य व कर्तृत्वाचा मिलाप आहे.
त्यांचे शालेय शिक्षण हुजुरपागा शाळेत, महाविद्यालयीन शिक्षण मुलुंड येथे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. वकीलीचे शिक्षण घेऊनही वकीलीचा व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कामाचा वसा घेतला.
आर. के .सोनग्रा फाऊंडेशनची स्थापना करून त्या गेली १७ वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून विद्यार्थी दत्तक योजना, शिक्षणाचा प्रवाह गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी आचार्य रतनलाल सोनग्रा आश्रम शाळा नागपूर, पुण्यातील गरजू शाळांसाठी इ-लर्निंग स्कूल सुविधा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सभा धीटपणा वाढावा यासाठी शाळांमधून किलबिल कट्टयाची निर्मिती, विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यार्थी पुरस्कार, विद्यार्थी पालक समुपदेशन कार्यशाळा, किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा, दर ३ वर्षाला एक मुलगी दत्तक घेऊन तिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि लग्न करून देण्याची जबाबदारी, एका मुलीचे लग्न डिसेंबर २२ मधे करून दिले.
आपला परिवार अनाथ वृद्धाश्रमाला जागा घेऊन दिली. अशा विविध उपक्रमातून आर. के. सोनग्रा फाऊंडेशन राज्यभर काम करत आहे. विशेष म्हणजे हे सारे काम त्या वैयक्तिक खर्चातून करतात.
पूर्व पुण्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी न्यू नगररोड सिटीझन फोरमची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद स्वीकारून रस्ते, लाईट, पाणी या नागरी सुविधा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आवाज उठवण्याचे काम ताई करतात. संक्रांतीला पतंग उडवताना चिनी नायलॅानच्या मांजाने एका तरूणीचा गळा काही वर्षांपूर्वी चिरला व ती मृत्यूमुखी पडली. या वेदनादायी घटनेने सुन्न होऊन आरतीताईंनी चिनी मांजा वापरू नये ही चळवळ सुरु केली व ती शाळांपर्यंत पोहोचवली.
व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, मनोरुग्णालय विश्रांतवाडी येथे रक्षाबंधन व विविध वस्तूंचे वाटप, पुण्यात राजकीय मंडळींच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे देण्यासाठी पहिला विरोध हा आरतीताईंनी केला. त्यामुळे त्यांना राजकीय मंडळींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. पण महापालिका प्रशासनाने अशी नावे न देण्याचा निर्णय घेतला. पथारी व्यावसायिकांना हक्काची जागा मिळावी. त्यांच्यावर नियमबाह्य कारवाई होऊ नये यासाठी आंदोलन करत उपोषणही त्यांनी केले. पूर्व पुण्यात अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवून पोलिस प्रशासनाला जाबही त्यांनी विचारला होता.
महिलांवरील लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केलेल्या निर्भय विद्यार्थी अभियानात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विविध नागरी समस्या पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनापुढे मांडायला ताई कायम आग्रही असतात. साहित्य व साहित्यिकांना मानसन्मान, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न, पुण्यातील पूर्व भागात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे, नेत्रदान शिबीरे, आरोग्य शिबीरे हे सातत्याने सुरु असते. विविध शाळांसोबत ताई शैक्षणिक उपक्रम राबवतात. ॲस्कॅापच्या माध्यमातून विमाननगर भागातील ज्येष्ठ नागरिकांचे संघटन करून त्यांनी त्यांचे पालकत्व घेतले आहे. आरतीताईंच्या कामांची यादी ही न संपणारी आहे.
एक महिला काय करू शकते ? तर खूप काही करू शकते हे आरतीताईंच्या कामाचा झपाटा पाहाता लक्षात आल्यावाचून रहात नाही. अनेक महिलांना चाळीशीनंतर काय करावे ही प्रश्न पडतो. पण अशा अनेक महिलांचे काम पहाता आपण नेमके काय करू शकतो हे समजू शकेल. ‘करणाराला खूप काम आहे व न करणाराला काहीच नाही’ हेच खरं..!
प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा हे चळवळीतील मोठे नाव. परंतु यांची कन्या असा कोठेही ओळख व मोठेपणाचा आव न आणता सामान्यात मिसळून समाजात विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व महिलाविषयक उपक्रम राबवून स्वतःची ओळख व स्थान निर्माण केलेल्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
आरती सोनग्रा – मो. 99601 23451
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.