September 17, 2024
Surrender to the recognition of spiritual nature
Home » स्वरुपाची ओळख होण्यासाठीच समर्पण
विश्वाचे आर्त

स्वरुपाची ओळख होण्यासाठीच समर्पण

तया अहं वाचा चित्त आंग । देऊनियां शरण रिग ।
महोदधी कां गांग । रिगालें जैसें ।। १३१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – गंगेचे पाणी जसें महासागराला सर्वांगानी मिळते, त्याप्रमाणें अहंकार, वाचा, चित्त व शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा.

महासागराच्या पाण्याची वाफ होते. या वाफेला थंड हवा लागल्यानंतर त्याचे ढग तयार होतात. हे ढग भूभागावर बरसतात. ते पाणी खारट नसून शुद्ध असते. या पाण्यावरच मानवी जीवन समृद्ध होत आहे. अनेक जीवांनाही या पाण्यामुळे जीवन मिळते. पाण्याशिवाय सजिव सृष्टीच अस्तित्वात येत नाही. यासाठी पावसाच्या पाण्याचे महत्त्व विचारात घ्यायला हवे. कृत्रिम पद्धतीने शुद्ध पाणी आपण तयार करू शकू पण पावसाचे नैसर्गिक शुद्ध पाणी आपणास समृद्धी मिळवून देते. यातील काही पाणी नदीवाटे समुद्राला मिळते. म्हणजेच जेथून आले त्यातच पुन्हा जाऊन ते मिळते. निसर्गाचा हा नियम विचारात घ्यायला हवा.

सूर्यापासूनच हे विश्व अस्तित्वात आले. त्याच्याच भोवती हे सर्व ग्रह-तारे फिरत आहेत. पण विचार केला तर आपण किती लहान आहोत. या विश्वात आपण किड्या-मुंग्या प्रमाणे एक साधे जीव आहोत. विश्वाला अंत नसणारी ही पोकळी, आकाश, पाताळ हे आहे तरी काय याचा विचार आपण कधी केला आहे का ? हा विचार जेंव्हा आपण करू लागतो तेंव्हा आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. या विश्वातील एक छोटेसे पात्र आपण आहोत. हे माझे, हे माझे म्हणून आपण इतके का अस्वस्थ होत आहोत. कारण जे आपले नाही त्याला आपण आपले आपले करून त्रास करून का घेत आहोत. यासाठीच जीवनाचा अभ्यास हा करायला हवा.

आपला जन्म कशासाठी झाला आहे याचा विचार करायला हवा. एक मानव म्हणून आपण या पृथ्वीतलावर आलो. आपल्या आई-वडीलांना आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी आपणास एक नाव दिले. वारसा समजावा यासाठी आडनाव दिले. ही आपली खरी ओळख आहे का ? जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊन जीवन जगायला हवे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य वाटत नाही. कारण जगण्यासाठी आवश्यक असणारा अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. बदलत्या काळानुसार आपणास बदलत राहावे लागते तरच आपण तग धरू शकतो अन्यथा आपला विनाश हा ठरलेला आहे. यासाठीच येणाऱ्या परिस्थितीचा सामना करत, स्विकार करत आपण आपले ध्येय गाठणे आवश्यक आहे.

मी कोण आहे याचा विचार जेंव्हा करायला लागू तेंव्हा त्याची खरी ओळख पटल्यानंतर आपल्यातील अहंकार हा निश्चितच नष्ट होतो. हा अहंकार गेला तरच आपणास आपली खरी ओळख होईल. मी आत्मा आहे हे जेंव्हा समजेल तेंव्हाच सर्व गोष्टींचा उलघडा होईल. तो शरीरात आल्यानेच तो जन्म, मरणाच्या फेऱ्यात गुंतल्याचा भास होतो. यासाठीच हा अहंकार ईश्वराला अर्पण करून आत्मज्ञानी व्हायला हवे. श्वास अर्थात सोहम ची वाचेने साधना करायला हवी. चित्त यामध्ये गुंतवायला हवे. शरीर आणि आत्मा हा वेगळा आहे याची जाणीव करून घेऊन तन, मनाने सोहमची साधना करायला हवी. हे सर्व ईश्वराला अर्पण करायला हवे. जे आपले नाही ते आपले आहे असे समजून जो आपण त्रास करून घेत आहोत तो सोडायला हवा अर्थात तो ईश्वराला अर्पण करायला हवा. म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरुपाची ओळख आपणास होईल अन् त्यात रममान होता येईल. स्वरुपात रममान होऊन आत्मज्ञानी होण्यासाठीच ईश्वरापुढे शरण जायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

व्हीगन फुड म्हणजे काय ?

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading