March 23, 2023
Know yourself article by rajendra ghorpade
Home » स्वःचा विसर हे अज्ञानाचे रुप
विश्वाचे आर्त

स्वःचा विसर हे अज्ञानाचे रुप

मुळात मानव जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते. मी कोण आहे ? याची ओळख लहानवयातच झाल्यास जीवनात अध्यात्मिक प्रगती निश्चितच होऊ शकेल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आपुला आपणपेयां । विसरू जो धनंजया ।
तेचि रुप यया । अज्ञानासी ।। 71 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, आपण आपल्याला जो विसर पडतो तेंच या अज्ञानाचे रुप आहे.

स्वः ची म्हणजेच स्वतःची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म. स्वः च्या ज्ञानातूनच आध्यात्मिक प्रगती होत असते. स्वतःची ओळख स्वतःला व्हायला हवी. म्हणजेच मी कोण आहे ? याचा बोध व्हायला हवा. याची अनुभुती यायला हवी. स्वतःच स्वतःला विसरलो म्हणजे आपलेच आपल्याला ज्ञान राहीले नाही, तर आपण निश्चितच अज्ञानी राहू.

मीपणाचा विसर आणि स्वतःचा विसर यामध्ये फरक आहे. मी माझे ऐसी आठवण म्हणजे हे मी केले. हे माझ्यामुळे झाले. हा जो अहंकार आहे. या मीपणाचा विसर म्हणजे अहंकाराचा विसर असे आहे. मीपणा गेल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही. अन् स्वःचा विसर म्हणजे स्वतः कोण आहे याचा विसर. स्वतःचीच ओळख स्वतःला नसेल तर कसे होईल ?

उतारवयात मनुष्याला बऱ्याचदा स्मृतिभ्रंश होतो. कोणताही आजार नसला. तब्बेत ठिकठाक असली तरी भेटायला येणारी माणसे तो ओळखू शकत नाही. इतकी त्या वयस्कर व्यक्तीची स्मृती कमजोर झालेली असते. अगदी जवळची व्यक्ती जरी भेटायला आली तरी त्यांना कोण आहे हे समजत नाही. काही काही वेळेला तर आपण कोण आहोत याचेही ज्ञान त्यांना होत नाही. यात्रेत बऱ्याचदा वयोवृद्ध अशामुळेच चुकलेले पाहायला मिळतात. कधी कधी घराच्या जवळ फिरत असताना सुद्धा हे घर आपले आहे हेच त्यांना आठवत नाही. असा हा विचित्र आजार उतारवयात पाहायला मिळतो. यासाठी उतारवयात अध्यात्माची संगत केलेली कधीही फायदेशीर ठरते.

अध्यात्म हे उतारवयात शिकण्याची गोष्ट आहे किंवा निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा म्हणून अध्यात्माची संगत असा एक ट्रेंन्ड सध्या पाहायला मिळतो. अध्यात्म कोणत्याही वयात शिकले तरी ते फायदेशीरच ठरते. निवृत्तीनंतर उतारवयात याची गरज अधिक असते हे तितकेच खरे आहे. कारण या वयातच स्मृतीभ्रंशाचा आजार जडतो. यासाठी स्वतःच्या मनावर स्वतःचा ताबा असणे किंवा ठेवणे हे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यातून अनेक आजारावर मात करता येऊ शकते. यासाठी अध्यात्माचा विचार उतार वयात जरूर करायला हवा. पण या अध्यात्माची ओळख तारुण्यात झाली किंवा लहानपणीच झाली तर अधिक विकास होईल हे विचारात घायला हवे.

तसे पाहाता अध्यात्म शिकण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी वयाची काहीच अट नाही. कोणत्याही वयात हा मार्ग आपण स्विकारू शकतो. मुळात मानव जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते. मी कोण आहे ? याची ओळख लहानवयातच झाल्यास जीवनात अध्यात्मिक प्रगती निश्चितच होऊ शकेल. स्वःची ओळख करून घेणे गरजेचे आहे. स्वःचा विसर हे अज्ञानाचे लक्षण आहे. हे जाणून घेऊन ज्ञानी होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.

मी कोण आहे हे स्वतःच स्वतःने शोधायला हवे. म्हणजेच जीवनाचा खरा अर्थ आपणाला समजू शकेल अन् तो आत्मसात करता येऊ शकेल. यासाठी मानव जन्म आहे हे लक्षात घ्यायला हवे. पण हा स्वधर्मच आपण विसरलो आहोत. म्हणून हे अज्ञान दूर करून स्वज्ञानी होण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे. 

Related posts

सण, उत्सवात हवी योग्य आध्यात्मिक बैठक

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ?

मी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार

Leave a Comment