साधनेसाठी मन समाधानी राहणे आवश्यक आहे. संतांच्या शिकवणीतून समाधान टिकवून कसे ठेवता येते, याचा विचार करायला हवा. यातून सात्त्विक विचारांची बैठक उभी राहू शकते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
परोपकारू न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।
न शके विकूं जोडले । स्फीतीसाठी ।। २०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करीत नाही, आपण जो काही वेदशास्त्र वैगरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळविलेले पुण्य विकण्यास धजत नाही.
प्रत्येकाला स्वतःची प्रगती व्हावी, ही मनोमन इच्छा असते. प्रगती झाली तर त्याचा नावलौकिक वाढतो. पत वाढते. समाजात मान मिळतो, पण स्वतःच्या प्रगतीचा डांगोरा पिटणे योग्य नाही. दुसऱ्याला यातून चिडविणे योग्य नाही. दुसऱ्याची यातून निंदानालस्ती होईल, असे करणेही योग्य नाही. झालेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त करणे, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येणे शक्य आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. प्रगतीतून समाधान मिळते. शांती मिळते. ते समाधान, ती शांती कायमस्वरूपी टिकवून कशी ठेवता येईल, हे पाहणे आवश्यक आहे.
स्वतःच्या प्रगतीतून दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचीही वाच्यता करणे योग्य नाही. यामुळे दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. दुसऱ्याला दुःख होणार नाही, याची काळची घ्यायला हवी. अनेक संतांच्या अशीच शिकवण असते. संतांच्या या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो. यासाठी संतांच्या उपदेशाचे आचरण करणे गरजेचे आहे. संतांच्या शिकवणीचा अभ्यास, चिंतन, मनन केले जावे. ज्ञानाचा गर्वही नसावा.
सध्याच्या युगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. यामुळे तुमचे ज्ञान यामध्ये क्षुल्लक ठरू शकते. यासाठी शाश्वत ज्ञानाची ओढ मनाला लागायला हवी. त्याचा अभ्यास करायला हवा. या अभ्यासाचाही डांगोरा पिटाळणे योग्य नाही. डांगोरा पिटाळून मनाला समाधान मिळत नाही, उलट यातून दुःखच मिळत राहते. साधनेसाठी मन समाधानी राहणे आवश्यक आहे. संतांच्या शिकवणीतून समाधान टिकवून कसे ठेवता येते, याचा विचार करायला हवा. यातून सात्त्विक विचारांची बैठक उभी राहू शकते.
समाधानी चित्तच साधनेत रमते. साधनेत बाधा येणार नाही यासाठी अंगात सात्त्विक भाव कसा जागृत होतो, याचा अभ्यास करायला हवा. त्याचे आचरण करायला हवे. संतांच्या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो. यासाठी त्यांच्या शिकवणींचा अभ्यास हा करायलाच हवा. त्यावर चिंतन, मनन केल्यास त्यातून हळूहळू सुधारणा होऊ शकते. पटकण कोणतीही गोष्ट होईल अशी आशा ठेऊ नये. आध्यात्मिक प्रगती ही हळूहळू होते. यासाठी प्रयत्नात सातत्य हवे. नित्य अभ्यास, साधना हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.