July 27, 2024
Croton gibsonianus Plant On seen in Maharashtra
Home » हे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…
संशोधन आणि तंत्रज्ञान

हे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…

दगडात आढळणारी ही वनस्पती खालच्या भागातही आढळणे आवश्यक आहे. पाण्यावाटे बिया अन्यत्र पसरतात; पण ही वनस्पती इतर ठिकाणी आढळत नाही. काय आहेत यामागची कारणे, हे अभ्यासणे संशोधकांसमोर मोठे आव्हान आहे, असे डॉ. मयूर नंदीकर यांनी सांगितले.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

सातारा येथील नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्रातील वनस्पती संशोधकांनी सुमारे १७० वर्षांपूर्वी नोंद झालेल्या वनस्पतीचा पुन्हा नव्याने शोध लावला आहे. या संशोधनामुळे ही वनस्पती लुप्त झाल्याचा समज होता, तो आता पूर्णतः खोडून काढण्यात आला आहे. मनिरुद्दीन धबक, ऋषभ चौधरी, स्नेहा ब्रह्मदंडे, डॉ. मयूर नंदीकर या संशोधकांचा या संदर्भातील शोधनिबंध जर्मन येथून प्रसिद्ध होणाऱ्या फेड्डीस रिपोर्टोरियम या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. मयूर नंदीकर म्हणाले, ‘‘या संशोधनाने महाराष्ट्राच्या आणि जागतिक वनस्पतीसंपदेच्या ज्ञानामध्ये मोलाची भर पडली आहे. १७० वर्षे म्हणजे जवळजवळ पावणेदोन शतके लुप्त समजल्या गेलेल्या एका झाडाचा पुनश्च शोध लावला आहे. ‘क्रोटोन गिबसोनियानस’ (Croton gibsonianus) असे या झाडाचे नाव आहे. ते अतिदुर्मीळ असून, आजच्या घडीला फक्त महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगडावरच याची काही झाडे आढळून आली आहेत. फक्त महाराष्ट्रातच आढळणारं असे हे एकमेव झाड आहे! यामुळे आता त्याचे संवर्धन हे संशोधकांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

क्रोटोन प्रजातीबाबत…

जगभरात क्रोटोनच्या ११६० प्रजाती आढळतात. इफोरबिएसी कुळातील असणाऱ्या क्रोटोनच्या १६ प्रजाती भारतात आढळतात. त्यापैकी C. gibsonianus Nimmo, C. lawianus Nimmo, C. malabaricus Bedd., and C. scabiosus Bedd या चार प्रजाती स्थानिक आहेत.

वनस्पतीची इतिहासात नोंद

या वनस्पतीबाबत असणाऱ्या इतिहासातील नोंदीबाबत सांगताना डॉ. मयूर नंदीकर म्हणाले, ‘‘सन १८३९ च्या आसपास मुंबई प्रांताचे पहिले वनरक्षक डॉ. जिब्जन यांनी याच्या फांदीचे काही नमुने गोळा केले. हरिश्‍चंद्रगड आणि भीमाशंकरमधून हे नमुने गोळा करण्यात आले. हे नमुने वापरून पुढे फ्लोरा ऑफ बॉम्बे आणि व्हिसिनिटी याच्यामध्ये जोसेफ निम्मो यांनी या वनस्पतींची नोंद gibsonianus या नावाने प्रसिद्ध केली.

यापूर्वी हा फ्लोरा जॉन ग्रॅहम यांनी नोंदीसाठी घेतला होता. या संदर्भात फ्लोरा ऑफ बॉम्बे आणि व्हिसिनिटी यावर त्यांचे काम सुरू होते; पण याच दरम्यान त्यांचे निधन झाले. यामुळे ग्रॅहम यांच्या कॅटलॉगचे काम अर्धवट राहिले. पुढे हे काम जोसेफ निम्मो यांनी पूर्ण केले. त्यांनी या वनस्पतीची नोंद Croton gibsonianus या नावाने केली. पण पुढे १८८७ मध्ये हुकर यांनी फ्लोरा ऑफ इंडियामध्ये gibsonianus च्या ऐवजी C. lawianus अशी नोंद या वनस्पतीची केली. पुढे त्यानंतर ही नोंद चुकीचीच राहिली. हा नावाचा गोंधळ संपविण्यात या संशोधकांच्या गटाला यश मिळाले आहे. ही वनस्पती विज्ञानाला ज्ञात झाली म्हणजेच तिला एक शास्त्रीय नाव मिळालं होते. ते हुकर यांच्यामुळे चुकीचे नोंदविले गेले. पण या वनस्पतीचे सुरुवातीचे नमुने आजही इंग्लंडमधील Kew ‘क्यू’ आणि भारतातील वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या कोलकता येथील वनस्पती संशोधन केंद्रात पाहायला मिळतात. १७० वर्षांपूर्वी ही वनस्पती अस्तित्वात होती याचा एकमेव पुरावा होता, तो म्हणजे हे नमुने.

असा सोडविला वैज्ञानिक नावाचा गोंधळ

याच संशोधनाचा संलग्न भाग म्हणून याच वर्गातील काही वनस्पतींच्या वैज्ञानिक नावांचा गोंधळ संपवण्यात देखील या संशोधकांच्या गटाला यश मिळाले आणि यातील एका झुडुपाचे नामकरण ‘क्रोटोन चक्रबर्ती’ असे केले गेले. ‘चक्रबर्ती’चे कारण असे की – भारतातील वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या डॉ. तापस चक्रबर्ती या वनस्पती संशोधकाने आपल्या आयुष्याचा बराच काळ या वनस्पती वर्गाचा अभ्यास करण्यात व्यतीत केला. त्यांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी हे नाव देण्यात आले.

डॉ. नंदीकर म्हणाले, ‘‘कोणी ही वनस्पती तिच्या नैसर्गिक अधिवासात कधी पाहिलीच नव्हती. या नव्याने मिळालेल्या झाडाचं महत्त्व आता शोधणे हे यापुढील आव्हान आहे. अतिदुर्मीळ असे हे झाड भविष्यासाठी जतन करणं ही आता पुढची पायरी असेल. ‘IUCN रेड लिस्ट’ या जागतिक दर्जाच्या ‘धोका असलेल्या प्रजातींच्या’ यादीत या झाडाची सद्यस्थिती ‘अति चिंताजनक’ (Critically Endangered) या वर्गात व्हावी यासाठी नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्र, सातारा सध्या प्रयत्नशील आहे. नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्र, सातारा येथील संशोधकांचा गट या वनस्पतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे. या वनस्पतीला फुले, फळे लागतात. मग ही वनस्पती अन्यत्र का आढळत नाही? तसेच ठराविक भागातच, फक्त हरिश्‍चंद्र गडावरच का आढळते? याबाबत ही संशोधकांची टीम अभ्यास करणार आहे. 

दगडात आढळणारी ही वनस्पती खालच्या भागातही आढळणे आवश्यक आहे. पाण्यावाटे बिया अन्यत्र पसरतात; पण ही वनस्पती इतर ठिकाणी आढळत नाही. काय आहेत यामागची कारणे, हे अभ्यासणे संशोधकांसमोर मोठे आव्हान आहे.

अशा या वनस्पतीबाबत बोलताना नंदीकर म्हणाले, ‘‘ओढे आणि नाल्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या दगडांमध्ये ही वनस्पती वाढते. या वनस्पतीच्या फुलामध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकत्र आढळत नाहीत. पुंकेसर हे वरच्या बाजूला असते तर स्त्रीकेसर खालच्या बाजूस असते. यामुळे परागीभवनासाठी कीटकांची आवश्यकता भासते. कोणत्या कीटकांमार्फत त्याचे परागीभवन होते? बिया तयार झाल्यानंतर त्या जमिनीवर पडल्यावर पाण्याच्या प्रवाहाने अन्यत्र जातात. मग अन्यत्र या परिसरात रोपे का तयार होत नाहीत? हे शोधणे हे पुढील आव्हान आहे. बियांची सुप्तावस्था किती दिवसांची आहे, यावर सुद्धा आता अभ्यास केला जात आहे.

संशोधकांसमोर असणारी आव्हाने…

  • या वनस्पतीचे परागीभवन कसे होते?
  • त्यांच्या बियांचा प्रसार कसा होतो?
  • बियांचा प्रसार होत असेल तर ही वनस्पती अन्यत्र का आढळत नाही?
  • पश्चिम घाटामध्ये इतरत्र या वनस्पतीचा विस्तार करता येईल का, हे पाहणे. उदाहरणार्थ आंबा, फोंडा, महाबळेश्वर अशा ठिकाणी हरिश्‍चंद्रगडाप्रमाणेच वातावरण आहे. तेथे या वनस्पतीची लागवड करून संवर्धन करता येईल का?
  • या वनस्पतीबाबत स्पष्ट माहिती नाही. यामुळे याबद्दलची माहिती शोधणे हे खरे मोठे आव्हान असणार आहे.
  • या अशा वनस्पतींच्याबाबत जागृती अन् विस्तार करण्याची गरज आहे.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

खांडेकरांनी साहित्‍यातून समाजाला मूल्‍यविचार दिला – गोविंद काजरेकर

खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading