July 27, 2024
Book Review Bhimrao Dhulubule poetry collection
Home » समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता
मुक्त संवाद

समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

काळजाचा नितळ तळ – समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

कोणताही उत्तम कवी, तो ज्या काळात राहतो त्या काळाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या काळात घडणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक घडामोडी आणि माणसाचे समग्र जगणे, याचे निरीक्षण करून स्वतःच्या मनातील मूल्य व्यवस्थेशी त्याची तुलना करतो. त्या तुलनेमध्ये ज्या वेळेला व्यस्त प्रमाण वाढलेले दिसते, त्यावेळी माणसाच्या जगण्यातील प्रत्येक घटनेची तो चिरफाड करू लागतो. त्यासाठी त्याची म्हणून एक मूल्य व्यवस्था असावी लागते, आणि आत्मभान ही व्यवस्थेची चिरफाड करण्यासाठी कमालीचे धारिष्ट असावे लागते, हे धारिष्ट भीमराव धुळूबुळू यांच्याकडे आहे .

एखादा सैनिक रणांगणावर जितक्या लिलया तलवार चालवून शत्रूंवर वार करतो, तितक्याच लीलया धुळूबुळू त्यांच्या कवितेतील शब्दातून समकालीन भयाण वास्तवावर वार करतात. कवीकडे ही वार करण्याची ताकद एका तरल अस्वस्थतेतून येत गेली आहे .म्हणूनच त्यांची कविता म्हणजे काळजाचा नितळ तळ आहे. या कवितासंग्रहामध्ये 98 कविता आहेत .प्रत्येक कविता संवेदनशील, अभिरुची संपन्न वाचकाला अस्वस्थ करून जाते. हे अस्वस्थ करणेच या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

कवीने आपल्या मनोगतात, “आजूबाजूच्या भोवतालची दुःखे मला माझ्या दुःखापेक्षा मोठी वाटतात, समाजात वाढणारा ढोंगीपणा लुच्चेगिरी अस्वस्थ करते, नीती मूल्यांची घसरण शाळा महाविद्यालयासारख्या ज्ञान मंदिरात पोहोचलीय याची याची खंत वाटते.” असे स्पष्ट लिहिले आहे. ही वाटणारी खंतच त्यांच्या कवितेची प्रेरणा आहे.

जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून त्याचे अगतीकीकरण झाले आहे .हे कवीचे निरीक्षण निश्चितच विचार करायला लावणारे आहे. प्रत्येक भांडवलदार माणसाकडे माणूस म्हणून न पाहता, ग्राहक म्हणून पाहतो. काय खावे, काय प्यावे, याचा निर्णय देखील माणसाला घेता येत नाही. माणसाने या समकाळात स्वतःला या भांडवलदारांना विकून टाकले आहे. ही नव भांडवलदारांनी निर्माण केलेली गुलामीची व्यवस्था कवीला अस्वस्थ करते. याचे वास्तव चित्रण करताना कवी म्हणतो…

” रस्ते रस्त्यांच्या दिशा
बोलण्याची भाषा
सगळेच ठरवून दिले जाईल
त्यानुसार चालावे व बोलावे लागेल
याची नोंद घ्या “

कवीने या संग्रहातील पहिल्याच कवितेमध्ये “संवाद तुकोबाशी” ही विलक्षण कविता लिहून , तुकोबांचे क्रांतिकारत्व सिद्ध केले आहे आणि त्याच वाटेवरून कवीला चालायचे आहे, हा आत्मविश्वास निश्चितच अनुकरणीय आहे. ‌ कवीवर समाजवाद आणि साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव आहे. म्हणून कवी ” कवीचा घोडा” या कवितेत म्हणतो,

“कवीचे धारदार शब्द कापत जातात गुलामगिरीचे दोर
आणि गलाताला येत जातो जोर
ते उघडतात मानवतेच्या मंदिराची दारे
मग कवी उतरतो सन्मानाने घोड्यावरून आणि आरुढ होतो मंदिरातल्या सिंहासनावर.”

आपल्या देशाचे स्मशान करायला निघालेल्या भ्रष्टाचारी, देशद्रोही वळूंवर त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

“जिथे न्याय सुद्धा किलो विकला जातो” .

हे समाज वास्तव खरोखरच अंतर्मुख करणारे आहे .समकाळामध्ये नोकरदार लोकांची होणारी कुतरओढ मांडताना कवी म्हणतो ,

“आपलेच अपहरण तर होत नाही ना?
या सगळ्या ओढाताणीत घरातलं गोकुळ हरवलेलं दुःख वाचकाला अस्वस्थ करून जाते .

प्रतिष्ठा म्हणून आपल्या मुलांना परदेशी पाठवण्याची चढाओढ करणारी मध्यमवर्गीय आणि म्हातारपणी त्यांची झालेली दयनीय अवस्था ,”परतीचे दोर कापलेले वंश” या कवितेत खूप सुंदर पद्धतीने कवीने मांडले आहे. कवी म्हणतो.

….” बीपी शुगर सोबत प्रतिष्ठेचा निर्देशांक ही वाढलेला
मुलं परदेशात आहेत याचा रुबाब
बापाला नवाब करतो कल्पनेतच.” ‌ ‌

“परिवर्तनाचं काय “या कवितेमध्ये नाथा कांबळे नांवाचें एक वेगळे व्यक्तिमत्व कवीने रेखांकित केले आहे. माणूस आयुष्याच्या एका वळणावर कशी तडजोड करतो याचे चित्रण खूप सूक्ष्म आहे. “वस्त्रहरण “नावाच्या कवितेत लोकशाही ईव्हीएम मशीन मध्ये कशी आत्महत्या करते आहे, हे सांगून कवी आपल्यातला कृष्ण ,लोकशाहीची लज्जा राखली पाहिजे असे सुचित करतो.

कवी स्वतःच्या कवीते बद्दल लिहिताना म्हणतो…
“भविष्य हरवल्याशिवाय कर्तृत्व दिसत नाही
प्रश्न पडल्याशिवाय काही सुचत नाही”

म्हणून ही कविता काश्मीर पंजाब मणिपूर मध्ये पडणाऱ्या प्रेतातून रक्त होऊन वाहत असते .

“कवीच्या काळजात असतो परीस” या कवितेच्या शेवटी कवी म्हणतो …

“कवीचे भरून येणे
आणि झूरून जाणे
असते निमित्त मात्र
पण मागे फुलत राहतात
कवितेचे ताटवे तरारून .”

कवी स्वतःच्या कवितेशी खूप प्रामाणिक आहे .तो म्हणतो…

” शब्दांनी ‘ध’ चा ‘मा ‘कधीच केला नाही निदान माझ्यासाठी तरी
म्हणून आता त्याची झोळी
काखेत अडकून
आयुष्यातल्या उद्ध्वस्त क्षणांची राख
अंगास फासून
चाललोय मी कवितेच्या बागेत
समाधीस्थ व्हायला .”

हे आत्मचिंतन कवीला आणि कवितेला खूप पुढे घेऊन जाणारे आहे.

” विस्तव” नावाच्या कवितेत… “सोशिकतेच्या आत खोल एक विस्तव धुमसतोय

कविते तो तुला शब्द मागतोय.” यातून कवीची काव्य विषयक दृष्टी स्पष्ट होते. आजूबाजूला सारेच विपरीत घडत असतानाही ,”आनंदाचे गाणे “या कवितेत…..

समतोलावर चालत राहतो, मनापासून बोलत राहतो, स्वतःसह इतरांचेही पाहतो, आनंदाचेच गाणे गातो ,हा आशावाद व्यक्त करतो .

कवीचा स्वतःच्या शब्दांवर विलक्षण विश्वास आहे. तो म्हणतो ….

“शब्दात असते शक्ती
जग जिंकण्याचीशब्दात असते युक्ती
अशक्य शक्य करण्याची.”

या संग्रहामध्ये आई आणि बाबा विषयी महत्वपूर्ण कविता आल्या आहेत ,

“भूक तव्याखाली जाळ
माय तव्यावर भाकर
किती गोड ही भाकर
जणू तिच्यातच साखर
बाप रानात राबतो
चिंब घामात भिजतो
त्याच्या कष्टाच्या धगीत
सारा संसार शिजतो”

.”मातीची ॲलर्जी” या कवितेत समकाळातील शेतकऱ्याची वेगळी अवस्था चित्रित करताना ,कवी सहज लिहून जातो.

“पण साली आपली पिकं कसली
सगळी मातीतच रुजतात
तेव्हा, फरशीवर पिकणाऱ्या पिकांचेही संशोधन व्हायला हवे.”

एकूणच धुळूबुळू यांची कविता समकालीन व्यवस्थेवर प्रहार करणारी आहे. कवीच्या मनातील समाज निर्माण होईपर्यंत, कवी लढत राहण्याची भाषा करतो. हा आशावाद निश्चितच सुज्ञ वाचकाला सुखावणारा आहे .या संग्रहामध्ये कवींने प्रत्येक फॉर्ममध्ये कविता लिहिली आहे. यावरून कवीची अभिव्यक्ती वर असलेली पकड दिसून येते. सूक्ष्म निरीक्षण, चिंतनशीलता, समाज बदलासाठी आक्रमक होण्याची तयारी ही कवितेची वैशिष्ट्ये आहेत . संग्राहातील आशय पकडणारे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी फारच अर्थपूर्ण व आशयगर्भ रेखाटलेय तर विजय चोरमारे यांचा’ भारतीय साहित्यात दखल घेतली जाईल अशी कविता’ हा समर्पक ब्लर्ब संग्रह आणखी वजनदार करतो.धर्मवीर पाटील यांच्या “प्रतिभा पब्लिकेशन” यांच्याकडून प्रकाशित झालेल्या,”काळजाचा नितळ तळ” या संग्रहाचे आपण स्वागत करूया, आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया.

पुस्तकाचे नाव – काळजाचा नितळ तळ(कवितासंग्रह)
कवी – भीमराव धुळूबुळू मोबाईल – 98507 39738
प्रकाशक – प्रतिभा पब्लिकेशन बुक्स
पाने १३२ मूल्य रु. २४०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्रद्धा असावी, पण ती डोळस हवी

जयंत नारळीकर यांना ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार

अद्याक्षरावरून आषाढी एकादशी कविता

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading