May 30, 2024
Book review of Charoli Collection Sparsh by Seema Patil
Home » ‘स्पर्श’ चारोळी संग्रहातून संवेदनशील मनाचे दर्शन
कविता

‘स्पर्श’ चारोळी संग्रहातून संवेदनशील मनाचे दर्शन

प्रेमाचा गहन अर्थ, जोडीदारा विषयीच्या हळव्या भावना, व्यवहारी समाजात वावरताना लोकांच्या स्वभावाचे येणारे गोड कडू अनुभव तसेच प्रेमातील समंजस मन, विरह तसेच कवीचे हळवं भावविश्व याचे दर्शन पोलीस क्षेत्रात काम करत असूनही एका संवेदनशील मनाचे दर्शन वैभव चौगुले यांच्या ‘स्पर्श’ या पुस्तकातील प्रत्येक चारोळीतून झाल्याशिवाय रहात नाही.

सीमा ह. पाटील
कोल्हापूर

ताडामाडांशी गूज करताना
सागर थोडा हळवा झाला..
सखी सोबत विहार करताना
वारा थोडा अल्लड झाला..
असंच काहीसं प्रेमाच ही असतं..
कवी, गझलकार, चारोळीकार, वैभव चौगुले सरांचा ‘स्पर्श’ चारोळी संग्रह हाती पडला आणि आणि चारोळी संग्रहाच्या मुखपृष्ठावरील गुलाबी रंगाच्या फुलांनी सजलेल्या लांबच्या लांब वाटेवरील ते दोघे वाटसरू चारोळी संग्रहाचे ‘स्पर्श ‘ हे नाव सार्थ करून देतात हे समजून आले.

‘चारोळी’ म्हणजे चार ओळींची अर्थपूर्ण कविताच पण अतिशय मोजक्या शब्दांत आपल्या मनातील भाव वाचकांपर्यंत पोहोचवणे तसेच ते भाव वाचकांनाही आपल्या जवळचे वाटणे तितके सोपे नसते पण ‘स्पर्श’ या चारोळीसंग्रहामधील चारोळ्या वाचताना लक्षात येते की वैभव चौगुले हे चारोळी हा साहित्यप्रकार खूप सहज हाताळतात. त्यांच्या ‘स्पर्श’या चारोळी संग्रहातील प्रत्येक चारोळी ही त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडविल्याशिवाय रहात नाही.
तुझ्या अंगणी प्राजक्ताचा सडा पडावा
फुले वेचताना मी तुला पहावे..
शब्दसुमने मी तुझ्यावर उधळावी
अन एक गीत मी तुझ्यावर लिहावे..
सखीचे अंगण सुखाच्या क्षणांनी भरून जावे
आणि ती त्या सुखाचा आस्वाद घेत असताना मी दुरूनच सखीवर सुंदर असे गीत लिहावे. वर वर साधी सरळ ही चारोळीरचना वाटत असली तरी प्रेमातील त्यागाचे सुंदर शब्दांत उदाहरण पटवून देण्याचे काम कवी वैभव चौगुले सरांच्या शब्दांतील भावनांनी केले आहे.

अतिशय तरल भावनांनी युक्त अशा या पुस्तकातील सर्वच चारोळ्या आहेत, याचा अनुभव प्रत्यक्ष चारोळ्या वाचतानाआल्याशिवाय रहात नाही. संध्याकाळी चांदण्या अंगणात स्वतःमध्ये डोकावताना, थंड वाऱ्याची झुळूक येऊन तिने अलवार बिलगावे असेच या पुस्तकातील प्रेममय चारोळ्या वाचताना मन प्रेमऋतू ची सफर केल्याशिवाय रहात नाही.

सखी चे जिवनात आगमन होताच एक कवी मन आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत असते हे,
गंध जीवनास आज आला
रंग जीवनास आज आला
सांग सखी कोणतं हे नक्षत्र
या नक्षत्रात प्रेमऋतू बहरला
या शब्दांत स्वतः कविलाच हे कोणतं नक्षत्र आहे? असा प्रश्न पडावा,अतिशय सुंदर शब्दांत हे आनंदी क्षण पकडण्याचा यशस्वी प्रयत्न फक्त कवीच करू शकतो!
केलास या प्रेमाचा स्वीकार
आयुष्यभर या प्रेमाचा गुलाम होईन
या ओळीतून, प्रेम म्हणजे फक्त आनंदाची सोबतच नाही तर ती सुख दुःखातही कर्तव्यातील साथअसते. हे सांगण्याचा प्रयत्न चारोळीतील अर्थपूर्ण शब्दांनी सार्थ ठरवला आहे.

प्रेमाचा गहन अर्थ, जोडीदारा विषयीच्या हळव्या भावना, व्यवहारी समाजात वावरताना लोकांच्या स्वभावाचे येणारे गोड कडू अनुभव तसेच प्रेमातील समंजस मन, विरह तसेच कवीचे हळवं भावविश्व याचे दर्शन पोलीस क्षेत्रात काम करत असूनही एका संवेदनशील मनाचे दर्शन वैभव चौगुले यांच्या ‘स्पर्श’ या पुस्तकातील प्रत्येक चारोळीतून झाल्याशिवाय रहात नाही.
प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावा असा हा ‘स्पर्श’ चारोळीसंग्रह नव्याने चंद्रशेखर गोखलें च्या चारोळ्यांची ‘आठवसफर’ घडवून आणल्याशिवाय रहात नाही.

पुस्तकाचे नाव – स्पर्श (चारोळीसंग्रह)
लेखक व प्रकाशक – वैभव चौगुले, सांगली ( मोबाईल – 9923102664 )
किंमत – ९० रुपये

Related posts

जम्मू – काश्मीर होणार अफ्स्पा मुक्त

पक्षीसुद्धा शेतकऱ्यांचे मित्रच…

‘वचन’ दाता गेला…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406