July 27, 2024
Blatentiya Balasaheb Labde Book Review by Manisha Patil Harolikar
Home » कालातीत कविताःब्लाटेंटिया
मुक्त संवाद

कालातीत कविताःब्लाटेंटिया

मनीषा पाटील-हरोलीकर

कालातीत कविताःब्लाटेंटिया

डाॕ.बाळासाहेब लबडे यांनी कवी, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून मराठी साहित्यात स्वतःची नाममुद्रा निर्माण केली आहे. डाॕ.बाळासाहेब लबडे यांचा ‘ब्लाटेंटिया’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे, ज्याची विविध अंगाने चांगली चर्चा होत आहे. कवितेच्या निर्बीड अरण्यात ही कविता निश्चितच आश्वस्त करते आहे. बाळासाहेब लबडे हे प्रयोगशील कवी आहेत. खरं तर कवीला जेव्हा विलक्षण तीव्रतेने काही जाणवलेले असते, ते जेव्हा तो पारंपारिक पद्धतीने सांगण्याचा अट्टाहास न करता त्याच्या स्वतःच्या शैलीत, भाषेत व्यक्त होतो, तेव्हा ती साहित्यकृती प्रयोगशील बनते. या अर्थाने कवी बाळासाहेब लबडे यांनी लिहिलेले ‘ महाद्वार’ ,’बाॕम्बे-बंबई-मुंबई’ आणि अलीकडेच प्रकाशित झालेला ‘ब्लाटेंटिया’ हे कवितासंग्रह स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतात. हे तीनही कवितासंग्रह ‘ थीम कवितासंग्रह’ आहेत.असा प्रयोग मराठी कविता क्षेत्रात अभावाने आढळतो. थीम कविता ही खरे तर एक जोखीम असते.जी लबडे यांनी लिलया पेलली आहे. असे काही प्रयोग प्रशांत असनारे, संजय बोरुडे, यशवंत माळी या कवींनी केले आहेत.

‘ब्लाटेंटिया’ हे कवितासंग्रहाचे काहीसे गूढ वाटणारे शीर्षक मन वेधून घेते. कवीने या शब्दाची समर्पक उकल मनोगतामध्ये केली आहे. ‘ब्लाटा’ हा लॕटिन व जरमॕनिक शब्दावरुन कवीने हे नामकरण केले आहे. ब्लाटा याचा अर्थ झुरळ असा आहे. कवीचे अफाट वाचन आहे ही कौतुकास्पद गोष्ट इथे नमूद करावी वाटते. जसे नामदेव ढसाळ आणि ग्रेस यांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द बहाल केले. त्याप्रमाणे बाळासाहेब लबडे यांनी हा प्रयोग आपल्या लेखनात केलेला आहे. म्हणून समकाळामध्ये त्यांची साहित्यकृती अत्यंत जबाबदारीने पाहणे गरजेचे आहे.

कवितेचा पहिला निकष ‘विशुद्ध काव्य’ असतो.रुपके, प्रतीके व प्रतिमासृष्टी कवितेचे अनुभवविश्व समृद्ध करत असते. ‘प्रतिमांच्या सहकंपांतून निर्माण होणाऱ्या अनामिक भावस्थितीची भाषिक बंदीश म्हणजे विशुद्ध काव्य,’ अशी व्याख्या गो. वि. करंदीकर यांनी ‘ परंपरा आणि नवता’ मध्ये केली आहे. कवितेचे अफाट गाजरगवत उगवण्याच्या या काळात लबडे यांचे काव्यलेखन धारदार आणि तितक्याच हिरव्यागार पातीसारखे आहे. ‘ब्लाटेंटिया’ या संग्रहातील कविता माणसाचे अस्तित्व शोधणारी आहे. माणूस झुरळाच्या रुपकातून कवितेत उतरत राहतो. झुरळासारखीच किंबहुना थोडी जास्तच माणसाची जगण्याची लढाई आहे. संकटांचे प्रचंड पहाड फोडून शेवटची शिल्लक राहतो तो माणूसच!!! जगण्याचा हा चिवटपणा शेवटी आला कुठून ? त्याचे मला हा संग्रह वाचून गवसलेले उत्तर हे आहे की ‘माणसाचे जगण्यावर नितांत प्रेम आहे! म्हणून अणुबाॕब हल्ल्यानंतरही जसा झुरळ हा जीव जिवंत राहिला तसा माणूस ही आदिम काळापासून अस्तित्वाची लढाई लढत राहिला पण आपल्या श्वासांना जीव लावणे त्याने सोडले नाही. म्हणून कवी म्हणतो, वाटणं असतं म्हणू , झुरळं उडू शकतात. सूर्योन्मुख होऊन (काळा कुत्रा आणि झुरळ)

डाॕ.बाळासाहेब लबडे यांची कविता समस्त मानवजातीच्या दुःखाची वेदना मुखर करते.

१.किती काळ ही माणसं चालणार अनवाणी
काहीच कसा पाझर फुटत नाही व्यवस्थेला ?

२.आपण येतो आणि जातो आसमंतात काही फरक आहे ?(तुझ्या माझ्या दरम्यान )

३.फक्त हळहळीच्या हिरवाळी घेऊन
हे लोक काय साध्य करणार ?(लाॕन्ग मार्च )

४.जीव गुंतल्यामुळं मिळतो का जन्म ?(नवं सृजन)

असे जीवाला भाजणारे कवितेतील प्रश्न कमालीचे अस्वस्थ करतात. त्याचवेळी माणसाचे अफाट विश्वातील शुद्रत्व अधोरेखित करतात.माणसाचे मूळ प्रश्न तर मिटलेच नाहीत. उलट या भासमान भयग्रस्त काळात प्रश्नांची शृंखला वाढतच चालली आहे. म्हणूनच लबडे यांची कविता जरी आजची असली तरी ती कालचीही आहे आणि उद्याचीही असणार आहे. ही कविता कालातीत आहे. तसेच ही कविता वैश्विक सत्य मांडणारी आहे. देश ,प्रांत,सरहद्द कोणतीही असो,’ भाकरी हे धाम/तीर्थ हेच आहे’ (ठायी परब्रम्ह) हा भूकेचा संग्राम ठायी ठायी आहे.चराचरात आहे.

कवी ‘ संघटित सोंगं’ या कवितेत म्हणतो,
झुरळांच्या माथ्यावर खोल जखम
चिरंजीवी असण्याच्या अश्वस्थामी शाप
बेलगामी जगण्याचे निष्ठूर घोडे
त्यांच्या ताटात भाकरी बेघर होऊन
देशोधडीला लागलेली चुलीसह….
धर्मांधता, भांडवलशाही, मार्क्सवाद, जागतिकीकरण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, शोषक वर्ग यामध्ये पिचला जाणारा ‘काॕमन मॕन’, सामान्य कष्टकरी माणसाच्या अस्वस्थ वर्तमानावर ही कविता नेमकेपणाने बोट ठेवते. माणसाचा शुद्र झुरळ झाल्याची दाहक वास्तवता ओळीओळीतून जाणवत राहते. कवी ‘आम्ही’ कवितेत म्हणतो,
जगण्यासाठी वेळोवेळी लवचिक होतो
पाण्याविनाही तरतो आम्ही झुरळं असतो

साधे असतो मरतो आम्ही झुरळं असतो
त्यावेळीही हसतो आम्ही झुरळं असतो

केविलवाण्या माणसाची अगतिकता या संग्रहातील ब-याच कवितांमधून दिसत राहते. तसेच मानवी जीवनाचा बेसूर , विद्रूप चेहरा आपल्या समोर येत राहतो.

डाॕ. महेंद्र कदम यांनी ब्लर्बमध्ये लिहिताना म्हटले आहे,’ आसक्तीच्या पलीकडे जाणारा अंधार भेदून, फोबिया होत चाललेल्या अस्वस्थ समाजाच्या वाटचालीची मांंडणी करणारी ही कविता आहे. कविता शोषणाच्या सर्व शक्यता शोधत जाते.’ डाॕ. प्रकाश सपकाळे यांचे विशेष अभिनंदन. कारण सपकाळे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘हा कवितासंग्रह साहित्यशास्त्रविषयक जाण अधिक प्रगल्भ करणारा आहे. जीवनविषयक तत्वज्ञान हा या कवितेचा गाभा आहे. अगदी समीक्षकांच्या जाणिवेच्याही कक्षा रुंदावणारा हा संग्रह आहे.’ वाचकाने प्रथम प्रस्तावना वाचूनच कवितेकडे वळावे, म्हणजे ती कविता अधिक खोलवर कळेल, यात शंका नाही.

संग्रहामध्ये एकूण ९६ कविता आहेत. बहुतांश कविता मुक्तछंदात आहेत. कवी स्वतः गझलकार आहेत. पण मुक्तछंदातील त्यांची मुशाफिरीही कौतुकास्पद आहे. फक्त काही कवितांमध्ये आलेले अमराठी शब्द, नावे याबद्दलची माहिती संदर्भसूची म्हणून संग्रहाच्या शेवटी दिली असती तर सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते संदर्भ अधिक लवकर पोचायला मदत झाली असती. दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी लबडे यांनी याचा विचार करावा. संग्रहातील सर्वच कविता नवीन प्रतिमा ,प्रतीकांसह भेटत राहतात. नवे प्रतिमाविश्व हे डाॕ. बाळासाहेब लबडे यांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे.

‘ कवितेत येणारी प्रतिमा ही ‘प्रतीक’ आहे की संश्लेषित ‘रुपक’ आहे यासोबतच महत्त्वाचे असते ती काव्याला काव्यात्मकता मिळवून देणारी रुपकप्रक्रिया, काव्याला सेंद्रियत्व मिळवून देणारी संश्लेषणप्रक्रिया. कवितेत प्रतीके, रुपके यांपैकी काहीही येवो, कविता ही या सर्वांना आपल्यात अंतर्भाव करणाऱ्या प्रतिमेची संघटना असते…’आणि मला वाटते कवितेच्या या बांधणीमध्ये कवी डाॕ.बाळासाहेब लबडे निश्चितपणे यशस्वी झाले आहेत.

सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसने या संग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे.संग्रहास प्रमोदकुमार आणेराव यांचे आशयगर्भ मुखपृष्ठ लाभले आहे.तसेच संग्रहातील रेखाटनेही आणेराव सरांचीच आहेत.हा संग्रह डाॕ.बाळासाहेब लबडे यांनी दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डाॕ.नागनाथ कोत्तापल्ले व ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा.साईनाथ पाचारणे यांना प्रेरणास्थान म्हणून अर्पण केला आहे.

कवितासंग्रहः ब्लाटेंटिया
कवीः डाॕ.बाळासाहेब लबडे
प्रकाशनः न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठसंख्याः १४८
मूल्यः २०० रुपये

मनीषा पाटील हरोलीकर,
देशिंग हरोली (जिल्हा सांगली) मोबाईल ९७३०४८३०३२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात

मनाला सोऽहमचा स्वर ऐकण्याची सवय लावल्यास…

   उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading