June 19, 2024
Book review of Ladha Coronashi book by suresh koditkar
Home » कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी
काय चाललयं अवतीभवती

कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी

कोरोना आणि अर्थचक्र यांचे नाते व्यस्त आहे. कोरोनामुळे जीव वाचणे आणि उद्योग व्यवसाय थांबणे हे अपरिहार्य होते. पण या परिस्थितीतून बाहेर पडावेच लागेल. शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यास कोरोनावर मात करून अर्थचक्र फिरते ठेवणे आवश्यक आहे.

मार्च २०१९ पासून आपल्या सर्वांच्या जीवनाच्या अवकाशात कोरोना हा अनाहूतपणे आला आणि आता तो जायचे नाव घेत नाही. कोरोनाग्रस्त असे सारे वातावरण झाले आहे. कोरोनामुळे आपल्याला अनेक संकटांचा आणि अव्यवस्थांचा सामना करावा लागला आहे. उद्योग, धंदे, व्यवसाय, रोजगार मंदीत लोटले गेले आहेत. अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. कोरोनामुळे जगण्याच्या वेगाला, धुंदीला ब्रेक लागला आहे. साऱ्या जगावर कोसळलेल्या या जैविक आपत्तीला धैर्याने आणि नेटाने सामोरे जाताना आपण अनेकांना आणि अनेक गोष्टीना गमावले आहे. दुःखं आणि आघात सहन केले आहेत. कोरोनामुळे आपण नक्कीच अनेक प्रकारचे नुकसान सहन केले आहे आणि करत आहोत. पण लॉकडाऊन, अनलॉक, दुसरी लाट आणि लसीकरण या सर्व काळात आपण नक्कीच नवे काही समजलो आणि शिकलो आहोत. ते नेमके काय आहे याचा उहापोह आपल्याला सुरेश कोडीतकर यांच्या “लढा कोरोनाशी” या पुस्तकात वाचायला मिळतो.

कोरोना फक्त भीती आणि थांबलेले जीवन घेऊन आला असे नव्हे तर तो लॉकडाऊन आणि स्थलांतर या काळात मनुष्यस्वभावांचे, माणुसकीचे अनोखे दर्शन घेऊन आला. शासकीय यंत्रणांची अखंड जनसेवा घेऊन आला. शासकीय यंत्रणा आजही कोरोनाकाळात लसीकरणार्थ आणि प्रवास सुकर करणेहेतू राबत आहे. स्थलांतर, मजुरांचे हाल आणि यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव हे सर्व कोरोनाने आपल्याला दाखवले आणि फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर घडून आले. या सर्वांची चर्चा या पुस्तकात विस्तृतपणे पहिल्या चार लेखात केली आहे. तसेच स्थलांतराचे परिमाण आणि परिणाम याचे विश्लेषण करून एका वेगळा दृष्टीकोन मांडला आहे.

कोरोनाच्या प्रभावाखाली आपला अहंकार नष्ट झाला का ? कोरोनामुळे जगणेच महत्वाचे हे आपल्याला पुरते समजले असेल तर अहंकाराची पुटं खरवडून निघायला नको का ? कोरोनामुळे अहंकाराच्या फुग्याला टाचणी लावता येत नसेल तर आपण कोरोनापासून कोणताही धडा शिकलेलो नाही असेच म्हणावे लागेल. लेखकाने याच मुद्द्यावर लेखातून भाष्य केले आहे. कोरोनाने स्वयंशासित समाजाची गरज प्रकर्षाने दाखवून दिली आहे. कारण अस्वच्छता, गर्दी, बेशिस्त आणि समस्यांचे आगार हे सर्व एकमेकात समाविष्ट मुद्दे आहेत. स्वयंशासित समाजाशिवाय सामर्थ्यशाली राष्ट्र असंभव आहे हे आता तरी कोरोनामुळे आपल्याला समजले असेल. लेखकाने हे मुद्देसुद्पणे हे पटवून दिले आहे.

ऑनलाईन, झूम मिटिंग, फेसबुक वाहिनी वगैरे संपर्क यंत्रणा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म, वर्क फ्रॉम होम याचा बोलबाला झाला आहे. हे बदल अंगवळणी पाडणे हे भाग पडले आहे. कोरोनामुळे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आणि  जीवनशैलीत काय आणि कसे बदल झाले आहेत, हे लेखकाने व्यवस्थित मांडले आहे. आज आपण जीवनाच्या विविध क्षेत्रात निर्बंधांचा अनुभव घेतला आहे. पण म्हणून आपल्याला स्वातंत्र्याचे मोल समजले आहे काय ? पूर्वी जसे मनमोकळे आणि उथळ – उधळ जीवन जगलो तसे कोरोनामुळे जगता येणार नाही, हे आता लोकांना कळून चुकले असेल. जगणे पूर्वरत होणार का आणि स्वातंत्र्याची महती आपल्या लक्षात येणार का, हे लेखकाने उपस्थित केलेले प्रश्न वाजवी आणि प्रसंगोचित आहेत. आरोग्यपूर्ण जीवनशैली किती महत्वपूर्ण आहे, हे कोरोनामुळे लोकांच्या ध्यानी आले आहे, असे समजण्यास वाव आहे. कारण सूर्यनमस्कार, व्यायाम, प्राणायाम, चौरस आहार, काढा, फळांचा रस पुरेशी विश्रांती हे सारे कोरोनामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. लेखकाने यावर प्रकाश टाकला आहे. त्यातील सर्व मुद्दे हे व्यवस्थितपणे अनेक सामान्य गोष्टींचे महत्व पटवून देण्यात यशस्वी झाले आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी कोणामुळे सुलभ, सहज ठरला आहे ? धान्य, डाळी, कडधान्ये, भाजीपाला, अंडी, मांस, दुध हे सारे कोणामुळे जनतेला उपलब्ध झाले ? तर शेतकरी वर्गाने केलेल्या अखंड मेहनतीमुळे. बळीराजाचे महत्व कोरोनामुळे लोकांना समजले आहे काय ? लेखकाने सोदाहरण बळीराजाचे आपल्या जीवनात असलेले अनन्यसाधारण महत्व स्पष्ट केले आहे. सारा देश लॉकडाऊनकाळात ठप्प होऊ शकतो, पण पोटाला अन्न देण्यासाठी फक्त बळीराजाच राबू शकतो आणि त्यामुळे आपण सुखाने जगू शकतो, हे सत्य ठळकपणे मांडून संपूर्ण समाजाला बळीराजाप्रति कृतज्ञ व्हायला लावल्याबद्दल लेखकाचे आभार मानायला हवेत.

स्थलांतर करून अनेक लोक आपल्या गावी गेले. पण तिथे त्यांनी काम काय केले ? महाराष्ट्रात तर अनेक मजूर आणि शेतकरी तरुण गावी परतले आणि त्यांनी पडीक जमीन वहिवाटीखाली आणली. शहरात जर कोरोनाच्या भयामुळे काम करता येणार नसेल तर मग आता गावीच शेतीत राबून शेतीला सुगीचे दिवस आणलेले बरे हा विचार कोरोनामुळे प्रत्यक्षात उतरला आहे. लेखकाने तो पट उलगडून मांडला आहे. स्थलांतर, शेती आणि विकास हे समीकरण पटवून देण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. सोबत शहरात परागंदा झालेले कोरोनाकाळात सैरभेर झाले आणि त्यांना आपले मूळ खुणावू लागले आणि ते कुळाची ओळख शोधण्यासाठी गावाची असलेली, नसलेली वाट धुंडाळू लागले. ‘गावाच्या मातीचे प्रेम जपले पाहिजे’ या लेखातून लेखकाने गावाची महती आणि ओळख तसेच श्रेष्ठत्व पटवून दिले आहे. गाव विसरलेला समाज त्यामुळे तरी ताळ्यावर येईल अशी अपेक्षा आहे.

लॉकडाऊन घरोघरी गृहिणींची परीक्षा घेणारा ठरला. कारण सारा भार त्यांच्यावरच आला. गृहिणींनी लॉकडाऊन आपल्या कुटुंबासाठी सुसह्य केला. ‘लॉकडाऊनशी समर्थपणे लढल्या घरातील गृहिणी’ या लेखातून लेखकाने गृहिणींचे गृहीत धरले जाणे यापेक्षा किती तरी वर असलेले त्यांचे महत्व समर्पक शब्दात मांडले आहे. कोरोनामुळे अनेक लोक आपापल्या राज्यात आणि गावी निघून गेले आणि स्थानिक लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्याचा लाभ उठवला तर तरुणांसाठी कोरोना ही इष्टापत्ती ठरेल हा लेखकाचा युक्तीवाद महत्वाचा आहे. कोरोनाकाळात अनेक लोकांनी समाजसेवेचा आदर्श प्रस्तुत केला आहे. या सर्वात जबरदस्त काम केले ते सिने अभिनेते सोनू सूद यांनी. सोनू सूद यांना देवदूत ही उपाधी लाभण्यास त्यांचे जे काम कारणीभूत ठरले त्याची माहिती आणि त्यामुळे त्यांना लाभलेली महती याबद्दल लेखकाने माहिती देऊन सोनू सूद यांचे अनोखे रूप जनतेसमोर आणले आहे.

कोरोना आणि अर्थचक्र यांचे नाते व्यस्त आहे. कोरोनामुळे जीव वाचणे आणि उद्योग व्यवसाय थांबणे हे अपरिहार्य होते. पण या परिस्थितीतून बाहेर पडावेच लागेल. शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यास कोरोनावर मात करून अर्थचक्र फिरते ठेवणे आवश्यक आहे, हे लेखकाचे प्रतिपादन अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोरोनाने कम्फर्ट झोन उद्ध्वस्त केले आणि चौकटबध्द जगणे बदलणे भाग पडले हे सारे लेखकाने विस्तृतपणे पुढे आणले आहे. त्यावर सर्वांनी गंभीरपणे विचार करणे अगत्याचे आहे. कोरोना अनेक अप्रिय पण अपरिहार्य बदल आणत आहे, याचे स्वागत करायला हवे हे लेखक सूचित करत आहे. कोरोना अनुभवांची शिदोरी आहे. आठवणींचा ठेवा आहे. याबद्दल सारेच सहमत होतील. कोरोनाच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक परिणामास सामोरे जात असतानाच कोरोना सकारात्मक उर्जेनेच निष्प्रभ होईल हे लेखकाचे म्हणणे आधारपूर्ण आणि आत्मविश्वास वाढवणारे आहे यात शंकाच नाही. लेखकाने या सर्व बाजू व्यवस्थितपणे मांडून वाचकांचे “समुपदेशन”च केले आहे, असे वाचकांना सदर लेख वाचल्यावर वाटू शकते.

एका अर्थाने हा कोरोनाच्या विधायक बाजूंचा हा पहिला लेखाजोखा आहे. लेख क्रमांक २६ च्या पुढील लेखातून दुसरा  लेखाजोखा लेखक मांडतीलच. त्यांची ‘लढा कोरोनाशी’ ही दैनिक केसरीतील लेखमाला आता ६३ व्या लेखापर्यंत पोहचली आहे. एकुणातच लेखकाच्या ‘लढा कोरोनाशी” मालिकेतील हे पहिले २५ लेख कोरोनाच्या विविध कोनातून मांडणी करणारे आहेत. प्रत्येक लेख हा वेगळा विषय निराळ्यापणे बाजूची मांडणी करत समोर येतो, हे लेखकाच्या लिखाणाचे वैशिष्टय म्हणावे लागेल. लेखक प्रासंगिक आणि चालू घडामोडीवरील भाष्य अनेक वर्षे लिहित असल्याने त्यांची  मांडणी सुसूत्रपणे आणि सोपी आणि अभ्यासू असल्याचे दिसून येते. कोरोना केवळ शास्त्रीय भाषेत समजून घेताना तो इतर बाजूनेही कसा विविधांगी आहे हे लेखकाचे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. पण त्यासाठी सर्व लेख मुळातून वाचायला हवेत. कोरोनाचा अभ्यास करणाऱ्या सर्वाना आणि जाणकारांना हे पुस्तक आता आणि जैविक आपत्तींची शक्यता लक्षात घेता भविष्यातही नक्कीच मार्गदर्शक ठरेल. वाचकांनी याचा जरूर अनुभव घ्यावा.

पुस्तक :- लढा कोरोनाशी भाग १  
लेखक :- सुरेश मुरलीधर कोडीतकर
प्रकाशक – यशोदीप प्रकाशन, पुणे संपर्क – 90287 36001, 98508 84175
पृष्ठे :- १७६, किंमत रु २५०/-(सवलतीत रु २००/-) 

Related posts

पेशव्यांच्या डुबेरगडापासून गाळणपर्यंतची भ्रमंती

चावट भुंगा

सदापर्णी वृक्ष उंबर अर्थात औंदुंबर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406