February 23, 2024
jagane Vikanarya Mansanchaya Kavita Book review
Home » पायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता
मुक्त संवाद

पायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता

माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर असतो, हे कवीला पावलोपावली लक्षात येते. मग कवीला वाटते निसर्गातली नैसर्गिकता पक्ष्यांत उतरते तर माणसातली माणूसकी माणसात का उतरत नाही ? असा कवी प्रश्नमय होतो .

प्रा. व्यंकटेश सोळंके

नांदेड

कवितेचं जग अनुभवाच्या अखत्यारित व्यक्त होणारे एक कॅनव्हास असते. मनाने जीव ओतलेले रंग त्यावर उमटत असतात. आपल्या अस्तित्वाइतकेच व सभोवतालच्या जगण्याएवढे दुःख त्यात भरलेले असते. हबीब भंडारे असेच हरघडी शब्दांच्या माध्यमातून दुःखाचे रंग भरत असतात. त्यात उपासमार, अपमान जगण्यातल्या माणसांच्या जखमा व आंतरिक विव्हळण्याच्या जाणिवा असतात. सामाजिक जगण्याचा वेदनादायी दुर्लक्षित जगाचा जागर या कवितेत व्यापून राहतो. या कविता मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधता शोधता कवी आजूबाजूला जगणं विकणाऱ्या माणसाच्या कविता लिहितात.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या महाजालामुळे प्रगतीचे वारे सर्वत्र वाहत आहेत. त्यातच प्रगत काही गोष्टींची जाहिरात पुन्हा पुन्हा केली जाते. त्यामुळेच अप्रगत गोष्टी मागे मागे पडून कालबाह्य होतात. प्रगतीचे भ्रामक जग वास्तव पातळीवर कधीच कामाचे नसते. असे असतानाही वास्तव व वास्तविकता नाकारून मायाजाल व त्याची भ्रामकता ही कधीच भुकेल्यांचे समाधान करू शकत नाही. प्रत्येक माणसाला या तंत्रज्ञानाच्या मायाजालाने वास्तवतेला काही प्रमाणात विसरायला भाग पाडत आहे. पण पोटातली भूक कशी विसरता येते हाच मुख्य प्रश्न उरतो. एखादाच शेतकरी लाखो रुपयाचे उत्पन्न काढतो. मग सखल शेतकरी सधन व सुफलाम् झाला असे चित्र रंगवले जाते. उरलेल्या गरीब नव्याण्णवची गरीबी लपवली जाते. एखादा गरीब कर्तृत्वाने पुढे जातो. पण तोच विकास सर्वांचा आहे, असा संदेश तरी सर्वत्र पसरवला जातो.

साहित्याचा इतिहास दैवाच्या, नशिबाच्या वास्तव कल्पनेतून सुरुवात झालेला असला तरी त्यास दुःखाची आकलनीय व अनाकलनीय झालर आहे. तशीच ईश्वरीय माणुसकी या कवितेतून डोकावते. मग कविता माणसातल्या माणुसकीचा उच्चार स्पष्टपणे करत राहते. अपंग, निराधार, कंगाल व विधवा जीवन जगणाऱ्या माणसांचा जिवंत विदारक अनुभवाचे भावस्पर्शी चित्रण या कवितेतून व्यक्त होते. मुस्लिम समाजातील दुःख जाणिवांचा पिळवटून टाकणारा संघर्षमय प्रयोग साहित्यात प्रयासाने क्वचितच सापडतो. राजकीय हुजरेगिरीत पुढे जाणाऱ्या चार लोकांमुळेच त्यांच्या मागे असलेल्या जनमाणसांचे दुःख झाकले जाते. हीच खरी शोकांतिका प्रत्येक समाजाची नव्हे तर देशाचीही आहे.
लेखकांच्या बालवयातील तरल आठवणी या कवितासंग्रहात डोकावतात. येथील परंपरा व चालीरीती लेखकाच्या स्मरणात राहतात. गावजेवणात लेखकाला मोठ्या लोकांच्या पंगतीत बसता येत नव्हते. पण तो काळ व सद्यस्थितीतील काळ यात खूप बदल झालेले कवीला जाणवतात. ज्या मोठ्या लोकांच्या अंगणात जाण्याची इच्छा व्हायची व त्यांच्या सोबत बसून गप्पा मारायला मन तरसायचे. पण सद्य परिस्थिती पूर्वीसारखी उरलेली नाही. आता कवीच्या सर्जनशीलतेमुळे कवीला मोठ्यांकडून आदर मिळतो. लेकरासारखा लाड केला जातो. बिनधास्तपणे घरादारात प्रवेश दिला जातो. पूर्वीचे भेदभाव आता कालबाह्य झाले आहेत. माणसाची उच्चनिच्चता ती आता प्रतिभा व बुद्धी यावर तोलली जाते आहे.

पीर फकीराच्या मुलाचा सत्कार हा कवितेतून व कवितेमुळे होतो आहे, हे कवीला भुषणावह वाटते.

“चांगुलपणासोबत वाईटपणा येणारच,
दिव्याखाली अंधार राहणारच,
म्हणून काय चांगुलपणा सोडून देणार?
छोट्या-मोठ्या कुरबुरींपायी
मन काय मोडून घेणार?”
किंवा
“पक्क्या विश्वासाची नौका
जेव्हा दोलायमान होते,
रुळलेल्या आयुष्याची वाट
तेव्हा नरकात जाते”

जगणं आणि मरणं यातील अस्तित्व जगूनही शून्य वाटत राहते. जगण्यातल्या जिंकण्याचं मोल निष्प्रभ होत जाते.आयुष्याचा प्रवास खूप लांबचा वाटत राहतो. प्राणी- पशुपक्षी मनसोक्त जगून घेतात. ते आशा-अपेक्षा यांच्या मोहजाळात कधीच अडकत नाहीत. विरान विफल दऱ्याखोऱ्यात ते जगत असतात, कशाचीच चिंता न करता. मग त्यांचं आयुष्य स्वच्छंदी बनून जाते. कोणीही पाठीराखा नसतानाही ते ऊनपावसात कुढत कन्हत नाहीत. जगून घेतात. अनेकदा संकटातूनही सहिसलामत अस्तित्वाला शेवटापर्यंत बिरादरीत निभावून नेतात. एकमेकांच्या सुखदुःखाची भाषा त्यांना कळत असते. प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात. त्यांच्यात वांशीक भेदभाव मुळीच नसतो. प्रेम करणाऱ्यांच्या अंगाखांद्यावर ते खेळतात. पशुपक्षी त्यांना जात, धर्म, वंश, पंथ कधीच विचारत नाहीत.

पण माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर असतो, हे कवीला पावलोपावली लक्षात येते. मग कवीला वाटते निसर्गातली नैसर्गिकता पक्ष्यांत उतरते तर माणसातली माणूसकी माणसात का उतरत नाही ? असा कवी प्रश्नमय होतो-

“शून्य शून्य होत जातं
जगणं आणि मरणंही
आयुष्याच्या मैदानात
निष्प्रभ होत जातं
जिंकणं आणि हरणंही

टाळत नाही दूरदृष्टीदार पक्षी
इतर बिरादरीतील पक्ष्यांना
मृत्यू जवळ असला तरी
जगून घेतात मनासारख्या
सर्वस्तरीय वंशभेदविरहीत दऱ्याखोऱ्या
पाठीराखा तग धरून उभा
नसला तरीही”

किंवा
“आजचं हसत-खेळत जगणं
उद्यावर लोटण्यात
आता मजा राहिली नाही,
कितीही गडगंज सोन्याची आरास
रचून गेले दानी हात स्मशानात
तरीही अखंड चंद्रभागा
वेदनागर्भ डोळ्यांतून कुणाच्या
कधी वाहिली नाही.”

दिवसभर मरमर फिरून जगण्याची तजवीज करताना अनेक अपमान पचनी पडतात.भूक तशीच राहते, अक्राळविक्राळ भयपट भूकेचा बनतो. गुऱ्हाळाचा मिरासदार असलेल्या आप्तेष्टाकडून लुंगीत भीक मागून आणलेला गूळ छपराच्या वाश्याला बांधलेला असतो. वाळून चिपाड झालेल्या मायच्या छाताडावर तो वेदनागर्भ होऊन टपकत राहतो. पण भूक भागवत नाही. बाप गुळाचा खडा खावून भूक पुढे ढकलतो. संपत्ती, संतती व धनवान असूनही उघड्यावर आलेली माणसं समाजात अनेक आहेत. सर्व असून समाधानी नाहीत. कुटकाही गोड लागत नाही. पण भिक मागून आणलेल्या भुकेल्या फकिराची पोरं आणलेल्या भाजी भाकरीची वाटणी बरोबर करतात.उरलेलं उद्यासाठी जपून ठेवतात.

खाण्यासाठी त्यांचे वाटे असतात; पण वांदे नसतात. गरीबी आणि श्रीमंती यातला फरक कवीच्या कवितेतून डोकावतो. गरीबी आकाशात डोकावणाऱ्या विधवा चांदण्यासारखी अश्रू ढाळत राहते. कोणालाही काही कळू न देता.जगणं गरीबीचं जगत राहते. पण श्रीमंती जवळ असूनही पोटचा गोळा सर्व संभाळून दूर लोटताना सूर्यालाही ग्रहण लागते हा भास श्रीमंताला होऊन जातो.कवी हबीब भंडारे लिहितात,

“उगाच वाद नको म्हणून
फकिराचे छोटे छोटे भोंगळे
अनुभवी पोरं करत राहतात
माफक वाटणी दारोदारी बेइज्जतीची
फकिरी मागून आणलेल्या
अमृततुल्य भाजी-भाकरीची आणि
कधीनवत् काळपट भगोन्यात वाट्याला आलेल्या
भीकपरस्त मटणाच्या उकडलेल्या
शिलकीपरस्त बोट्यांची दररोजच्या
दररोज वर्दळी अंगणात बसून
“इतना मेरा, इतना तेरा, इतना अब्बा का, इतना अम्मी का असं म्हणत.”

किंवा

“छप्पराच्या रोशनीदार छिद्रातून दिसणाऱ्या
आकाशातील विधवा चांदण्या
ढाळत राहतात बेलगामी अश्रू
कुणाला काहीही
कळू न देता,
पांघरते सर्वसमावेशक रात्र
फाटलेली चारित्र्यसंपन्न गोधडी
सूर्याला जराही कळू न देता ,
इतर दुरुस्थ ग्रहांना जराही
ढळू न देता

आपलेच जगणे आपणास कळत नसते.कळते तेव्हा ते कसे वळवायचे हे समजत नसते.आडफास्याचे प्रश्न आणि संशयास्पद वागण्यातले गणित कधीच सुटत नसते. आपले अनेक दुःखं इतरत्र कुठेही मांडता येत नाही. पुढारलेल्या जागरहाटी मागासलेल्या काळजाचे अनेक वाटे करण्यासाठी आसुसलेले असतात. जग आपल्या परिस्थीतीबद्दल करुणा भाकते.पण जेव्हा स्वार्थी संदर्भ येतात तेव्हा परिस्थीतीचा फायदा घेऊन जिवावर उठणारे दिसतात.आपले दुःख इतरांना सांगणे म्हणजे अनेक दुःखं अंगावर ओढून घेणं होय असे कवीला वाटत राहते.मग आपले दुःख आपण आपणास सांगणेही वाईट होऊन बसते.

“आपले अनेकवचनी सुख दुसऱ्यांना
तंतोतत तोलता येत नाही
कधीकधी मनातलं सलतं दुःखही
आपल्याच मनाला बोलता येत नाही,
साध्यासरळ रस्त्याने चालताना
संशयास्पद झाले काटक पाय”

भूक आणि जगणं यातील परिमाणे व्यक्त करणारी अनेक पात्र या कवितासंग्रहाचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. यातील मुस्लिम समाजातील मागासलेपणाचे विदारक चित्रण कवी अधोरेखित करतो. भुकेला जात धर्म नसते .भूक ही भूकच असते. आपार कष्ट करून ही भूक भागत नाही. तेव्हा कवी विदीर्ण होतो.माणूस व मानवीय मजबूरीच्या सर्वंकष व्यथेने व्याकूळ होतो.ती व्याकुळता कवीच्या कवितेतून व्यक्त होते.

उष्ट्या प्लेटी धुणारी मुमताज बेगम, मासे विकणारी तरुणी शाहनूरबी, मोरपंख घेऊन आशीर्वाद देत फिरणारा भाबडा फकीर, भंगारवाला अब्दुल ,मशीद व दर्ग्यात खैरात मागणारी हसीनाबी , पिठाच्या चक्कीत काम करणारा इक्बाल, विधवा तरुण अमीनाबी, निर्धन वहिदा, पायांनी अधू मरियमबी व कर्णबधीर हाफीजाबी अशी कंगाल व पोटाच्या खळगीसाठी पडेल ते काम करणारी पात्रं कवितेतून वाचकास एका वेगळ्या व दुर्लक्षित जगाकडे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात.

“जेव्हा आपला आपल्यावरचा
दृढ विश्वास ढळू लागतो,
तेव्हा आपल्यातला परका माणूस
ठळकपणे कळू लागतो.”

किंवा

“गरिबीचा घाम
कपाळाहून वगळोस्तर
चिकन्याचुकन्या प्लेटी धुणारी
जवान मुमताजबेगम

उष्ट्या चिडखोर ताटाचा
कण न् कण
शिळ्या डोळ्यांनी न्याहाळत होती,
दमबिर्याणीच्या सुखासाठी
कर्मठ काळवंडलेली डेग
दम घुटुस्तोर जळत होती”

भूक भयानक असते. कंदुरीच्या शिजणाऱ्या भगोन्याकडे आस लावून बसणे, दर्ग्याच्या पायथ्याशी बसलेल्या हातांचे दुःख जुन्या-नव्या सर्वांना चांगलंच कळत असते. मिनारावर एकट्या बसलेल्या पारव्याच्या डोळ्यांतून आभाळाएवढं सुख गळत असते. गजबजलेल्या जत्रेत हक्काचा माणूस शोधताना आपलं मन कधीकधी बिनमायचं लेकरू होतं. पोटाला दोन घास मिळाले पाहिजेत ही प्रत्येकाची अभिलाषा असते. ती पूर्ण होईल असे नसते.त्यासाठी जगणं शिकावं लागतं.त्यावेळेस वेदनेच्या पिळा निघून जातात. पोटातील कावळे शांत होतात.मग काळजाची भूक काळजाला टाके देऊन भागविल्या जाते.

“ऐपत नसताना खेळलेला जुगारी डाव हा
नशीबाचा कर्मसिद्धांतीय भाग होऊन राहतो,
जसं जमेल तसं
तगडे कष्ट उपसल्यावर,
मेहनतीचा बरकती धागा
काळजात ओवून राहतो.”

सज्जन व नम्रतेचा मेकअप केलेल्या आधुनिक चेहऱ्याखाली विस्तवाचे दाहक संघर्ष ज्वलंत होत जातात. अन्याय अत्याचाराच्या उष्णतेत स्वच्छंदी पाखरं गुदमरून जातात. लोकशाहीयुक्त फडफडणाऱ्या पंखाची धडपड न्यायपरस्त होत जाते. गल्ली – गल्लीतील व मोहल्या – मोहल्ल्यातील मनोविकृत, अविवेकी व दंगलखोर विचार यांना रक्ताचे पाट वाहण्याअगोदर आवर घातले पाहिजेत. त्यांना नेस्तनाबूत केलं पाहिजे. या मातीच्या आधारानं इथं जन्मत राहतात असंख्य मेंदू उघडे-नागडे, कोरे-करकरीत परंतु त्यातील काहीच सत्त्वदार मेंदूना माणुसकीचे बहारदार कणसं लागतात. पण काही थोड्या थोडक्या माणसांमुळे कुटील कारस्थाने करून दंगलीचे राजकारण केल्या जाते. मग पुन्हा त्यात कोरे करकरीत मेंदू दंगलीला बळी पडतात. वाईट करामतीच्या हाताने निर्जीव दगडाच्या जोरावर पहाडाएवढे कारस्थानं करत राहतात. तेव्हा रस्त्यावरचे जिवंत माणसंही निर्जीव होऊ लागतात.

शरीराच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये व्याप्त जखमांचे घाव सोलून निघतात. मनात भरलेल्या ओल्या जखमा आसवांचे ताळेबंद जुळवत राहतात. कधीकधी मनावर बंदिस्त ऑपरेशनची बळजबरी होते. तेव्हा प्रेमाची सुगंधी देवाणघेवाण कामाला येईल का ? असे कवीला वाटत राहते.

“दंगलीचा बुरखा घातलेलं
मानगुटीवर जाम बसलेलं
जातकुळीचं भयावह भूत “

किंवा

“कायमस्वरूपी;
अन् नेहमीकरिता
खुली झाली पाहिजे
प्रेमाच्या अत्तराने भरलेली
सौहार्दाची कुपी!”

एखाद्या वतनदारी खेड्यात नानाविध दिशेला जाणारे रस्ते पसरलेले असतात. प्रत्येक रस्त्याचा चौक जागोजागी मनात आडखुत्यासारखे वैर घेऊन उभा राहतो. वंशीय जातीसंदर्भ पुरवणाऱ्या पिढ्या जागोजागी वस्ती करून असतात. अनेक जुनाट झाडं अनेक पिढ्यांपासून हे मुकपणे पाहत असतात. ते अनेक घटनाक्रमाचे साक्षीदार असतात. कच्च्या-पक्क्या माती दगडांच्या ढासळलेल्या
ढिगात जुनाट घरांच्या घोळक्यात नवीकोरी एक पवित्र मशीद व एक पवित्र मंदिरही असते. ते मजबूत व अनेक नुतन रंगानी रंगवलेले नवेकोरे व उठावदार दिसते.

आशाळभूत नजरेने पाहणारी पाखरं तेथील प्रार्थना व अजान नेहमी ऐकत असतात. ते जातीधर्मातील भेदभावाच्या परंपरागत गप्पा मुकाट्याने ऐकून घेत असतात. त्यांच्यातील खुपरी गऱ्हाणी व भाषा ती कुठेतरी आगीची ठिणगी पेटवत असते.

“कधी पवित्र मंदिराच्या सुखदायी कळसावर बसून,
तर कधी पवित्र मशिदीच्या आनंददायी मिनारवर बसून
किंवा त्याहून अधिक तोच तो सांप्रदायिक वारा
वाहत राहतो

कधी जिवाभावाच्या फकीरवाड्यातून
कधी आधारवड पाटलांच्या वाड्यांतून
नियमित निरंतर
माणुसकीचं रोमहर्षक गाणं
आशयगर्भ पानापानांत लिहून,
तसेच रुजवलेलं काळजाचं नातं
हरेक मनामनात ठेवून”

शेळ्या-बकऱ्या रानोमाळ चरायला नेताना बापाचा पाय मुरगळतो.कधी पायाला काटे मोडतात, बोचतात. कधी कुरुपं बनतात. तरी बापाचं काळीज कधी डगमगत नसते. मजुरी करून घरी परतताना मानेच्या शिरांना बाधलेला भलामोठा भारा मायच्या डोक्यावर असतो. शिरा ताणून तिची मान बसून जाते. उसणवारी आणलेलं घासलेट मानेला चोळूनही मान भुगीरच असते. ताणलेल्या शिरा जाग्यावर येत नाहीत. तेव्हा ती औषधी झाडपाला लावून व दगड विटा तापवून शेकते. मग हळूहळू उतरत जाते मायच्या जखमेची ठणक. अन् आखडलेली मायची मान व बापाचा मुरगळलेला पाय दुरुस्त होऊन जातो घरातल्या घरात. हे सारं जगणं खडतर असूनही मायबाप निमूटपणे जगत राहतात.सर्व दुःख स्वतःच्या हिंमतीने पेलत राहतात. कधीकधी या हलाखीत माय कवीला प्रश्न करते-

माय म्हणायची,
“आदमी कमायेंगा तो खायेंगा,
बिना मेहनत के किसको भायेंगा
हबीब आता तूच खरं खरं सांग,
कधी फिटल रं फकिराचं पांग!”

कवितेत असंख्य प्रश्नांच्या भुलभुलय्या आहेत. कवितेत येणारे दुःख हे मुस्लिम समाजातील गोरगरीब व विफल जगण्यातलं मानसशास्त्र होऊन जातं. कवितेतून आलेली व्यापक दृष्टी हे वेगवेगळ्या भावनांचे वास्तवदर्शन घडवते.पीडीत व दुबळे यांचे वास्तवरूप कवितेतून कवी प्रतिमा व प्रतिकं वापरून ती दुःखे जशाच्या तसे वाचकांपुढे ठेवतो.मागील दोन दशकांपासूनच्या कविता या संग्रहात आलेल्या आहेत. दोन दशकातील पूर्वार्ध व उत्तरार्ध यातील बदलते जीवन या कवितेतून येते. बदलता काळ यातील सेतू होऊन कविता जुन्या व नव्या बदलातले फरक मांडते.

प्रत्येक कवितेतील मुख्य पात्र येथील सामान्य श्रमिक माणूस यांच्या जगण्यातले वैशिष्ट्ये वाटते . त्यांचं सात्विक, निरागस , प्रेमळ, इज्जतदार व निरूपद्रवी वागणं ह्या कवितेचा आत्मा आहे. कवितेत येणारी सर्व पात्र जरी मुस्लिम असली तरी प्रत्येक कवितेतून मुस्लिम जगण्यातील सुफी परंपरा व धर्मनिरपेक्षता हे कवितेचं प्रतिबिंब वाटते.

गरीब , कंगाल, लाचार, निराधार व हातावर पोट भरणारी इज्जतदार माणसं तारेवरून चालताना माणुसकीचे सत्व कधीच सोडत नाहीत, अशी माणसं हबीब भंडारे यांच्या कवितेत येतात.
कविता प्रेमात भरकटत नाही. झाडाफुलात रमत नाही. प्रेमाच्या संदर्भाने येणाऱ्या प्रतिमा व प्रतिकाच्या गूढ जगात ही कविता वावरत नाही. कोणावर टीकाटिप्पणी करत नाही. कष्टकऱ्यांचे वास्तव जगण्याचं आत्मभान जपते. जगापुढे त्यांचे वास्तव मांडते. जगण्याच्या व पोटाच्या घालमेलीत जगणं विकणारी माणसं या कवितेत येतात. पोटाच्या खळगीसाठी ती हक्क व अधिकार विसरून पोटासाठी पडेल ते काम करताना दिसतात.

हबीब भंडारे यांचा ‘मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं’ हा कवितासंग्रह ‘जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता’ याच चाकोरीतला आहे. पण या समग्र मुस्लिम समाजातील उपेक्षित अंतरंगाचे दर्शन या कवितासंग्रहातून होते. सामाजिक उपेक्षितांचे संदर्भ या कवितासंग्रहात येतात. ते उपेक्षित जगणं व त्याविषयी जागृती कोठेच होताना दिसत नाही. ते उपेक्षित जगणं कवडीमोल विकणारी माणसं या कवितेचं प्रतिनिधित्व करतात. हबीब भंडारे हे मातृप्रेमात वाढलेले कवी आहेत. त्यामुळे बऱ्याच कवितेतून मातृभाव डोकावताना दिसतो. उन्हातान्हात पायाला झाडाची पानं बांधून जगणं सुसह्य करत दिवसभर रानोमाळ काम करणाऱ्या कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व ह्या कविता करतात.

डॉ. पी. विठ्ठल सरांची चिंतनशील, अभ्यासपूर्ण प्रस्तावना कवितासंग्रहाचा आत्मिक गाभा यशस्वीपणे उलगडून दाखवते, तसेच संग्रहातील कवितेचं गुणात्मक वेगळेपण स्पष्ट करते.

कवितासंग्रह : ‘जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता’
कवी : हबीब भंडारे
प्रकाशक : गोदा प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे : १७६, किंमत – २५० रुपये

Related posts

विकासासाठी परिवार संकल्पना

Neettu Talks : भावनावर कसे नियंत्रण मिळवायचे ?

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More