November 27, 2022
Kartik happy movement article by Meera Tashi
Home » मोहमयी कार्तिक…
मुक्त संवाद

मोहमयी कार्तिक…

निळं आकाश हळूहळू अगदी काजळा सारखं गडद काळं होतं. तारांगणातील नक्षत्रं ठळकपणानं दिसायला लागतात. कुठल्या अज्ञात प्रदेशातून ही रात्र आली की काय असे वाटते. पहाट देवतांच्या काकड आरतीने सजते. कार्तिकात भल्या पहाटे उठण्याचे केवढे महत्व.

मीरा उत्पात-ताशी,
9403554167

शरद हेमंतांच्या संधीकालाच्या खुणा भोवताली दिसत आहेत. अपुऱ्या दिवसांमुळे इकडे तिकडे बघेपर्यंत सांजावून येतं. सकाळी सूर्य धुक्यातून वाट काढत वर आल्यावरच दृष्टीस पडतो. शरदाच्या चांदण्यांनी भिजलेले, धुक्याची तलम ओढणी पांघरलेले, हव्या हव्या अशा गुलाबी थंडीने सजलेले हे कार्तिकातले दिवस पाहता पाहता संपून जातात. सगळे प्रहर कसे रमणीय असतात. धूसर कोवळी सकाळ. प्रसन्न दुपार. निळी संध्याकाळ आणि चांदण्यात न्हालेली रात्र!! या दिवसांना विलक्षण धुंदी आहे. आणि रात्रीची जादू तर केवळ अलौकिक आहे. निळं आकाश हळूहळू अगदी काजळा सारखं गडद काळं होतं. तारांगणातील नक्षत्रं ठळकपणानं दिसायला लागतात. कुठल्या अज्ञात प्रदेशातून ही रात्र आली की काय असे वाटते. पहाट देवतांच्या काकड आरतीने सजते. कार्तिकात भल्या पहाटे उठण्याचे केवढे महत्व. या दिवसात पंढरपूरात देवळाभोवतीच्या घरांमधून भल्या पहाटे काकड आरतीचे भक्तिमय स्वर निनादत असत. कार्तिक स्नान करून मंडळी लगबगीने देवळात विठूरायाला उठवायला येत. कानाभोवती घट्ट उबदार उपरणं बांधलेला, काश्मिरी शालीत लपेटलेला विठुराया मोठा गोड दिसत असे. त्याला लोणी खडीसाखर देऊन उठवताना तो खरोखर साखर झोपेतून जागा होतो आहे असे वाटत असे. त्याला आळवताना म्हटलेली पदं फार गोड असत. काकडा ओवाळताना लवलवणाऱ्या ज्योती मुळे त्याचं दिसणार सौम्य, प्रसन्न मुख पाहून खरोखर आपल्या जन्माचं सार्थक झालं असा नित्य अनुभव येई.

कार्तिक पौर्णिमेला आई, काकू बरोबर चंद्रभागेला जायचे. द्रोणात दिवे लावून हळुवारपणे नदीत सोडायचे. शांत संथ जलप्रवाह, हलक्या वाऱ्यावर तुलणाऱ्या लवलवत्या दिव्यांच्या सौम्य ज्योती, मागे घाटावर उजळलेले असंख्य दिवे, माथ्यावर पूर्ण दीप्तीने झळणारा चंद्र आणि लक्ष चांदण्यांनी लखलखणारं आभाळ. सारं सौंदर्य धनीभूत होवून भोवताली वावरत असे. इतकं की वर्णन करायला शब्द थिटे पडावेत!!

या मोहमयी कार्तिकाला महर्षी वाल्मिकी, कालिदास भवभूती इत्यादी अनेक कवींनी शब्दात बांधलं आहे.
ज्योत्स्नादुकूलममलं रजनीदधाना वृद्धिं प्रयान्यनुदिनं प्रमदेव बाला
चांदण्यांचं शुभ्र धवल वस्त्र परिधान करून प्रतिदिन वृद्धिंगत होणाऱ्या नवयौवने प्रमाणे रात्री प्रदीर्घ सुंदर होत आहेत. असं म्हटलं आहे.
आजच्या कवींमध्ये ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या दोन कविता या दिवसांचे वर्णन वाचताना एक विलक्षण सौंदर्यानुभूती देतात.
शेला या कवितेची सुरुवातच

निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धूसर झगमगते अन् नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर

अशी वेगळ्या स्वप्नील वातावरणात नेते.
चारूदत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलून तो हृदयाशी धरला
असा सुंदर शेवट क्षणार्धात आपल्याला वेगळ्या दुनियेत नेतो.
दुसऱ्या कवितेत त्या या दिवसांतल्या दुपारीचे ऊन तापलेल्या दुधासारखे हळुवार आहे. आणि ढग

दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी

असे आहेत.

दिस भरलेली काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार

अशी दिवस भरलेल्या गर्भारशी स्त्री सारखी रम्य दुपार आहे असं म्हणतात.
काय शब्द आहेत!! किती रमणीय, नितांतसुंदर!!
या दिवसात या भावविभोर कविता वाचताना विलक्षण अनुभूती येते..
या सगळ्या आठवणी आठवत काल संध्याकाळी घरा जवळच्या तळ्याकाठी बसले होते. समोर निवळशंख पाण्यातली वाऱ्यावर डुलणारी कमळ फुलं पाहून, निळ्याशार पंखांची लयदार नक्षी उमटवत उडणाऱ्या तास पक्षाला पाहून कार्तिकाचं सौंदर्य दृगोच्चर झालं…

Related posts

बोराडे गुरुजींनी दाखविली ‘शाळेची वाट’

यात्रेकरूंचा भारत

भावगर्भ, अर्थगर्भ, चिंतनशील कवितासंग्रह

Leave a Comment