November 21, 2024
Dalvatne army base witness the pre-consecration events of Sri Shivarajyabhishekh
Home » श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार दळवटणे सैन्यतळ
विशेष संपादकीय

श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार दळवटणे सैन्यतळ

श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार दळवटणे सैन्यतळ

शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेकपूर्व महिनाभर चिपळूणला दळवटणे रेवेचा माळ (हलवर्ण) भागात सैन्यतळाचा मुक्काम केला होता. ‘दळवटणे सैन्यतळ’ हा श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार आहे. या भूमीला स्थानिकांकडून आजही कुदळ लावले जात नाही, इतकी अपार श्रद्धा समाज बाळगून आहे. दळवटणेच्या रेवेचा माळ भागातील या सैन्याला व सैन्यतळाचा उद्देशून ९ मे १६७४रोजी महाराजांनी लिहिलेलं पत्र हे ‘प्रजाहितदक्ष आदर्श राज्य कसं असावं?’ याचं जगातील सर्वोत्तम उदाहरण आहे. सैन्यतळाच्या बाजूने वाशिष्टी नदी वाहते. ‘कोयना अवजल’कृपेने बारमाही वाहत्या असलेल्या या पात्राचा उपयोग करून या ठिकाणी ‘हेरीटेज’ अंगाने पर्यटन विकास होण्याची आवश्यकता आहे.

vashisti River
Vashiti River

भारताच्या इतिहासाची पाने उलगडताना आरमारासह शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीययंत्रणेचा सुसंघटित वापर करून बलाढ्य हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे राजे म्हणूनछत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे स्थान अग्रेसर आहे. महाराजांचा राज्याभिषेक या ऐतिहासिकघटनेला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीशिवराज्याभिषेकपूर्व दिवसात चिपळूण येथे महाराजांच्यासैन्याची छावणी पडलेली होती. आपल्या सैनिकांची एकदा पाहणी करावी असे त्यांच्या मनात होते. तेव्हा महिनाभर महाराजांनी चिपळूण येथे मुक्काम केला होता. ८ एप्रिल १६७४ रोजी महाराज चिपळूणच्या लष्करी छावणीकडे गेले होते. ११ एप्रिल १६७४ रोजी त्यांनी दळवटणे सैन्यतळाची पाहाणी केली होती. १८ एप्रिल १६७४ रोजी ‘हंबीरराव’ मोहिते यांना ‘सरसेनापती’पदाची वस्त्रे बहाल केली होती. येथे महाराजांची १० हजारावर फौज होती. महाराजांनी इथल्या रामतीर्थ तलावात स्नान करून श्रीरामेश्वर, श्रीगांधारेश्वर आणि श्रीपरशुराम दर्शन घेतले होते. याच दळवटणेच्या (हलवर्ण) रेवेचा माळ भागातील या सैन्याला उद्देशून ९ मे १६७४रोजी महाराजांनी लिहिलेलं पत्र हे ‘प्रजाहितदक्ष आदर्श राज्य कसं असावं?’ याचं जगातील सर्वोत्तम उदाहरण आहे. एका अर्थाने‘दळवटणे सैन्यतळ’ हा श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार आहे.

Ghodebav
Ghodebav

विहिराला घोडेबाव म्हणतात कारण…

जावळी जिंकल्यानंतर राजांनी कोकण काबीज करायला सुरुवात करताना १६६०मध्ये चिपळूण येथील गोवळकोटच्या खाडीत वसलेला गोविंदगड आणि गुहागर मधील गोपाळगड स्वराज्यात घेतला. त्यानंतर महाराजांनी चिपळूण येथील दळवटणे येथे घोड्यांच्या पागा बसवल्या होत्या. आजही शहरात तत्कालिन हत्तीमाळ, पागा हे शब्द वापरात आहेत. दळवटणे येथील रेवेच्या माळावर घोड्यांच्या पागा होत्या. या पागांमाधील घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय बाजूलाच एका घोडेबावीत केली जात असे. आजही त्या विहिरीला ‘घोडेबाव’ म्हणतात. वाशिष्टी तीरावरील या विस्तीर्ण रेवेच्या माळावर सध्या पागांचे कोणतेही अवशेष नाहीत. मात्र सैन्यतळाच्या या जागेला स्थानिकांनी मागील साडेतीनशे वर्षांत कुदळ लावलेले नाही. गेली कित्येक वर्षे ‘घोडेबाव’च्या पाण्याचा वापर कोणीही करत नाही. १६६१ला कारतलबखानाचा पराभव केल्यानंतर निजामपूरहून ते दाभोळला आले. त्यांनी श्रीदाल्भ्येश्वराचे दर्शन घेतले. दाभोळला योग्य अधिकारी, दोन हजार सैन्य, व्यवस्थेसाठी ठेवून महाराज तीन चार दिवसांनी चिपळूणला आले. चिपळूणला महाराजांनी भगवान श्रीपरशुरामाचे दर्शन घेतले होते. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी सरनौबत प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले. १९मार्चच्या सुमारास महाराजांच्या चौथ्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा मृत्यू झाला होता. महाराजांचा राज्याभिषेक जवळ येऊन ठेपला होता. तथापि महाराजांची कार्यव्यग्रता आणि मानसिकताण जराही कमी झालेला नसावा.

श्रीशिवराज्याभिषेकपूर्व दिवसात चिपळूण येथे सैन्याची छावणी पडलेली असताना आपल्या सैनिकांची एकदा पाहणी करावी असे राजांच्या मनात होते. त्याप्रमाणे ८ एप्रिलला महाराज रायगडाहून चिपळूणला आले. ११ एप्रिलला ते हलवर्ण (दळवटणे) लष्करी छावणीकडे गेले. त्यांनी येथील लष्कराची पाहणी केली. खजिना फोडून लष्कर व पायदळलोकांस महाराजांनी वाटणी केली. चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्यात नव्या नेमणुका करुन टाकल्या. लष्करास सरसेनापती नव्हते. कोणास करावे? हा प्रश्न होता. तेव्हा १८ एप्रिल रोजी महाराजांनी ‘हंबीरराव’ मोहिते यांना ‘सरसेनापती’पदाची वस्त्रे बहाल केली. २४ एप्रिल रोजी महाराजांनी स्वतः स्वारी करून वाईजवळचा केंजळगड जिंकला. महाराजांनी वाऱ्याच्या वेगानं केंजळगडावर केलेलं आक्रमणइतकं अचानक होतं की, कृष्णा आणि नीरा नद्यांच्या खोऱ्यातल्या केंजळगडावरील आदिलशहाच्या किल्लेदाराला आणि सैन्याला लढाईसाठी सज्ज होण्यासही वेळ मिळाला नव्हता.

दळवटणे (हलवर्ण) फौजेस पत्र…

२५ एप्रिल रोजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी सिंहासन बनवले. २६ एप्रिल रोजी कारवारवर स्वारी केली. ९ मे रोजी महाराजांनी दळवटणे (हलवर्ण) फौजेस पत्र पाठवले. तेव्हा उन्हाळ्यानंतर सैन्य घरोघर रजेवर जात नसे. काही ठिकाणी पावसाळ्यात छावणीस राहात असे. चिपळूणचे मराठी सेनेचे सैन्य पावसाळी छावणीसाठी हलवर्ण (दळवटणे) येथे गेली होती. चिपळूणला श्रीपरशुरामाचे दर्शन घेऊन महाराज प्रतापगडावर आले. १९ मे रोजी महाराजांनी प्रतापगडावरील श्रीतुळजाभवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण करून मंगलकलश प्रस्थापित केला. २१ मे रोजी महाराज प्रतापगडावरून रायगडला परतले. २९ मे रोजी महाराजांची रायगडावर मुंज झाली. ३० मे रोजी विनायक शांती विधी, ३१मे रोजी विविध शांती विधी, १ जून रोजी दानधर्म केला, २ जून रोजी नक्षत्रयज्ञ, उत्तरपूजन विधी होऊन ४ जूनला महाराजांची सुवर्णतुळा करण्यात आली. ६ जून १६७४ (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी हिंदूराष्ट्रसंस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा रायगडावर पहाटे ५ वाजता राज्याभिषेक झाला होता.

शेतकरी वर्गाचे ‘मृगसाल’ प्रमाणित धरून ‘शिवशक’

आपल्या भारतीय संस्कृतीने पर्यावरणाचा विचार दिला आहे. श्रीशिवराज्याभिषेक आणि जागतिक पर्यावरण दिन एकाच सप्ताहात येतात. महाराजांच्या काळात लिहिल्या गेलेल्या लेखनात ‘झाडांचे महत्व थोर आहे.’ दुष्काळाची भीषण वर्णनं आपल्याला इतिहासात भेटतात. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा बारकाईने विचार केलेला होता. याचे शिवचरित्रात उल्लेख आहेत. छत्रपतींचा जन्म १६३० सालचा! १६३० साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. धान्य महाग महाग तैसे तीही मिळेना ! कैसे होईल होईल, होईल कळेना ! अशी स्थिती होती. एका होनाला (सोन्याचे नाणे) सहा पायली धान्य मिळत होतं. माणसं माणसाला खातील अशी अवस्था आलेली होती. लोकं गावं सोडून गेलेली होती. दुष्काळी स्थिती सावरल्यावर ती परत येत. महाराजांकडे पुन्हा त्या भूभागाची, सहकार्याची मागणी करत. नुसतं दाट जंगल असेल नी माणसं नसतील तर चालणार नाही हाही विचार जुन्या काळात होता. शेतकरी वर्गाचे ‘मृगसाल’ प्रमाणित धरून शिवरायांनी आपला ‘शिवशक’ सुरू केला होता. ‘राई म्हणजे वनराई’ तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित महाराजांनी चलनी नाण्यांना ‘शिवराई’ संबोधलं असावं. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. पुण्याजवळच्या ‘शिवापूर’ गावात राजांनी दाट शिवराई सजवली होती. आजही त्यातली काही झाडे असावीत. त्यानंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला सागवानाची लागवड केलेली होती. समुद्रातील जहाजे बनविण्याकरिता ते लाकूड लागायचे. दुर्दैवाने पुढे इंग्रजांनी ते साग ते तोडले.

गडावर आधी उदक पाहून किल्ला

महाराजांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला होता. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडकफोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ दुर्गम ‘राजधानी’ रायगड करण्यामागे पर्यावरणीय विचार होता. ‘रयतेचे भाजी देठास हातही लावू नद्यावा’ हा विचार करणारे महाराज होते. महाराजांचा ‘गनिमीकावा’ जंगलांवर अवलंबून होता. इतका की महाराजांच्या पश्चात १६८२ ते १७०७ पर्यंत मराठीमुलुख जिंकण्याकरिता औरंगजेब धडपडत राहिला होता. मराठी माणूस आणि इथल्या वृक्षसंपदेने त्याला हरवलं होतं. हे ‘गनिमी कावा’ युद्धतंत्र महाराजांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करून विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांचीतुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा महाराजांनी योग्य उपयोग करून घेतला. आदिलशहा सरदार अफजलखान याचा१० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, २ फेब्रुवारी १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलबखान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे आहेत.

रयतेस काडीमात्र तोशीस देऊ नये

दळवटणे (हलवर्ण) छावणीस उद्देशून लिहिलेले पत्र हे महाराजांच्या विशाल लष्करी दूरदृष्टीचा, प्रजाहितदक्ष राजा कसा असावा याचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. महाराजांनी लष्करातील जुमलेदार, हवालदार, कारकून व शिपाई पेशाच्या लोकांनी, आपल्या फौजांनी आपल्या राज्यात ‘कसे वागू नये’ हे यात सांगितलं आहे. हे पत्र शिवछत्रपतींनी सांगितले आणि चिटणीस बाळाजी आवजी यांनी लिहिले असल्याचे इतिहासाचार्य राजवाडे यांनी नमूद केले आहे. दळवटणे (मौजे हलवर्ण तहसिल चिपळूण) येथे दाभोळ मामल्यातील मुक्कामी फौजेला, जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना उद्देशून महाराजांनी ९ मे १६७४ रोजी पत्र लिहिले. मध्ययुगीन काळात पावसाळ्यात मराठ्यांच्या फौजा स्वगृही मुक्कामाला असत. पावसाळ्याच्या तोंडावर पाऊस काळासाठी साठवलेले घोड्यांसाठी दाणा आणि वैरण संपले व तशातच वैशाखाच्या दिवसात उन्हाळ्यात पण घोड्यांच्या पागेस ओढ पडली. कारकून व गडकरी लोकांनी असे-तसे करुन दाणा, वैरण, गवताची बेगमी केली. तेव्हा समस्त शिपाईगड्यांनी या बिकट दिवसांत सावधतेने या सामग्रीचा वापर करावा. मन मानेल तसे वागलात तर भर पावसात काहीच घोड्यांना मिळणार नाही आणि घोडी उपासमारीने मरु लागतील. तेव्हा घोडी तुम्ही मारली असे दिसेल. त्यावरून तुम्ही कुणा कुणब्याचे घर लुटू पहाल तर जे कुणबी लोकं राहिली आहेत ते पण स्वराज्यातून परागंदा होतील. कित्येक उपाशी पोटी मरायला लागतील. अश्यावेळी त्यांना वाटेल की यापेक्षा मोगलाई बरी होती. त्या उपर तुम्ही लोकं आहात असे वाटायला लागेल. त्यांचा तळतळाट लागून शेवटी घोडी पण राहायची नाहीत आणि रयतही राहायची नाही. त्यामुळे रयतेस काडीमात्र तोशीस देऊ नये. जे काही कमी पडेल ते राजाच्या खजिन्यातून घ्यावे. घोड्यांना दाणा, गवत तसेच फौजेला भाजीपाला, धान्य जे लागेल ते बाजारात जाऊन विकत घ्यावे. पण रयतेला लुटून ते घेऊ नये. जे गवत तुम्ही घोड्यांना साठवताहात ते जर निष्काळजीपणामुळे आगट्या लावून खाक झाले तर मग कसली पागा आणि कसले घोडे राहतील. असे झाले तर मग तुम्ही कुणब्यांना मारले आणि कारकुनास धमकावले तरीही तुम्हाला लाकूडफाटा कोणी देणार नाही. घरात दिवा जळत असेल तर त्याची वात उंदीर पळवून नेईल आणि आगीचा दगा होईल. त्यामुळे तुम्ही दाणा आणि गवत वाचेल ते उपाय करणे जेणेकरून पावसाळ्यात घोडी वाचतील. त्यामुळे असा जो कोणी गैरप्रकार करेल त्याची बदनामी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि मराठ्यांची इज्जत राहणार नाही. असा या पत्राचा साधारण सारांश आहे. या पत्रातून महाराजांची सैन्याप्रति असलेली पोटतिडीक, रयतेबद्दलअसणारी तळमळ आणि सूक्ष्म दीर्घ दूरदृष्टी दिसून येते.

‘दळवटणे सैन्यतळ’ साकारण्याचा निर्णय

या साऱ्या इतिहासाचा, पत्राचा परामर्श घेऊन कोकणातील चिपळूण शहराचे भूषण असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या वस्तूसंग्रहालयात ‘दळवटणे सैन्यतळ’ साकारण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिल २०२३रोजी, त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम ज्ञानपूजकाचा वारसा सांगणाऱ्या ‘तंजावूर’ घराण्यातील विद्यमान राजे श्रीछत्रपतीशिवाजी महाराज आणि ‘सरसेनापती’ हंबीरराव मोहिते यांच्या वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला होता. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्तान (चिपळूण विभाग) आणि दुर्गसेवक दळवटणे यांनी‘दळवटणे सैन्यतळ’ (रेवेचा माळ) येथेगतवर्षी प्रथमच महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला. स्थानिक पातळीवर ‘दळवटणे सैन्यतळ’ विषयी जनजागरण सुरु आहे. कोकणची भूमी ‘पर्यटन’ अंगाने विकसित करण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु आहेत. जगभ्रमण करणारा पर्यटक हा ‘हेरिटेज’च्या प्रेमात अधिक असतो. याचा विचार करता, ‘दळवटणे सैन्यतळ’ची हेरिटेज म्हणून विकास व्हायला हवा.

धीरज वाटेकर, चिपळूण


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading