पाण्याची गरज लक्षात घेता किल्ल्यावर प्रामुख्याने दगडाचे खोदकाम करून तलाव निर्माण केले जात असत. हाच खोदकाम केलेला दगड विविध बांधकामासाठी वापरला जात असे. अशा प्रकारे एका कामाचा दुहेरी फायदा मिळविला जात असे.
– प्रमोद जाधव
उपायुक्त,
समाज कल्याण विभाग
सिंधुदुर्गनगरी – छत्रपती शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन कसे होते याचे उदाहरण त्यांनी किल्ले बांधणीसाठी दिलेल्या अज्ञापत्रामध्ये दिसते. “आधी खडक फोडुनी तळी बांधावी” असे अज्ञापत्रच त्यांनी दिले होते, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषि महाविद्यालय, किर्लोस येथे आयोजित केलेल्या व्याख्यानावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
श्री जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व किल्ले आपणास सदैव प्रेरणा देतात. हे किल्ले दुर्गम भागात बांधलेले होते. या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात अश्वदळ, सैनिक व नागरिकांचे वास्तव्य असायचे. त्यांची पाण्याची गरज लक्षात घेता किल्ल्यावर प्रामुख्याने दगडाचे खोदकाम करून तलाव निर्माण केले जात असत. हाच खोदकाम केलेला दगड विविध बांधकामासाठी वापरला जात असे. अशा प्रकारे एका कामाचा दुहेरी फायदा मिळवीला जात असे.
असा बांधला गेला गंगासागर तलाव
हिरोजी इंदूलकर यांच्या देखरेखीखाली स्वराज्याची राजधानी रायगडावर बांधकाम सुरू झाले. लहान मोठ्या तिनशे इमारती व विविध वास्तू बांधण्यात आल्या. यासाठी लागणारा दगड काढल्याने मोठा खड्डा तयार झाला. याला एका बाजूने व्यवस्थित बांध बांधण्यात आला. हाच गंगासागर तलाव होय. हा आजही कधीही अटत नाही. हिरकणी बुरुज बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडाच्या खोदकामामुळे तयार झालेल्या खड्ड्याला श्रीगोंदा तलावाचे स्वरुप देण्यात आल्याचेही श्री. जाधव यांनी सांगितले.
सकारात्मक व सुक्ष्म विचार
निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी !! असे शिवरायांचे वर्णन करण्यात येते. शिवराय आग्रा येथे नजर कैदेत असताना त्यांनी हिरोजी इंदूलकर यांना पत्र पाठविले होते. त्यात ते लिहतात, “आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले हे बरे जाणणे, अवघे काम चखोट करणे… वाळू गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे. खारटाण धुतले जाईल. ती धुतलेली वाळू वापरणे.” शिवराजांच्या भोवती पाच हजार मोगली सैनिकांचा वेढा होता. अशा परिस्थितीतही ते सकारात्मक व सुक्ष्म विचार करीत होते. सध्याच्या लॉकडॉऊनच्या काळात त्यांचा हा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे आवाहनही श्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन तंत्र आज वापरण्याची गरज
शिवकालीन जलसंचय व्यवस्थापनाचे तंत्र आजही दगडखाणी खणताना दुहेरी फायदा मिळवण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रत्यक्ष वापरात आणले पाहिजे, असे सांगून श्री जाधव पुढे म्हणाले की, त्यामुळे शिवकालीन जलसंस्कृतीचा वारसा देखील जतन करता येईल. महाराष्ट्राच्या 82 टक्के भूभागात बेसॉल्ट प्रकारचा काळा कठीण दगड आढळतो. बेसॉल्टची पाणी साठवण्याची क्षमता 5 टक्के पेक्षा कमी आहे. फारसे पाणी न मुरणे या वैशिष्ट्याचा सकारात्मक विचार करता हा दगड तलाव खणण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे कल्पकतेने उपयोग केल्यास दगड खाणीत पाण्याचा साठा करणे सहज शक्य आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन तंत्र आजच्या काळात कसे वापरता येईल याचे सविस्तर विवेचन केले. तसेच काही यशस्वी उदाहरणेही दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 comments
छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ठ स्थापत्य व जल अभियंता होते. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आजच्या स्थापत्य अभियंत्यानी गड किल्ल्यांचा अभ्यास केला पाहीजेत.
लेखकाने सुंदर विचार मांडले आहेत. पुढिल लिखानासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐🌹🌹
छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ठ स्थापत्य व जल अभियंता होते. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आजच्या स्थापत्य अभियंत्यानी गड किल्ल्यांचा अभ्यास केला पाहीजेत.
लेखकाने सुंदर विचार मांडले आहेत. पुढिल लिखानासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐🌹🌹