July 27, 2024
Makar Sankranti which preserves the relationship with the soil
Home » मातीशी नातं जपणारी मकर संक्रांत
मुक्त संवाद

मातीशी नातं जपणारी मकर संक्रांत

आता आधुनिक युगात आवा नसला तरी संक्रांतीच्या निमित्ताने आवश्यक भेट व संसारोपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण वाणाच्या रुपातून होते. संक्रांतीच्या सणात मातीच्या छोट्या भांड्याचे महत्व आजही अबाधित आहे…एकूणच मातीशी नातं जपणारा सण म्हणजे मकर संक्रांती.

प्रशांत दैठणकर

आपण पृथ्वीतलावर राहतो त्यात आपले जीवन चक्र सुर्याभोवती पृथ्वीच्या भ्रमणावर अवलंबून आहे. आपण जीवनात सोयीचे म्हणून ग्रेगरियन कॅलेंडर वापरत असलो तर आपले भारतीय सौर कॅलेंडर वापरत असलो तर आपली भारतीय सौर कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका देखील महत्वाची आहे. त्यात आपण मौसमी हवामानाच्या प्रदेशात राहतो त्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे.

साधारणपणे ग्रेगरियन कॅलेंडरच्या 21-22 डिसेंबरला पृथ्वी भ्रमण करताना सूर्याची ‍किरणे 23.5 दक्षिण या मानीव अक्षांश रेषेच्या जवळ लंब स्वरुपात पडायला लागतात यालाच उत्तरायण आरंभ म्हटले जाते.

पृथ्वीवरुन याचा अनुभव घ्यायचा तर दररोजच्या सूर्योदय आपण बघितल्यास कळेल की सूर्य उगवतो ते ठिकाण हळूहळू उत्तर दिशेला सरकते. याच वेळी मराठी कालगणेत पौष महिना सुरु असतो. पौष महिन्याच्या उत्तरार्धीत अष्टमीचा दिवस म्हणजे सूर्याच्या धनू राशीतून मकर वृत्तात प्रवेश करण्याचा दिवस या अर्थाने मकर संक्रमण अर्थात संक्रांतीचा सण.

आपल्या कृषीप्रधान देशात दोन हंगामी पीक पध्दती आहे. यातील खरीपाचा हंगाम 7 जूनला मृग नक्षत्रापासून सुरु होतो. त्याची पीक काढणी अर्थात सुगीचा हंगाम म्हणजे आपला दसरा दिवाळीचा सण कालावधी याप्रमाणे रब्बी हंगाम झाल्यानंतर सुगी या संक्रांती उत्सवाच्या काळात असते.
देशभरात हा सुगीचा हंगाम एकत्र साजरा होतो मात्र याचे स्वरुप वेगवेगळे असते इतकेच नव्हे तर बाहेरील देशांमध्येही हा सण साजरा होतो. याची नावे देखील वेगळी आहेत.

पंजाब आणि हिमाचल प्रदेशात याला लोहडी किंवा लोहळी म्हणतात ‍ हिवाळ्यातील सर्वात थंड अशा दिवशी मुले शेकोटी पेटवतात यात उसाचे पेर, तांदूळ आणि तीळ टाकण्याची पध्दत आहे.
पूर्व भारतातील नावे अशी बिहार संक्राती व खिचडी, आसाम भोगाली ‍ (बिहू),‍ पश्चिम बंगाल आणि ओदीशा मकर संक्रांती.

राजस्थान आणि गुजरातसाठी हा पंतगनो त्योहार असतो. या दिवशी गहू आणि बाजरीची खिचडी हा बेत खास असतो. गुजरातमध्ये याला उत्तरायण असे नाव आहे. या सणाच्या निमित्ताने येथे पतंगाच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात पर्यटक सहभागी होतात.

कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात ही संक्रांत तामीळनाडूत मात्र पोंगलचा सण असतो. पोंगल तीन दिवसांचा उत्सव आहे ज्या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक कचरा जाळला जातो तो भोगी पोंगल. दुसऱ्या ‍दिवशी सूर्य पोंगल असतो. तांदूळ, गुळ, दूध यांची खीर केली जाते. ‍तिसऱ्या दिवशी मडू किंवा कननू पोंगल. घरातील पाळीव प्राणी पूजन व भावासाठी प्रार्थना ओवाळणी करणे असा हा पोंगल. शबरीमला मंदिरात हा उत्सव मकर वल्लाकू म्हणून साजरा होतो.

भारताबाहेर नेपाळमध्ये याच नाव माघी आणि मघी संक्रांती असे आहे. थायलंड मध्ये याचे नाव सोन्क्रान आहे तर म्यानमार मध्ये ‍ थिंगयान आणि लाआर्स मध्ये संक्रांत पीमालाओ नावाने साजरी होते.

महाराष्ट्रात पारंपारिक पध्दतीने साजऱ्या होणाऱ्या संक्रात सणात स्त्रिया काळी साडी आणि काळी वस्त्रे यांना प्राधान्य देताना दिसतील. संक्रांत हा महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीत एक महत्वाचा सण आहे. तीळा-तीळाने दिवसाच्या कालावधीत होणारी वाढ आणि आरोग्य संपन्नता राखण्यासाठी तीळ-गूळ देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. तीळगूळ लाडू, तीळगूळ पोळी हा संक्रांतीचा खास बेत ठरलेला आहे.

शेतीतून आलेल्या ताज्या वाटाणा, गाजर, ऊस, गव्हाच्या लोंब्या देखील संक्रांतीचे वैशिष्ट्य संक्रांत असेल तर भव्य अशी रांगोळी दारात असणे आवश्यक आहे. संक्रांतीच्या एकदिवस आधी भोगी अर्थात पौष्टिक बाजरी खिचडी खाण्याचा दिवस आणि मुख्य सणाची तयारी. आणि संक्रांतीचा पुढला दिवस म्हणजे किंक्रात अर्थात करिदिन होय. या दिवशी इतर शुभकार्य होत नसले तरी महिलांसाठी हळद-कुंकू आणि वाण लुटण्याचा दिवस.

संक्रांतीचा सण बारा-बलुतेदारांसाठी महत्वाचा होता. गावातील कुंभारांनी भट्टीत आवा अर्थात विविध प्रकारची भांडी बनवायची आणि गावातील सर्व स्त्रिया हा आवा घेवून जाण्यास तयार असायच्या यालाच आवा लुटणे असे म्हटले जाते. आता आधुनिक युगात आवा नसला तरी संक्रांतीच्या निमित्ताने आवश्यक भेट व संसारोपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण वाणाच्या रुपातून होते. संक्रांतीच्या सणात मातीच्या छोट्या भांड्याचे महत्व आजही अबाधित आहे…एकूणच मातीशी नातं जपणारा सण म्हणजे मकर संक्रांती.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जलमय पाणीदार गावाची प्रेरणादायी कहाणी

मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

मनातून मीपणा गेला तरच घडतो खरा त्याग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading