मुलांना बालवयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते, तसे शेतकऱ्यांचेही पिकावरील प्रेम हे निरपेक्ष असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।
झाडासि साजणें । चाळावें गा ।। 64 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – जेथे जागणें हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडाशीं मैत्री करून बोलावें लागते.
शेती करताना शेती आपणाशी बोलते. शेतातील पिके, झाडे शेतकऱ्यांशी बोलतात. इतके त्यांचे नाते दृढ असते. झाड, पिकांच्या संवेदना शेतकरी जाणतो. आपण प्रेम केले तर दुसरा आपल्यावर प्रेम करेल. आपण प्रेमच केले नाही तर इतरांकडून प्रेमाची अपेक्षा का ठेवायची? खऱ्या प्रेमात वासना नसते. हाव नसते. अपेक्षा नसते. निरपेक्ष भावनेने प्रेम करावे. अशा प्रेमाचा त्रास होत नाही. शेतकऱ्यांचे शेतावर प्रेम असते. तेही असेच निरपेक्ष असते. त्या मातीशी दृढ नाते असते.
पिके, झाडे मातीत येतात. मातीतच त्यांची वाढ होते. शेतकरी या मातीशी बोलतो. मातीच्या आरोग्याची काळजी घेतो. झाडाचे आरोग्य या मातीवर अवलंबून असते. मातीचे आरोग्य उत्तम असेल तर पिकाची वाढही जोमदार होते. आपण आपल्या आरोग्याच्या चाचण्या घेतो. रक्ताची, लघवीची तपासणी करतो. त्यावरून आरोग्य कसे आहे. कोणते आजार आहेत याची माहिती होते. तसे मातीच्या आरोग्याचीही तपासणी केली जाते. खरा शेतकरी मातीचे आरोग्य तपासतो. त्यानुसार आवश्यक त्या खतांचा आहार मातीस देतो.
पिकानुसार कोणता आहार द्यावा याचे नियोजन तो करतो. रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे मातीतील जिवाणूंची कार्यक्षमता कमी झाली आहे. मातीतील गांडुळे मृत झाली आहेत. रासायनिक खतांचा वापर त्यासाठी कमी करून शेताला सेंद्रिय खताची मात्रा वाढविण्याची गरज आहे. सेंद्रिय खतासाठी गांडूळ खताची निर्मिती करण्याची गरज आहे. योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात गांडुळ खत करावे. या सेंद्रिय खताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो. नांगरट सुलभ प्रकारे होते.
एकंदरीत जमिनीचे आरोग्य उत्तम राहते. झाडांच्या वाढीसाठी, पिकांच्या वाढीसाठी जमिनीत आवश्यक ते पोषक घटक वाढतात. झाडाची वाढ उत्तम होते. पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते. त्याला वेळेवर दूध पाजते. मुलांना बोलता येत नाही. पण मुलाला कोणता आजार झाला आहे. हे जसे आई ओळखते. तसे शेतकरीही पीक बोलत नसली तरी त्याला काय झाले आहे. कोणता आजार झाला आहे. त्याची वाढ कशी चांगली होईल याची काळजी घेतो. स्वतःच्या मुलांप्रमाणे त्याची वाढ करतो.
मुलांना बालवयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते, तसे शेतकऱ्यांचेही पिकावरील प्रेम हे निरपेक्ष असते. अध्यात्मात सद्गुरूंचे शिष्यावरील प्रेमही निरपेक्ष असते. सद्गुरूही शिष्याची अशीच काळजी घेतात. शिष्य आत्मज्ञानी व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. शिष्याच्या चुका पोटात घेऊन त्याला प्रेमाने आत्मज्ञान शिकवतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.