July 27, 2024
Di Ba Patil Speech in Karadga Sahitya Samhelan
Home » मुजोर व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामर्थ्य लेखणीत
काय चाललयं अवतीभवती

मुजोर व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामर्थ्य लेखणीत

कारदगा येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमलेनामध्ये संमेलनाध्यक्ष दि. बा. पाटील यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश….

आपल्या कारदगा साहित्य संमेलनास खूप वर्षांची मोठी साहित्य परंपरा लाभली आहे. मराठीतील अनेक नामवंत दिग्गज साहित्यिकांनी या व्यासपीठावर हजेरी लावून अध्यक्षपद भुषविले आहे. महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळालेल्या आदरणीय प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाभागात गेली २५ वर्षे हे संमेलन होत आहे. आजच्या २६ व्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केलीत त्याबद्दल मी आपल्या ऋणाईत आहे.

प्रथमतः या संमेलनाच्या व्यासपीठावरुन मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की, शासन ज्या प्रकारे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी भरीव अर्थसहाय्य करते, त्याप्रमाणे सीमाभागात होणाऱ्या अशा साहित्य संमेलनांच्यासाठी सुध्दा महाराष्ट्र शासनाने उदार हस्ते अनुदान द्यावे. कारण ग्रामीण भागात संमेलने घेणे खूप खर्चिक झाले आहे. इथल्या माणसांनी स्वबळावर अशी संमेलने घेवून आपली मराठी भाषा व संस्कृती जपली आहे, ही गोष्ट मराठी माणसांच्यासाठी खूप कौतुकास्पद व अभिमानाची आहे. ग्रामीण भागात होणारी अशी छोटी संमेलनेच मोठी कामगीरी करीत असतात. तळागाळातल्या ग्रामीण माणसांच्यापर्यंत प्रबोधनाचा विचार पोहचवण्याचं काम करीत असतात.
खरंतर साहित्य संमेलनांची परंपरा ही शहरी माणसांच्यापासून सुरु झाली, अनेक साहित्य संस्था व साहित्य मंडळे शहरी भागात उदयास आली. ज्या काळी साहित्य म्हणजे काय ? हे सर्वसामान्य ग्रामीण माणसाला माहिती नव्हते.

त्याकाळी १९६१ मध्ये ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या भेडसगाव या दुर्गम खेड्यात महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन भरवलेलं होतं. त्या संमेलनासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते; तर म. भा. भोसले व नामदेव व्हटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या ‘चळवळीत शाहिरीमुळे अण्णाभाऊंचे नाव महाराष्ट्रभर पोहोचलं होतं. त्यामुळे अण्णाभाऊ या संमेलनाचे आकर्षण होते. गावकऱ्यांनी त्यांना बैलगाडीतून वाजत गाजत गावात नेलं होतं. ग्रंथदिंडीलाही खूप लोकांनी गर्दी केली होती. देवाच्या यात्रेत जेवढ्या भक्तीभावाने सामील व्हावे, तेवढ्याच श्रद्धेनं गावकरी या संमेलनात सामील झाले होते. कोणत्याही साहित्य संस्थेशिवाय गावकऱ्यांच्या सहभागातून पार पडलेलं हे महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन होतं. शहरात भरणारी मोठी साहित्य संमेलने ही विशिष्ट वर्गातल्या माणसांच्याशी संबंधित असतात. त्यातल्या बौद्धिकतेच्या उच्च पातळीवरून होणाऱ्या चर्चा ग्रामीण समुदायापर्यंत पोहोचत नाहीत. ती साहित्य व्यवहारातील विशिष्ट वर्गाशी संवाद साधतात. परंतु ग्रामीण भागात होणारी संमेलने ग्रामीण माणसांच्याशी थेट संवाद साधतात. त्यांना ती आपली वाटतात. संमेलनापूर्वी निघणारी ग्रंथदिंडी त्यांना ज्ञानोबा तुकोबांची वाटते. संमेलनात होणारी भाषणे व चर्चा त्याला आपली वाटते. साहित्य व्यवहारात जे आहे ते आपल्याच जगण्याचे प्रतिबिंब आहे याची त्याला जाणीव होते.

विभागवार साहित्य संमेलने व्हायलाच हवीत

समाजातले वर्तन, व्यवहार, रूढी, परंपरा, चालीरीती, बोलीभाषा यांची गोळा बेरीज म्हणजेच साहित्य हे जेव्हा ग्रामीण माणसाला समजतं आणि पटतं तेव्हा त्याला ते संमेलन व साहित्य आपले वाटते. दुसऱ्या बाजूला हीच संमेलने भविष्यातील मोठ्या साहित्यिकास जन्मास घालतात. अशा संमेलनातून नवलेखकांची एक पिढी विकसित होत असते. याच विचारातून नलगे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे एक व्यासपीठ निर्माण केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व बेळगाव जिल्हा हे या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. ही संस्था निर्माण झाली त्यावेळी पुण्यामुंबईतून काही प्रतिक्रिया उमटल्या की पुण्यामध्ये एक महाराष्ट्र साहित्य परिषद असताना ही समांतर संस्था कशासाठी पाहिजे. या संस्थेची गरजच काय ? अशी टीका झाली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे उद्घाटन पहिलं विभागीय संमेलन भारताचे उपपंतप्रधान मराठी भाषेचे अभ्यासक व साहित्यिक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं. यावेळी आपल्या भाषणात चव्हाण साहेब म्हणाले होते, “विभागवार साहित्य परिषदा किंवा साहित्य संमेलने झाली तर मुख्य साहित्याचा जो प्रवाह आहे त्याचे काय होईल अशी काही मंडळींना भीती वाटते. माझ्या कल्पनेप्रमाणे तसे काही होणार नाही. साहित्याचा जो मुख्य प्रवाह आहे तो राहिलाच पाहिजे. कारण तो इतिहास आहे. मराठी भाषेला लाभलेली ती देणगी आहे. अशा संमेलनामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे काय महत्त्व राहील असे काही लोकांना वाटते ते चूक आहे. अशी उदंड साहित्य संमेलने होत राहिली पाहिजेत. कारण खेड्यातला माणूस साहित्य संमेलनात झालेली भाषणे ऐकण्याचा प्रयत्न करतोय ही चांगली गोष्ट आहे. या राज्यातील मराठी भाषा ही अनेक कोटी लोकांची भाषा आहे. त्यावर जसा संपन्न विद्वान मराठी माणसाला लिहायचा बोलायचा अधिकार आहे. तसे ही भाषा बोलता येणाऱ्याला जर लिहायला आली तर हवीच आहे. त्यामुळे मराठी भाषेची शक्ती आणि शोभा वाढणार आहे.

कारदगा संमेलनाने यशवंतरावांचा विचार जोपासला

कारदग्याच्या संस्थेने चव्हाण साहेबांच्या विचाराप्रमाणेच या संस्थेच्या वतीने मराठीचा व मराठी साहित्याचा जागर अखंडित ठेवला आहे. याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. खरंतर साहित्य संमेलन हा मराठी भाषेचाच एक भाग असतो. कारण भाषेमुळे संस्कृतीचे रक्षण होते. मराठी संस्कृतीचे संचित मराठी भाषेत सामावलेले असते. त्यामुळे मराठी भाषेचा जाणता वेध घेण्याचा पहिला प्रयत्न १९८९ मध्ये शरद पवार व मनोहर जोशी यांनी घेतला आणि त्यांच्या प्रेरणेने जागतिक मराठी साहित्य परिषद अस्तित्वात आली. पहिल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी ‘कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पु. ल. देशपांडे लाभले होते. तर सूत्रसंचालन वसंत बापट यांनी केले होते. या संमेलनातील भाषणात कुसुमाग्रज म्हणाले होते, “इंग्रज गेले पण जाताना इंग्रजी पाठीमागे ठेवून गेले. वरिष्ठ पातळीवरच्या हातापीसाना अधिकाऱ्यांच्या मनात इंग्रजी कायमची राहिली. बाधलेल्या साखळदंडापेक्षा मनाला बांधलेले साखळदंड अधिक भक्कम असतात. नव्या युगाचे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य मराठी भाषेत आहे. पण तिची अपत्ये दुबळी आहेत. त्यामुळे डोक्यावर राजमुकुट घालून अंगावर लक्तरे पांघरलेली मराठी भाषा हाती कटोरा घेऊन मंत्रालयासमोर उभी आहे. मावशीच्या मायेने पालन करणाऱ्या इंग्रजीशी आमचे वैर नाही, पण मावशीने आता आमच्या आईच्या घराचा कब्जा आईच्या ताब्यात द्यावा. प्रश्न इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही, तर मराठी भाषेच्या संरक्षण संवर्धनाचा आहे. आजही मराठी भाषेची फारशी अवस्था बदललेली नाही. अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे. परंतु केंद्र शासनाने अद्यापि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही.

ग्राम आणि शहर संस्कृतीतील सीमा रेषा पुसट

लोकमान्य टिळक इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणाले होते. पण या वाघिणीचं दूध पिण्याच्या नादात आपल्याला आपल्या मातेच्या दुधाचा विसर पडला आहे. गेल्या 75 वर्षातील गावगाडा व शहरे खूप बदलली आहेत खेडेगावातली मुलं आता सुटा बुटातला इंग्रजी पोशाख करून बस मधून शहरातल्या इंग्रजी शाळेत शिकायला जातात आपली मुले इंग्रजी शाळेत शिकतात याचं पालकांनाही भूषण वाटतं यामुळे मराठी शाळांच्या पेक्षा इंग्रजी शाळांची स्पर्धा वाढली आहे सेमी इंग्रजीच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालक वशिला लावून रांगेत उभे असतात या नव्या बदलांचे परिणाम ग्रामीण समाजावर व भाषेवर सुद्धा झाले आहेत ग्रामीण माणसाच्या तोंडी आता सर्रास अधून मधून इंग्रजी शब्दांचा वापर वाढला आहे रोजगाराला जाणारी खेडूत बाई मोबाईल कानाला लावून हॅलो, हॅपी बर्थडे, थँक्यू, हॅपी दिवाली असे शब्द बोलत शेताकडे जाताना ऐकायला मिळते धनगर वाड्यातली धनगर माणसं सुद्धा ओवी गाताना शुद्ध मराठीत गाताना पाहायला व ऐकायला मिळते हे बदल ग्रामीण माणसाने आता सर्रास स्वीकारलेले आहेत
असे असताना शिवाय शिकून शहाणे झालेल्या माणसाला शहरांचे आकर्षण वाटते आहे. शहरांच्या फुगणाऱ्या उपनगरात जास्ती भरणा हा ग्रामीण भागातून आलेल्या माणसांचा आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती आणि शहर संस्कृती यातली सीमा रेषा पुसट झाली आहे. शहरातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न यातलं अंतर संपलं आहे, कारण पूर्वी 25 एकर शेतीचा मालक असणाऱ्या शेतकऱ्याची पुढची पिढी आता पाच दहा गुंठ्यांची मालक झाली आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा उग्ररूप धारण करतो आहे माझे काही साहित्यिक मित्र मला म्हणतात आपण भूमिका घेऊन लिहिले पाहिजे विशेषता डावी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. तेव्हा मी त्यांना सांगतो माझी भूमिका ही डावीही नाही आणि उजवी ही नाही ती सर्व समावेशक आहे.

भाषेतील प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी साहित्यिकांची

ग्रामीण भागातील बहुजन मराठा समाजातस्या शेतकऱ्यांची व कुटुंबाची जगण्याची शोकांतिका खूप मोठी आहे. याचा विचार करून माझ्यासारखा लेखक गावगाडातल्या आर्थिक वंचितांचे प्रश्न शोधीत राहतो त्यामुळे मी जातीपातीच्या पलीकडचा विचार करून उपेक्षित माणसांच्या व समाजाच्या वेदना साहित्यात मांडत असतो. हे करत असताना गावातली आणि गाव गाड्या बाहेरच्या वस्तीतली बदललेली माणसं आणि त्यांची भाषा समकालीन साहित्यात आली पाहिजे, असे मला वाटते. मराठी भाषा प्रदूषित झाली आहे याबद्दल कोणाचं ‘दुमत असायचं कारण नाही परंतु मराठी भाषेतील प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी आता साहित्यिकांच्या वर येऊन ठेपली आहे, हे प्रदूषण कमी करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून आता मराठी साहित्य संमेलनाची नितांत आवश्यकता वाटते यानिमित्ताने आपण मराठी भाषेबरोबरच मराठी साहित्यावरही विचार मंथन करीत असतो. या मंथनातूनच मराठी भाषा व साहित्य यासंबंधी चिंतन होत असते साहित्य व समाज यांचा निकटचा संबंध असल्यामुळे साहित्य हे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पर्यावरणाचा आविष्कार असते. कारण लेखक हा समाजाचा अविभाज्य घटक असतो. त्यामुळे तो समाजात घडणाऱ्या घटनांच्या कडे त्रयस्थपणे बघत असतो. सामाजिक व्यवहारांचे लेखकाच्या मनावर खोलवर परिणाम होत असतात. मुळातच तो भावनिक असतो. कारण प्रतिभावंत लोक हे भावनिक असतात. दुसऱ्याच्या वेदनेने ते दुःखी होतात. त्यांच्या मनाला होणारे दुःख ते मनात न कोंडता कागदावर व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या हातून त्या त्या काळातील व परिस्थितीतील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पर्यावरण मांडणाच्या साहित्याचा जन्म होतो. त्यामुळेच साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाज जीवनाचे प्रतिबिंब साहित्यात उमटते. साहित्य ही केवळ याने लिहिण्याची गोष्ट नसते तर ती काळजातल्या वेदनेने लिहिण्याची गोष्ट असते.

संत साहित्य अजरामर साहित्य

साहित्याचा प्रवास हा मौखिक साहित्य परंपरेपासून सुरू झाला आहे. मौखिक साहित्याला सुद्धा वेदनेचा स्पर्श होता. अगदी महानुभाव चक्रधर स्वामींच्या मौखिक परंपरेतून चालत आलेली चिऊ काऊची गोष्ट जरी घेतली तरी त्या कावळ्याच्या जगण्याला वेदनेचा स्पर्श होता. कावळ्याचं घर शेणाचं होतं आणि चिमणीचं घर मेणाचं होतं. कावळा हा समाजातील उपेक्षित जीवन जगणारांचे प्रतिक होता. याच सामाजिक वेदनेतून संत साहित्याची निर्मिती झाली आहे समाजातील दुःख, दारिद्र्य, अज्ञान, स्त्रियांच्या जगण्याची शोकांतिका, समाजातल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याचं दुःख संत ज्ञानदेवांच्या मनाला झालं आणि त्यांनी सोसलेल्या सामाजिक वेदनेतूनच ज्ञानेश्वरीसारखा तेजोमय, मानवाला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा ग्रंथ जन्माला आला. ज्ञानेश्वर माऊलींची जी वेदना होती तीच त्यांच्या पुढील संत परंपरेतील अनेक संत साहित्यिकांची होती. नामदेव, चोखोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताई, जनाई, बहिनाई, संत तुकोबाराय, समर्थ रामदास, या सर्व संतांनी आपल्या साहित्यातून बिघडलेल्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पर्यावरणावर टोकदारपणे भाष्य केले आहे. संत साहित्याने समाजाला प्रकाशाची वाट दाखवली. समाजाची अस्मिता, स्वाभिमान जिवंत ठेवण्याचे काम संत साहित्याने केले. त्यामुळेच शेकडो वर्षाच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध समाज निर्धाराने संघर्ष करीत टिकून राहिला. लढत राहिला. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य, रयतेच राज्य निर्माण करण्यासाठी भवानी तलवारीच्या बळावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यवस्थेविरोधात जीवाची बाजी लावून लढत होते. त्याचवेळी संत तुकोबाराय आपल्या अभंगातून व कीर्तनातून समाज जागृतीचे समाज परिवर्तनाचे काम करीत होते. संत साहित्याने शिवछत्रपतींच्या कार्यास बळ दिले आणि समाजाला डोळस बनवले समाजाला चांगले विचार देण्याचं काम संत साहित्य करीत आलं आहे म्हणूनच संत साहित्य मराठी साहित्य विश्वात अजरामर साहित्य ठरलं.

बदलांना स्वीकारूनच लिहीतो लेखक

समाज हा गतिशील आणि परिवर्तनशील असतो. काळाबरोबर येणारे बदल स्वीकारत समाज पुढे जात असतो. या बदलांच्यामुळे सामाजिक संस्कृतीचे संदर्भही बदलतात. या सर्व बदलांना स्वीकारूनच लेखक लिहित असतो. या नव्या बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे अपरिहार्य असते. खऱ्या अर्थाने १९३० पासून साहित्य झपाट्याने बदलत गेले आहे. पहिल्या महायुद्धानंतर औद्योगिक क्रांती झाली. कार्ल मार्क्सचा विचार या देशात आला. कामगार संघटनांचा उदय झाला. नोकरीसाठी गाववाड्यातला माणूस मुंबईसारख्या शहराकडे वळला. तो शहरात स्थिरावला .त्याने शहरी संस्कृतीचं वारं खेडेगावात आणलं. शहरात झालेल्या नवनवीन भौतिक सुधारणा गावगाड्यात आल्या. तोपर्यंत शिक्षणाचा प्रसार सुद्धा खेड्यापाड्यातल्या वस्तीपर्यंत पोहोचला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केलं. समाजातल्या दारिद्र्याच्या मुळाशी शैक्षणिक अज्ञान हेच कारण आहे. हे फुले यांनी सिद्ध करून दाखवलं. तोच त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. प्रत्येक जाती जमातींच्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी वस्तीगृह उभी केली. त्याच विचारांतून कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे इत्यादी शिक्षण महर्षीनी शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यातल्या डोंगर कपारीतल्या वस्तीपर्यंत नेली आणि शिक्षण घेऊन शहाणी झालेली मंडळी नोकरीच्या निमित्ताने शहरात गेली. ती शहरात स्थिरावली त्याच वेळी शहरातल्या कामगारांचे प्रश्न घेऊन कवी नारायण सुर्वे, अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे साहित्यिक लिहिते झाले होते. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातून आलेल्या पांढरपेशा मंडळींच्या मनात त्यांचं गाव रुंजी घालत होतं.

बहुजनांनीच गावगाड्याचं अस्सल जगणं मांडलं साहित्यात

गावाकडच्या आठवणी गावाकडची शेती, बैलं, नांगर, जनावर, पशुपक्षी, यात्रा, जत्रा, जत्रेतला तमाशा, गावातली गावरान बेरकी पुढारी मंडळी, दारिद्र्यात अगतिकतेने जगणारी सर्वसामान्य माणसं हा डोळ्यापुढे असणारा भूतकाळ आठवून शहरात स्थायिक झालेली ही मंडळी आपल्या मनातलं गाव आपल्या लेखणीतून कागदावरती व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्या लेखणीतून एक अस्सल वास्तववादी ग्रामीण साहित्य उदयाला येत होतं. यामध्ये आनंद यादव, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, द. ता. भोसले, व्यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे, शंकराव खरात अशा कितीतरी लेखकांची नावे सांगता येतील. अण्णा भाऊंनी तर वाटेगावच्या माळावर सुगीच्या दिवसात उतरणाऱ्या भटक्या जाती-जमातींचं दुःख, दारिद्र्य, वेदना यांना आपल्या कथा कादंबऱ्यांचा विषय केला. फकीरा सारखी कादंबरी गाव कुसाबाहेरच्या बेडर, बंडखोर माणसावर लिहिली. आनंद यादवांची गोतावळा आणि रा. रं. बोराडे यांची पाचोळा बदलत्या आधुनिकीकरणाने व यंत्र युगामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या ग्राम संस्कृतीची कैफियत मांडते. या लिहित्या झालेल्या बहुजन समाजातील मंडळींनी खऱ्या अर्थाने गावगाड्याचं अस्सल जगणं साहित्यात मांडलं.

त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने देश प्रभावित झाला होता. विशेषतः उपेक्षित जनसमुदायाला डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हा मंत्र दिला. त्यामुळे दलित बांधव शिक्षणाकडे वळले. संघर्ष करू लागले. संघटित झाले कामाच्या शोधात शहराकडे आलेली ही माणसं तिथं झोली शहरात स्थिरावली. त्यांनीही आपण गावगाड्यात सोसलेल्या व भोगलेल्या वेदनांचा प्रवास आपल्या साहित्यातून मांडायला सुरुवात केली आणि ग्रामीण साहित्याबरोबरच दलित साहित्याचा उदय झाला. दया पवार, नामदेव ढसाळ, राजा ढाले, लक्ष्मण माने असे अनेक साहित्यिक शिक्षणातून आलेल्या आत्मभानामुळे प्रकट शब्दात व्यक्त होऊ लागले. त्यांच्या टोकदार शब्दांनी विद्रोही साहित्याची सुरुवात झाली. शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनाही आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं भान आलं. त्या चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित न राहता त्यांनी घराचा उंबरठा ओलांडला. त्यांनी काळजात जपलेल्या वेदनेला शब्दात बांधण्याचे काम केलं. त्यातूनच स्त्रीवादी साहित्य नावाला आले.

१९६१ नंतर महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळाली डॉ. आंबेडकरांच्या विचारातील जलसिंचन योजना अस्तित्वात आल्या. कोयनेसारखी मोठं मोठी धरणं झाली. त्यामुळे महाराष्ट्र हरित होत निघाला तर दुसऱ्या बाजूला धरणांच्या पाण्यात ज्यांचे संसार गाडले गेले ती माणसं विस्थापित झाली. त्यांचं दुःख वेदना साहित्यातून मांडण्याचे काम अनेक साहित्यिकांनी केलं. त्यामध्ये चंद्रकुमार नलगे, विश्वास पाटील, तानाजी पाटील, वसंत पाटील इत्यादी साहित्यिकांचा उल्लेख करावा लागेल. धरणांच्यामुळे ऊस शेतीला चांगले दिवस आले. साखर कारखानदारी उभी राहिली त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न ऊसतोड कामगारांचे होते. कष्टकरी शेतकऱ्यांचे होते. या प्रश्नांना भिडण्याचं काम अनेक साहित्यिक मंडळींनी केलं त्यामध्ये वा. ग. केसरकर, सरदार जाधव, बाबाराव मुसळे, सुरेश मोहिते, इंद्रजीत भालेराव, सचिन पाटील, नारायण सुमंत, डॉ. श्रीकांत पाटील अशा मंडळींनी आपल्या साहित्यातून ऊसकरी शेतकऱ्यांचे व कामगारांचे प्रश्न मांडले. सहकाराचं राजकारण आणि त्यातून होणारे शोषण यावर मोहन पाटील, वासुदेव मुलाटे, आसाराम लोमटे यांनी परखडपणाने लिहिलं. शहरीकरणाने बदलणारी खेडी व तिथली संस्कृती यावर प्रतिमा इंगोले, मोहन पाटील, महेंद्र कदम, राजन गवस, कृष्णात खोत, आसाराम लोमटे अशा अनेक साहित्यिकांनी बदलती खेडी व तिथले राजकारण आपल्या साहित्यातून मांडलं.

१९८० नंतर खुल्या अर्थव्यवस्थेने व जागतिकीकरणाने समाजावर दूरगामी परिणाम झाले. ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या जीवनावरही परिणाम झाला. भौतिक सुधारणा गावगाड्यातल्या घराघरापर्यंत पोहोचल्या. भांडवलदार धारजिन्या व्यवस्थेने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत गेला. समाजात दारिद्र्य व बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्था समाजाचे शोषण करू लागली. नोकरशाही बळावली. नोकरशाहीची लाचखोर वृत्ती वाढली. बँका पतसंस्था सामान्य माणसांची अडवणूक करू लागल्या. समाजातले खाजगी सावकार पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली मोकाट सुटले. ते गोरगरीब समाजाची पिळवणूक करू लागले. या बदलांच्यावर प्रकाश टाकण्याचे काम सदानंद देशमुख यांच्यासारख्या काही साहित्यिकांनी केलं. देशमुख यांनी या बदलाची दाहकता बारोमास कादंबरीमधून मांडली. भांडवलदारी अर्थव्यवस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याची व्यवस्था तयार केली यावर शंकर सखाराम यांनी एस इ झेड कादंबरी लिहिली. दुष्काळात निर्माण होणारा पाणी प्रश्न, पाणी योजनेतील भ्रष्टाचार, पाण्याचा पैसा करणारी मनोवृत्ती , जनावरांच्या छावण्या आणि छावणीवर डल्ला मारणाऱ्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाच्या प्रवृत्तीवर सदानंद देशमुख बाबाराव मुसळे, विश्वास पाटील, नामदेव माळी यांनी टोकदारपणे लिहिलं. आनंद पाटील, अजय कांडर यांनी कोकण प्रदेशातील भ्रष्ट व्यवस्थेचे चित्र साहित्यात मांडले. म्हणूनच लेखक हा सामाजिक परिवर्तनाचा साक्षीदार असतो. समाजातील बदलांचे व बदलत्या मानवी प्रवृत्तींचं चित्रण तो सूक्ष्म नजरेने करीत असतो. आता एकविसाव्या शतकातील गाव खेड्यांचा चेहरा पूर्ण बदलला आहे. गाव आणि शहर यातील अंतर कमी झालं आहे. आजच्या व्यवस्थेत यंत्र युगामुळे मजुरांच्या हाताला काम मिळण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राजकारणाचा तोंडवळा बदलला आहे. पूर्वी समाजसेवेचे असलेले राजकारण आता आप मतलबी सत्तेचं झालं आहे. राजकीय पद हे सेवेपेक्षा प्रतिष्ठेचे व उत्पन्नाचे साधन झाले आहे.

प्रबोधन साहित्याचा आत्मा

आता कार्यकर्ताही बदलला आहे. निष्ठावंतापेक्षा स्वार्थी कार्यकर्त्याला दर आला आहे. बेरोजगारांचे तांडे राजकारण्यांच्या गुन्हेगारी राजकारणाची शिकार होत आहेत. याचा खूप खोलवर परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर झाला आहे. तशातच दूरदर्शन इंटरनेट, मोबाईल सारख्या माध्यमांनी जग खूप जवळ आलं जगातील सर्व ज्ञान व माहिती माणसांच्या मुठीत सामावली वाहतुकीची बदललेली साधनं गतिमान झाली शिक्षणात सुद्धा अमुलाग्र बदल झाला भौतिक सुधारणांनी कुटुंबांच्या गरजा वाढल्या आपण आणि आपलं कुटुंब एवढेच मर्यादित जग मानून आयुष्य जगणारी पिढी तयार झाली आहे. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा व आपलेपणा संपुष्टात आला त्यामुळे सुसंस्कृत समाजाचा चेहरा कुरूपतेकडे वाटचाल करतो आहे. एकत्र कुटुंब पद्धती उध्वस्त झाली आहे. गावाच्या नाक्या नाक्यावर ढाबा संस्कृती व बियर बार आले. त्यामुळे सर्व काही भौतिक सुधारणा असून सुद्धा माणूस आणि समाज मानसिक दृष्ट्या उध्वस्त व अगतिक झाला आहे. अशा समाजाच्या उध्दवस्थीकरणाला साहित्यच चांगली दिशा देऊ शकते. समाजाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे काम लेखक करीत असतो. कारण साहित्य हे सर्जनाच्या अनेक शक्यता घेऊन प्रसृत झालेले असते. ती मधून अर्थाची अनर्थाची अनेक वलय तयार होतात.
मानवी अस्तित्वाची आणि अस्तित्वापलीकडची अमर्याद पोकळी साहित्यासाठी खुली असते. समाजाला हवे ते लिहिणारा लेखक तात्पुरता समाजमान्य ठरतो परंतु समाजापुढे जाऊन लिहिणारा लेखक युगप्रवर्तक ठरतो. मनोरंजन हा साहित्याचा चेहरा असला तरी प्रबोधन साहित्याचा आत्मा असला पाहिजे. साहित्याने वाचकाला निखळ आनंद देण्याबरोबरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावले पाहिजे. “माझ्या लेखक मित्रांच्या समोर आज खूप मोठी आव्हानं उभी आहेत. उजाडणारा प्रत्येक दिवस समाजापुढे नवे नवे प्रश्न घेऊन उगवतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्याबरोबरच बेरोजगार युवकांच्या आत्महत्यांची संख्या ही वाढत चालली आहे. शिक्षण क्षेत्रात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे विनाअनुदानित शिक्षण व्यवस्था निर्माण झाली आहे. या व्यवस्थेने जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. शिक्षकांची नोकरी शाश्वतीची राहिलेली नाही. मिळणारा तुटपुंजा पगार वेळेत मिळत नाही. यासाठी व आपली नोकरी कायमस्वरूपी व्हावी म्हणून शिक्षकांना मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करून अश्रू गाळावे लागतात. जर शिक्षकच उद्ध्वस्त झाला तर विद्यार्थ्यांचं आणि चांगल्या शिक्षणाचे काय होईल हा प्रश्नच आहे. नोकऱ्यांचाही खूप मोठा अभाव आहे. हाताला काम नसणाऱ्या तरुणांच्या टोळ्या गावागावात चौकातल्या पारावर रिकामटेकड्या बसून असतात. ना त्यांची लग्न होतात ना हाताला काम मिळते. या पिढीचं तारुण्य ऐन भराच्या दिवसात करपून गेलं आहे. अशा पिढीच्या मानसिकतेचा सुद्धा नव्याने अभ्यास करून त्यांची दुःख व प्रश्न साहित्यात मांडावी लागतील आणि त्यांच्या जगण्याला सकारात्मक ऊर्जा देणारं साहित्य निर्माण करावं लागेल तशातच मोबाईल सारखी माध्यम मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. या साधनाच्या अतिरेकी वापरामुळे नवी पिढी समाज संस्कृतीचा चेहरा विद्रुप करते आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण कुठेतरी रस्त्यावर एखादा अपघात होतो तेव्हा मानवतेच्या दृष्टीने अपघात ग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यांचे मोबाईलमध्ये फोटो घेण्यात व व्हिडिओ शूट करण्यात यापिढीला धन्यता वाटते. कुठल्यातरी उच्चशिक्षित कुटुंबातला प्राध्यापक वडील मोबाईलच्या आहारी गेलेल्या आपल्या मुलाला खडेबोल सुनावतो. तेंव्हा तो मोबाईलच्या आहारी गेलेला मुलगाच रागाच्या भरात आपल्या बापाचा खून करतो किंवा मोबाईल मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो. आज हे भीषण सामाजिक वास्तव आपल्यासमोर उभे आहे. आता ही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच आहे. चांगले विचार देणाऱ्या ग्रंथात आहे. समाजात होवून गेलेल्या थोर पुरुषांच्या चरित्र ग्रंथात आहे. परंतू यासाठी आज निस्तेज होवून होत निघालेली वाचन चळवळ गतीमान करणे गरजेचे आहे.

दुर्दैवाने आज ग्रंथालये ओस पडत चालली आहेत. तर दुसऱ्या बाजूला मंदीरांच्या समोरच्या रांगा वाढत चालल्या आहेत. हे २१ व्या शतकातल्या सूज्ञ समाजाचं चांगलं लक्षण नाही. ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्रांच्या इतकीच वाचनालये सुध्दा अतिमहत्वाची आहेत. कारण समाजाचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर गावागावात सक्षम ग्रंथालये उभी राहिली पाहिजेत. शासनाने ग्रंथालयांना सुसज्ज इमारती बांधून देणे गरजेचे आहे. तिथे काम करणाऱ्या ग्रंथपालांच्या वेतनाचाही प्रश्न तातडीने सुटला पाहिजे.

दि. बा. पाटील

निर्भीडपणा हा साहित्याचा स्थायीभाव

या वाचन चळवळीला गतिमान करण्याची जबाबदारी ही साहित्यिकांच्या वर येऊन पडते. युवा पिढीने नव्या साहित्याबरोबरच जुने साहित्य ही वाचले पाहिजे. कारण नवे साहित्य निर्माण झालं म्हणून जुने साहित्य कधीही कालबाह्य होत नसते तो जुना साहित्य व म्हणजे त्या काळातील समाज जीवनाचा इतिहास असतो. त्यामध्ये त्या त्या काळातील लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब उमटलेली असते. साहित्य हे सामाजिक स्थित्यंतराचा व परिवर्तनाचा इतिहास असते आणि हा इतिहासच पुढच्या पिढीला प्रेरणादायी असतो म्हणून तो इतिहास वाचलाच पाहिजे. वर्तमानातल्या लेखकांच्या समोर दररोज जरी नवे नवे प्रश्न निर्माण होत असले तरीसुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं सामर्थ्य निश्चितपणे नव्या पिढीतील लेखकांच्यात आहे. कारण या पिढीतील लेखकाला एक अन्वेषण दृष्टी लाभली आहे. हा लेखक केवळ समाजात घडणाऱ्या घटना मांडून थांबत नाही तर त्या घटना पाठीमागच्या कारणांचा शोध घेण्याचे काम करतोय ही शोध घेण्याची दृष्टी निश्चितपणे त्यांच्याकडे आहे. सकस साहित्य निर्मितीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. हे लेखकांच्या आत्महत्येवर सुद्धा सकारात्मकतेने लिहितात आणि समाजाला मानसिक आधार देण्याचे काम करतात. त्यामुळे नवीन साहित्य आश्वासकतेच्या दिशेने वाटचाल करते आहे. आपल्या देशातील व्यवस्था ही घटनेवर आधारित लोकशाही व्यवस्था असली तरी सुद्धा बदलत्या राजकीय परिस्थितीवर तिचे मूल्य ठरत आहे. लेखणीच्या स्वातंत्र्यावर आणि लेखकांच्या व्यक्त होण्यावर निर्बंध येण्याचे संकेत मिळत आहेत. या बदलत्या परिस्थितीला लेखकाने वावरण्याच कारण नाही. कारण निर्भीडपणा हा साहित्याचा स्थायीभाव असतो. तो आपल्याला जपावाच लागेल जशी परिस्थिती निर्माण होईल तसे समाजाच्या भल्यासाठी व्यवस्थेविरुद्ध लढावेच लागेल. खाऊजा संस्कृतीमुळे देश खाजगीकरणाच्या दिशेने प्रवास करतोय खाजगीकरणातून भांडवलशाही समाज व्यवस्था अस्तित्वात येते. जिथे भांडवलशाही तिथे श्रीमंत अधिक श्रीमंत होतो व गरीब अधिक गरीब होतो हा सिद्धांत आहे. अशावेळी शासन व्यवस्था पिळवणूक करणाच्या व्यवस्थेच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता असते. लेखन स्वातंत्र्याची सुद्धा मुस्कटदाबी होते .या विरोधात लेखकाला सत्याच्या बाजूने लिहावेच लागेल.

वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली. मागील वर्षी घराघरावर तिरंगा फडकवून देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. २१ व्या शतकातील देश विज्ञानात प्रगती पथावर वाटचाल करतोय. भारताने पाठविलेलं चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरलं म्हणून आपण गावागावात फटाके फोडले आनंद साजरा केला. तरीसुध्दा संपूर्ण समाज अंधश्रध्देतून बाहेर येत नाही. अजूनही कुठेतरी नरबळीच्या घटना घडतात, भानामतीचे प्रकार घडतात. विज्ञानाने अंधश्रध्दा कमी होण्याऐवजी समाजाच्या अस्वस्थपणामुळे अधिक बळावत चालल्या आहेत. या अंधश्रध्दे विरोधात लढताना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. त्यांच्या हत्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. आता लेखकांनाच सकस साहित्यनिर्मिती करुन अंधश्रध्देविरोधात समाजाला डोळस बनवावे लागेल. कारण समाजपरिवर्तनाची ताकत लेखकाच्या लेखनीतच सामावलेली असते. साहित्य आणि समाजपरिवर्तनाचं नातं अत्यंत जवळचं आहे. कवितेची एक ओळ क्रांतीला जन्म देवू शकते. बंकिमचंद्र चटर्जीच्या “वंदे मातरम” या गीताच्या एकाच ओळीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीला बळ दिलं. हजारो क्रांतीवीर “वंदे मातरम” म्हणत धैर्याने मरणाला सामोरे गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे आणि अमर शेख यांच्या पोवाड्यांनी बळ दिलं मराठाकार प्र. के. अत्रे, प्रबोधनकार के. सी. ठाकरे, सेनापती बापट यांच्या लेखनीनेही चळवळ अधिक तीव्र केली. म्हणूनच चळवळींचा व लेखकाच्या लेखनीचा संबंध अत्यंत जवळचा असतो.

लेखकाला सामाजिक लढाईपासून दूर जावून चालणार नाही. समाजाच्या जगण्यापासून दूर जावून साहित्याची निर्मिती करता येत नाही. १९५८ साली झालेल्या एका दलित साहित्य संमेलनातील भाषणात आण्णा भाऊ साठे म्हणाले होते,” लेखक हा सदैव जनतेबरोबर असावा लागतो जो लेखक किंवा कलावंत जनतेबरोबर असतो, त्याच्या बरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरविणाऱ्या लेखकाकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी ” वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा ” मानला आहे. आणि तो डोळा सदैव जनतेबरोबर असणे गरजेचे आहे.”

पुस्तक बुडेल त्यादिवशी जग बुडेल

आपण का कशासाठी आणि कोणासाठी लिहीतो ? हा प्रश्न लेखकाला सदैव पडला पाहीजे. म्हणूनच साहित्य हे समाजातील पराभूतांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. उमलत्या कळ्यांना बळ देण्याचे काम साहित्याने केले पाहिजे. जखमांच्या आणि अश्रूंच्या बाजूने लिहिलं पाहिजे. जिथे सामान्य माणूस थांबतो तिथे साहित्याचा प्रवास सुरू होतो. या जगात सांडलेल्या रक्ताचे आणि गाळलेल्या घामाचे मूल्य राहिलं नाही. या जगातला अर्धा घाम वेठबिगारांचा आहे. सांडलेल्या रक्तांचा थेंब आणि थेंब विचारवंतांचा आहे. व्यक्त होणाऱ्याला गोळ्या घातल्या जातात. म्हणून लेखणीला मर्यादा येते, ही गोष्ट लोकशाहीला आणि कसदार साहित्य वाढीला मारक आहे. लेखणीला मुक्त स्वातंत्र्य असले पाहिजे. लेखणी सत्तेच्या दावणीला बांधता कामा नये. कारण लेखणी संगिनीपेक्षा धारदार व बलशाली असते मुजोर व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामर्थ्य लेखणीत असते. लेखणीची अवधी एक ओळ क्रांतीला जन्म देते म्हणून व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे साहित्य प्रभावी ठरते. पुस्तक बुडेल त्यादिवशी जग बुडेल. जग हे पुस्तकांच्या वर तरलेलं आहे. पुस्तकांना कोणाची गुलामगिरी येता कामा नये. याची साहित्यिकांनी काळजी घेतली पाहिजे. लेखनीचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला अथवा राज सत्तेला नाही, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना, अर्पण करताना या देशातील जातीय व्यवस्था नष्ट व्हावी अशा भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु गेल्या 75 वर्षातील राजकारणाने जात, धर्म टोकदार केला. जाती-जाती मधल्या भिंती अधिक मजबूत केल्या. यासाठी आता लेखकांनीच जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन समाजाला डोळस बनवणारी साहित्यनिर्मिती केली पाहिजे. उत्तम उदाहरण म्हणून साहित्यिक फ.म. शहाजिंदे व कवी रमजान मुल्ला यांचा उल्लेख करावासा वाटतो.

साहित्याकडून अस्वस्थ मानसिकतेचा तोल सावरण्याचे काम

स्वतःच्या जाती धर्मातल्या वाईट गोष्टीवर सुद्धा प्रहार करण्याचं काम या लेखकांच्या लेखणीने केलं आहे. अशीच जबाबदारी आज प्रत्येक साहित्यिकांवर येऊन पडलेली आहे. मध्यंतरीच्या दोन वर्षातील कोरोनाच्या काळात समाजात आमुलाग्र बदल झाला. कुटुंबांची मानसिक कोंडी झाली. नाते संबंध दुरावले. डोळ्याला न दिसणाऱ्या व्हायरसने माणूस माणसापासून अस्पृश्य झाला. सगळ्या जगाची गती थांबली. अशा काळात सुद्धा लेखकांनी आपली लेखणी चालू ठेवली होती. या काळात सुद्धा सकारात्मक साहित्य निर्मिती करून लेखकांनी समाजाच्या अस्वस्थ मानसिकतेचा तोल सावरण्याचे काम केलं होतं. हजारो उद्योगधंदे बंद पडले होते. लाखो लोक बेरोजगार झाले. जगायचं कसं या एकाच प्रश्नांनं लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं. या आपत्तीतून सुद्धा समाज बाहेर पडला. संकटात सुद्धा समाजाला बळ धरून जगायला शिकवणाऱ्या साहित्याची निर्मिती आमच्या अनेक साहित्यिक मित्रांनी केली आहे. त्यामध्ये लॉकडाऊन, ऊसकोंडी व पाणीफेरा ही पुस्तके लिहिणाऱ्या श्रीकांत पाटील यांचा आणि पाऊस काळ कादंबरीचे विजय जाधव यांचा उल्लेख करावा लागेल. मानवी अपप्रवृत्तीवर प्रायोगिक अंगाने साहित्य निर्मिती करणारे बाळासाहेब लबडे समाजाभिमुख सकस साहित्याची निर्मिती करणारे कैलास दौंड, अशोक कोळी, सप्तर्षी माळी, तनुजा ढेरे, संतोष जगताप, रविराज माने, संजय गोरडे, किरण गुरव कृष्णात खोत, आपासाहेब खोत इत्यादींचा उल्लेख करावाच लागेल.

सामाजिक प्रश्नांना लेखकाने भिडलं पाहीजे

आजच्या समाजापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. संकटं संपलेली नाहीत. काही गोष्टींच्याकडे लेखकाने गांभीर्याने व त्रयस्तपणे पाहणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी उध्वस्त झाला आहे. पर्यावरणाचा समतोल ढळला आहे. वाढत्या दारिद्र्यामुळे बालमजुरीचा व वेठबिगारीचा प्रश्न गंभीर रूप घेतो आहे. विशेषतः आदिवासी पाड्यावरील लहान मुलं की ज्या वयात त्या मुलांच्या हाती पाटी पेन्सिल असायला पाहिजे, पुस्तक असायला पाहिजे, त्या वयात ही मुलं त्यांच्या पालकांच्या कडून पाच-दहा हजार रुपयांच्यासाठी विकली जातात. धन दांडगे या मुलांना वेठबिगार म्हणून खरेदी करतात. अशी मुलं अर्धपोटी शेळ्या मेंढ्या राखण्याचं काम करतात. काही मुलांना शहरात चाललेल्या इमारतींच्या बांधकामावर मजूर म्हणून वापरली जातात. त्यांना ताकदीच्या आवाक्या बाहेरची काम करावी लागतात. ही मुल आजारी पडतात. मध्यंतरी वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली होती इगतपुरी तालुक्यात एका बापाने आपल्या सात वर्षाच्या चिमुरडीला अवघ्या तीन हजार रुपयासाठी विकली. पैशाच्या बदल्यात ती मुलगी एका श्रीमंताच्या घरात धुणी भांडी धुण्याची काम करत होती. चार वर्षे काम करता करता ती खंगून गेली. आजारी पडली, अर्धमेली झाली तेव्हा धनिकाने औषध पाणी न देता तिला तिच्या बापाच्या दारात आणून ठेवले आणि औषध पाण्याविना त्या अकरा वर्षाच्या मुलीने तडफडून प्राण सोडला. ही घटना एक संवेदनशील माणूस व नागरिक म्हणून आपल्या सर्वांना मान खाली घालायला लावणारी आहे. अशा प्रश्नांना लेखकाने भिडलं पाहिजे आणि अशा व्यवस्थेच्या विरोधात लिहिलं पाहिजे. घटनेने बाल कामगार कायदा केला त्या कायद्याने काय काम केले हे प्रश्नचिन्हच आहे. खरंतर कायदा हा धन दांडग्यांच्यासाठीच असतो की काय अशी परिस्थिती आपण अनुभवतोय. विजय मल्ल्या, निरव मोदी ही माणसं देशाला करोडो रुपयांना बुडवून विमानात बसून दिवसाढवळ्या देशातून परदेशात निघून जातात आणि लाखभर रुपयांच्या कर्जासाठी आमच्या शेतीचा लिलाव होतो. स्त्रियांच्यावर सामुदायिक बलात्कार करणारे गुंड कोणाच्यातरी आश्रयाखाली सुरक्षित राहतात. या गोष्टी कोणत्या कायद्यात बसतात.

कुठे आहे समानता ?

मला या ठिकाणी जगद्विख्यात कादंबरीकार जॉर्ज ऑरवेल यांच्या ॲनिमल फॉर्म या कादंबरीतील एक वाक्य आठवतं. ते म्हणजे ऑल एनिमल्स आर इक्वल बट सम एनिमल्स आर मोअर इक्वल. म्हणजे कायद्यापुढे सारे समान आहेत परंतु त्यातले मूठभर प्रभावशाली राज्यसत्ता चालवणारे राज्यकर्ते यांना विशेष अधिकार असतात. त्यामुळे न्यायापुढे सारे समान, कायद्यापुढे सारे समान, परंतु काही विशेष लोक कायद्यावर राज्य करतात. आज यापेक्षा काय वेगळी परिस्थिती आहे भारतीय संविधानाने स्वातंत्र्य समता व बंधुता ही तीन मूल्ये बहाल केली आहेत. पण आज गरीब माणूस स्वातंत्र्य उपभोगतोय का ? कुठे आहे समानता ? गरिबी आणि श्रीमंतीची दरी रुंदावत चालली आहे. ही रोखणारी व्यवस्था आहे काय ? सामाजिक बंधुभाव जातीच्या व धर्माच्या दावणीला बांधला आहे. आपल्याला या सर्व गोष्टींच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. मला माहिती आहे. व्यवस्थेवर लिहिरावांना तान्यांना गुन्हेगार ठरवले जाते आहे. तरीसुद्धा ही गुन्हेगारी लेखकाला करावीच लागेल. आपण जर लेखणी बंद केली तर लोकशाही हुकूमशाहीच्या दिशेने प्रवास करेल आणि आपण हाती घेतलेलं चांगल्या व सुंदर समाज निर्मितीचं कार्य अपूर्ण राहील. असं म्हटलं जातं की ‘जे जे देखे न रवी, ते ते देखे कवी ‘आपल्याला जर अनंता पलीकडचे दिसत असेल तर सभोवतीच वास्तव का दिसू नये. हे वास्तव पाहून व्यक्त होण्याचे बळ तुम्हा सर्व साहित्यिकांना आणि तुमच्या लेखणीला लाभो असा आशावाद व्यक्त करतो.

हेतू एकच मराठी भाषा समृद्ध करण्याचा…

जाता जाता आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो. आता मराठी साहित्यात अनेक वेगवेगळ्या विचार प्रवाहांची साहित्य संमेलने होत असतात. दलित साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, स्त्रीवादी साहित्य संमेलन, धनगर साहित्य संमेलन, जैन साहित्य संमेलन, लिंगायत साहित्य संमेलन, मुस्लिम साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन अशा वेगवेगळ्या नावाने अनेक साहित्य संमेलने भरतात. मला वाटते अशी सर्व साहित्य संमेलने ही झालीच पाहिजे कारण ही सर्व साहित्य संमेलने मराठी भाषेची आणि साहित्याचे बळ व वैभव वाढवत असतात. कारण आम्हा सर्वांचा विचार भिन्न असला तरी हेतू मात्र एकच असतो. तो म्हणजे मराठी भाषा आणि मराठी साहित्य समृद्ध करण्याचा ज्याप्रमाणे आषाढ महिन्यात लाखो संत सज्जनांची आषाढीवारी पंढरीच्या दिशेने सुरू होते. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठी मुलखातून अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतात. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, जनाई मुक्ताई, निवृत्तीनाथ, शेगावची गजानन महाराज यांची दिंडी, नवनाथांच्या दिंड्या अशा कितीतरी शेकडो दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने ज्ञानोबा तुकोबाचा आणि विठ्ठल रुक्माईचा राम कृष्ण हरी म्हणत टाळ मृदुंगाचा गजर करीत निघतात. या सर्व दिंड्यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शेवटी या सर्व दिंड्या पंढरीतील पांडुरंगाच्या चरणी चंद्रभागेच्या तीरावरती एकत्र येऊन विसावतात आणि एकमेकांना गळा भेट देत हरिनामाचा गजर करतात तद्वतच आपण सर्वजण वेगवेगळ्या वाटेवरचे साहित्याचे वारकरी शेवटी मराठी भाषा आणि मराठी साहित्याच्या सागराला जाऊन मिळत असतो याचे भान राखून गटातटांच्या पलीकडे जाऊन आपण मराठी भाषा व मराठी साहित्य समृद्ध करीत राहिलं पाहिजे तर आणि तरच मराठी भाषेला व साहित्याला वैभवाचे दिवस येतील एवढेच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र,


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कोकेडमा कसे तयार करायचे ?

चंगेरी – ओळख औषधी वनस्पतीची

Videos : श्री अंबाबाईची विविध रुपातील पुजा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading