भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो. समाजात वावरताना भाषेला विशेष स्थान आहे. भाषेविषयी मानवाचे जीवन जणू अंधारच. त्यामुळे भाषाविषयीचा जिव्हाळा, गौरव असणे स्वाभाविक आहे. आपण वेगवेगळे भाषा दिन साजरा करतो, परंतु ते दिनविशेषाला अनुषंगाने साजरा होत असते.
एकनाथ पवार, नागपूर
मराठी साहित्य क्षेत्रात वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज हे एक ख्यातनाम व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नाटक , कथा, कांदबरी, कविता, समिक्षा अशा वैविध्यपूर्ण ज्ञानमंचावरुन मराठीला गौरवीले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजाचे योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांची जयंती ‘मराठी भाषागौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ मध्ये झाला. तेव्हापासून राज्यात दरवर्षी २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषागौरव दिवस’ म्हणून साजरा होतो. परंतु मराठी भाषा गौरव दिनाला मराठी राजभाषा दिवस समजून सर्वसामान्यांमध्ये मात्र गल्लत होतांना दिसून येते. वास्तविक पाहता हे दोन्ही दिवस भिन्न आहेत. मराठीचा सन्मान वाढविण्यात अनेकांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात मराठीतील ‘विवेकसिंधु’ हा पहिला ग्रंथ लिहिणारे आद्यकवी श्रेष्ठ मुकुंदराज होय. ‘विवेकसिंधु’ हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ मानले जाते. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० सालातील असल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेत पहिले ग्रंथ लिहीणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण होतो.
मराठी राजभाषा दिन
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भाषा ही विशिष्ट व्यक्तीची नसुन ती समुहाची असते. शिवाय महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त ‘मराठी राजभाषा दिन’ अर्थात ‘मराठी भाषा दिन’ १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करुन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. तसेच अमराठी अधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित करुन राज्यकारभारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला.
महाराष्ट्र राजभाषा दिवस जाहिर केल्यानंतर 1 मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जात होता. मराठी राजभाषा दिनासह याच दिवशी महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिनही साजरा करण्यात येत होता. परंतु, या दोन्ही दिवसांमुळे ‘मराठी राजभाषा दिना’कडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी पुन्हा शासन निर्णय काढून 1 मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ कायम असून तो साजरा करण्यात यावा, अशा सूचना दिल्या. १ मे राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे निर्णयही घेण्यात आले.
जागतिक मातृभाषा दिन
‘मराठी राजभाषा दिन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिना’प्रमानेच 21 फुब्रुवारी रोजी जागतिक ‘मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक पातळीवरील संस्थेनेच 21 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दिवशी आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी दरवर्षी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान आणि गौरव असतो. प्रत्येकाला स्वतःची मातृभाषा ही एक विशेष असते. आपली मातृभाषा टिकून रहावी, मातृभाषेतील गोडवा , तिचे सौंदर्य अबाधित रहावे, प्रत्येक मातृभाषेचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक स्तरावर मातृभाषा दिन साजरा केला जातो. जगातील हजारो बोलीभाषेबरोबरच भारतात देखील शेकडो बोलीभाषा बोलल्या जातात. या बोलीभाषेचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
प्रत्येक भाषादिनविशेषाचे स्वतंत्र महत्व
भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो. समाजात वावरताना भाषेला विशेष स्थान आहे. भाषेविषयी मानवाचे जीवन जणू अंधारच. त्यामुळे भाषाविषयीचा जिव्हाळा, गौरव असणे स्वाभाविक आहे. आपण वेगवेगळे भाषा दिन साजरा करतो, परंतु ते दिनविशेषाला अनुषंगाने साजरा होत असते. महाराष्ट्रात 1 मे रोजी साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’, जगभरात 21 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि राज्यात 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असलेला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हे तीनही दिन वेगवेगळे दिनविशेष आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे. परंतु काही वर्षांपासून मात्र मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषागौरव दिवस याविषयी सर्वसामान्यांमध्ये गल्लत होतांना दिसून येते. वास्तविक पाहता भाषा ही समुहाची असते शिवाय प्रत्येक दिनविशेषाचे एक विशेष महत्त्व असते हे यानिमित्ताने अधोरेखित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.