शिक्षणाचिये द्वारी हे पुस्तक प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि वाचनालयात असणे अत्यंत गरजेचे आहे. इतका हा लेखसंग्रह शिक्षणक्षेत्रासाठी अत्यावश्यक आहे. लेखसंग्रहाचा शेवट करताना लेखक एक चिंतनशील, विचारनीय असं वास्तव मांडतात,’ आज ४९ टक्के शिक्षित हात बेकार आहेत. ते आणखी वाढत जाण्याचा धोका आहे.’
नागेश शेवाळकर, पुणे
९४२३१३९०७१
एक लेखक (संदीप वाकचौरे), एक प्रकाशक (घनश्याम पाटील), एक विषय (शिक्षण)अशा आगळ्यावेगळ्या त्रिवेणी संगमातील पुढील पुष्प म्हणजे ‘शिक्षणाचिये द्वारी’ हा अतिशय वाचनीय, ज्ञानवर्धक आणि उद्बोधक असा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. तंत्रज्ञान फार झपाट्याने पुढे जात आहे, जो या बदलत्या युगाची कास धरून चालतो तो यशस्वी होतो. घनश्याम पाटील हे अशाच नाविन्याच्या शोधात असलेले प्रकाशक आहेत. लेखक असो, चित्रकार असो ते सातत्याने नवीन आणि उत्कृष्ट ह्यांना पुढे आणतात.
सध्ययुगात ‘एआय’ ही एक नवीन जादू सर्वांना भुरळ घालत आहे. एआय मार्फत प्रस्तुत संग्रहाचे अतिशय विलोभनीय असे मुखपृष्ठ वाचकांना मोहिनी घालते. बाकी अंतरंग हे लेखक आणि प्रकाशक यांचा आत्मा असल्याप्रमाणे सजविलेले आहे.
शिक्षणाचिये द्वारी ह्या लेखसंग्रहात शिक्षणा क्षेत्रावर अभ्यासपूर्ण लिहिलेले तेहतीस लेख आहेत. त्यांची भाषा बोजड नाही, सर्व सामान्यांना सहज समजेल, भावेल अशी आहे त्यामुळे लेखसंग्रह वाचनीय झाला आहे. लेखकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ‘माझे ते खरे’ असा दृष्टिकोन नसून ‘खरे तेच माझे’ असा आहे. स्वतःचे मत ते लादत नाहीत तर आपल्या विधानाची पुष्टी करण्यासाठी देश विदेशातील विचारवंत त्याबद्दल काय म्हणतात, त्यांचे ते मत वेळोवळी आपल्या लेखांमध्ये उद्धृत करतात. लेखकाचा हा प्रामाणिकपणा वाचकांना भावल्याशिवाय राहत नाही. त्यांचे वाचन किती सखोल आहे, त्यांचा शब्द साठा किती विपुल आहे आणि महत्त्वाचे म्हणजे शब्द वापरण्याची त्यांची हातोटी लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
या संग्रहाला कुलगुरूप्रा. संजीव सोनवणे यांची शिक्षणाविषयी चिंतनात्मक प्रस्तावना लाभली आहे. यावरून या लेखसंग्रहाचे महत्त्व लक्षात यावे. “आज ज्ञानाऐवजी धनाला महत्त्व आले आहे आणि त्यागाऐवजी भोगाला महत्त्व प्राप्त झाले आहे…” हे प्रा. सोनवणे यांनी मांडलेले सामाजिक विदारक सत्य चित्र आपली दुर्दशा अधोरेखित करते. प्रकाशक घनश्याम पाटील यांनी केलेली पाठराखण विषयानुरूप आहे.
‘संवाद मनातील’ या आपल्या मनोगतात लेखक लिहितात, ‘विकासाची चांगली फळे चाखण्यासाठी आपल्याला शिक्षणातून माणसांची मने घडवायला हवी असतात…’ किती आशयघन संदेश आहे हा ! माणूस शिक्षित झाला, उच्चशिक्षितही झाला, मोठ्या पदावर गेला परंतु तो मनाने सर्वांपासून दूर जात असेल तर त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. विकासाची प्रक्रिया जर दोन माणसातील आणि पुढे जाऊन दोन जातींमधील माणसांची मने दुखावून होत असेल तर तो विकास कुचकामी ठरतो. हे निश्चित !
काही दशकांपासून आपला प्रवास महासत्तेच्या दिशेने सुरू आहे असं मानल्या जात आहे. महासत्तेचा प्रवास यशस्वी होण्यासाठी तो गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या महाद्वारातूनच होतो अशा आशयाचा एक दूरगामी विचार ‘शिक्षण राजकीय अजेंड्यावर कधी?’ या लेखात वाचायला मिळतो. या लेखाची सुरुवात ‘देशात निवडणुकांचे वारे वाहू लागतात, राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असतात तेव्हा प्रत्येक पक्षाने आपापला जाहीरनामा प्रकाशित केलेला असतो. देशातील अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यात शिक्षणाचा उल्लेख सोडला तर फारसे काही दिसत नाही.’ या वाक्याने करून शिक्षणाचे महत्त्व विविध बाजूंनी स्पष्ट केल्यानंतर लेखाचा शेवट लेखक एका महत्त्वपूर्ण वाक्याने करतात….
‘माणसांच्या चिंता कमी करणाऱ्या आणि आनंददायी आयुष्याचा आलेख शिक्षणातून निर्माण होत असतो. ती माणसांची गरज आहे. त्यामुळे आज हरवलेले शिक्षण उद्यासाठी तरी भविष्यात जाहीरनाम्यातून दिसू लागावे अशी अपेक्षा आहे.’ यातून शिक्षणा क्षेत्राचे भवितव्य राजकारण्यांच्या हातात कसे जाऊन बसले आहे स्पष्ट होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षकांचे आचारविचार किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे स्पष्ट करताना लेखक वाकचौरे लिहितात,’शिक्षकाने एखादा विचार किती पचविला यावरच विद्यार्थ्यांचे शिकणे अवलंबून असणार आहे. पुस्तके कितीही शिकवली तरी ती पचत नाहीत. शिक्षकाने जे शिकवायचे आहे ते पचविण्यासाठी आपला प्रवास शिक्षक ते आचार्यांपर्यंत नेण्याची गरज असते.’ आपले मत स्पष्ट करण्यासाठी लेखक विनोबा भावे ह्यांचा विचार मांडतात.
एरिक हॉपर, विनोबा भावे, महात्मा गांधी, जे. पी. नाईक, सॅम पित्रोदा, डॉ. जेफ्री, अमित वर्मा, इमर्सन, लोकमान्य टिळक, कृष्णमूर्ती, मॅकोले, डॉ. कलाम इत्यादी शिक्षणतज्ज्ञांची, विचारवंतांची मते, तसेच संत नामदेव, गौतम बुद्ध यांची काही उदाहरणे लेखक संदीप वाकचौरे यांनी उद्धृत केली आहेत, ती अनाठायी नसून विषयाचा आवाका अधिक स्पष्ट करणारी आहेत.
कोठारी आयोगाच्या महत्त्वपूर्ण शिफारशींबद्ल जे. पी. नाईक ह्यांनी व्यक्त केलेले मत आजच्या शैक्षणिक अपयशाची चिरफाड करते. नाईक नोंदवतात, “आम्ही आयोगाने अहवाल सादर केल्यावर असे गृहीत धरले होते की, या क्षेत्रातील उच्चस्तरीय अधिकारी आणि शिक्षक वर्ग हे आमच्या शिफारशी उचलून धरतील आणि योगदान देतील पण या दोन्ही घटकांनी आमचा पराभव केला.”
हे जळजळीत सत्य वाचून एकदम धक्का बसल्यागत होतो. ज्यांच्या हाती शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाची डोर आहे तेच घटक इतके अनास्थायी असतील तर मग सारेच संपले.
शिक्षणक्षेत्र एक महासागर आहे. लेखक संदीप वाकचौरे हे सातत्याने त्यात विहार करीत असतात. त्यावेळी त्यांना जे चांगले वाईट दिसते, हाती येते ते आपल्या लेखनशृंखलेच्या माध्यमातून नित्यनेमाने शब्दांच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांची तळमळ, धडपड यशस्वी होवो हीच सदिच्छा !
शिक्षणाचिये द्वारी हे पुस्तक प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि वाचनालयात असणे अत्यंत गरजेचे आहे. इतका हा लेखसंग्रह शिक्षणक्षेत्रासाठी अत्यावश्यक आहे. लेखसंग्रहाचा शेवट करताना लेखक एक चिंतनशील, विचारनीय असं वास्तव मांडतात,’ आज ४९ टक्के शिक्षित हात बेकार आहेत. ते आणखी वाढत जाण्याचा धोका आहे.’ हा धोका वाढू नये अशा शुभेच्छा तरुणांना देऊन थांबतो.
लेखक, प्रकाशक या द्वयीच्या हातून अशीच शैक्षणिक सेवा घडो, इतर कोट्यवधी हातांची साथ त्यांना मिळो. हीच अपेक्षा!
पुस्तकाचे नाव – शिक्षणाचिया द्वारी : लेखसंग्रह
लेखक : संदीप वाकचौरे
प्रकाशक : घनश्याम पाटील {७०५७२९२०९२}
मुखपृष्ठ : एआय
पृष्ठ संख्या : १७६
मूल्य : ₹ ३००/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.