आज बांधकाम क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत असून भावी अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काळाबरोबर असणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते.
प्रकाश मेढेकर
स्थापत्य सल्लागार
पुणे
मो . ९१४६१३३७९३
ई मेल prakash.5956@gmail.com
१९८२ साली कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी विशेष श्रेणीत संपादन करून जगातील बलाढ्य बांधकाम क्षेत्रात मी पाय ठेवला. त्यावेळी सरकारी, शिक्षण आणि खासगी अशा तीनही क्षेत्रात काम करण्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे होते. यापैकी खासगी क्षेत्रातच काम करण्याचे मी निश्चित केले. विशेष श्रेणीतील पदवी हातात घेऊन पहिल्या नोकरीसाठी सायकलवरून पुण्यातील अनेक कंपन्यांचे दरवाजे ठोठावले. प्रत्येक ठिकाणी आम्हाला फ्रेश नको तर अनुभवी इंजिनीअर पाहिजे अशी मागणी होती.
अनुभवासाठी नोकरी हवी आणि कोठेतरी नोकरी केल्याशिवाय अनुभव मिळत नाही हे दृष्टचक्र आजही अनेक अभियंत्यांच्या नशिबी आहेच. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर या उक्ती प्रमाणे एका बिल्डरकडे माझ्या पहिल्या नोकरीची सुरवात झाली. सुदैवाने पुढील आयुष्यात त्यानंतर मला कोठेच थांबावे लागले नाही. चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाने देशाविदेशातील बांधकाम प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. इराक, ओमान आणि मलेशिया या विदेशातील बांधकाम प्रकल्पावरील अनुभव माझ्यासाठी लाख मोलाचा ठरला. सुरवातीच्या काळात पैसे किती मिळतात याकडे मी जास्त लक्ष दिले नाही. त्या ऐवजी बांधकाम क्षेत्रातील विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करत गेलो.
१९९६ साली मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे भारतीय कामगारांचे नेतृत्व करून मेट्रो स्टेशन बांधली. आमचा प्रोजेक्ट बांधा वापरा आणि हस्तांतर करा म्हणजे बीओटी या तत्वावरील जगातील पहिला प्रकल्प होता. या कामाची २००९ साली तत्कालीन राष्ट्रपती ए .पी. जे. अब्दुल कलाम यांनी पुण्यातील प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले. आपल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. त्यांच्या याच शब्दांनी माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली.
पुढील काळात लगेचच माझ्यातील सुप्त लेखन गुण ओळखून सकाळ माध्यमाने बांधकाम विषयक लेखन करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि सकाळच्या वास्तू पुरवणीतून लेखनाची मला संधी दिली. बांधकाम क्षेत्राची व्याप्ती महाप्रचंड असल्याने लेखनासाठी लागणारे विषय आपोआपच सुचत गेले. पारंपरिक आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य, अष्टपैलू काँक्रीट, अत्याधुनिक यंत्रप्रणाली, इमारतींसाठी आणि शहरांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी संकल्पना, पाणी आणि उर्जेची बचत अशा अनेक विषयांवर लेखन झाले. कळत नकळत दहा वर्षात अंदाजे २०० लेख प्रसिद्ध झाले. लेखन करताना विविध नवीन विषयांचा अभ्यास केला गेला.
२०१४ साली मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने समाज आणि राष्ट्रापती निष्ठेने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून “मानव अधिकार पुरस्कार” प्रदान केला. त्याच वर्षी देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्थेने “आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ” पुरस्काराने सन्मानित केले. अशा गौरवाने माझी लेखनातील जबाबदारी अधिक वाढली. सकाळ वास्तूमधील माझे लेखन समाजातील सर्व स्तरातील लोकांना मनापासून आवडले आणि अशा उपयुक्त लेखांचे पुस्तक असावे अशी अपेक्षा अनेकांनी माझ्याकडे व्यक्त केली.
२०१६ साली पुस्तक करण्याबाबत सकाळ माध्यम समूह आणि सकाळ प्रकाशन यांनी मान्यता दिली. “ दिशा बांधकाम नवनिर्मितीची ” या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागला. माध्यमातून लेख लिहणे सोपे आहे परंतु त्यांचे पुस्तकात रुपांतर करणे ही प्रदीर्घ प्रक्रिया असते. २०१७ साली प्रकाशित झालेल्या माझ्या पुस्तकाने आज पाचव्या आवृत्तीत पदार्पण केले आहे. अभियांत्रिकीतील अवघड विषयांची साध्या आणि सोप्या मराठी भाषेत मांडणी, खिशाला परवडणारी किंमत, लेखक आणि सकाळ प्रकाशनाचे प्रयत्न यामुळेच हे शक्य झाले. या पुस्तकात सिमेंट, स्टील, नैसर्गिक दगड, काच, अल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, बायसन बोर्ड, प्लास्टिक फॉर्मवर्क, सीलिंग टाइल्स, फ्लाय अॅश , बांबू ई बांधकाम साहित्यांवरील माहितीपूर्ण लेख आहेत.
पाण्यानंतर जगात सर्वाधिक वापरली जाणारी वस्तू म्हणजे काँक्रीट. काँक्रीट मधील सेल्फ कॉम्पाक्टिंग , ग्लास फायबर , सेल्युलर , पारदर्शक, उष्ण तापमानातील , फेरोक्रीट, पेपरक्रीट याविषयी सखोल लेख आहेत. अत्याधुनिक यंत्रप्रणालीमध्ये क्रेन, पेव्हर, मिक्सर, पंप, रोलर, रॉक ब्रेकर, बुलडोझर, ग्रेडर, लोडर, काँक्रीट आणि अॅस्फाल्ट बॅचींग प्लॅन्ट, कॉम्पाक्टर, टीबीएम याविषयी माहितीपूर्ण विवेचन आहे. इमारतींसाठी लागणारी अग्निप्रतीबंधक यंत्रणा, कचरा वर्गीकरण, प्लम्बिंग, रंगकाम, नॅनो तंत्रज्ञानाचा वापर, प्रीइंजिनीअर्ड तंत्रज्ञान, भूकंपप्रतिकारक तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीसाठी लागणारे खोदाई विरहीत तंत्रज्ञान, वॉटरजेट प्रणाली, जीपीएस प्रणाली, भूजल सर्वेक्षण तंत्र, उड्डाणपुल बांधणी, चारचाकी पार्किंग यंत्रणा, रस्तेबांधणी, काँक्रीट, रबर आणि प्लास्टिकचा पुनर्वापर या विषयांवरील लेखांचा समावेश आहे. स्थापत्य अभियांत्रिकीची निवड केलेले सर्व अभियंते, बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणारे कंत्राटदार, सुपरवायझर, आर्किटेक्ट आणि घरांचे स्वप्न बाळगणारे सर्वसामान्य यांच्यासाठी मार्गदर्शक असे आहे.
आज बांधकाम क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत असून भावी अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काळाबरोबर असणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते. त्यांना नोकरीच्या , व्यवसायाच्या या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. परंतु त्यासाठी त्यांना बांधकाम विषयक पुस्तकांचे वाचन, नावीन्य शोधण्याचा ध्यास, चिकाटी, धाडस , कठोर परिश्रम, आत्मविश्वास, चांगल्या कामासाठी लागणारा थोडासा संघर्ष, संघभावना, आईवडील व गुरुजनांविषयी आदर आणि त्यांचे आशीर्वाद, आपल्या कॉलेज विषयी जाज्वल्य अभिमान असे गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे.
दिशा बांधकाम नवनिर्मितीची… पुस्तकासाठी संपर्क – कुणाल मांडे ९९२२६८६९०० , ८८८८८४९०५०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.