July 27, 2024
Rajendra Ghorpade article on Guru Shishya
Home » गुरू-शिष्याचे ऐक्य
विश्वाचे आर्त

गुरू-शिष्याचे ऐक्य

आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर त्यांना खरा आनंद मिळत असे. शिष्याच्या प्रगतीतच त्यांना समाधान वाटत
असे, इतका जिव्हाळा या नात्यामध्ये होता.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ।। ४५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – जसे दोन ओठ पण बोलणें एक, पाय दोन पण चालणें एक, त्याप्रमाणें, तूं विचारणारा व मी सांगणारा, ह्या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे.

बदलत्या काळानुसार गुरू आणि शिष्य या नात्यातही मोठा बदल होत आहे. पूर्वीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना हातात छडी घेऊन शिकवत होते. विद्यार्थीही त्यांचा मार खात असे, पण त्यांनी मार का दिला याचा विचार करून त्याच्या मनामध्येही बदल होत असे. तो सकारात्मक बदल असे. काही विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्या शिक्षकांनी असा मार दिला, त्यामुळे ते इतके मोठे होऊ शकले, त्यातून अनेक बोध घेऊ शकले, असे सांगतात.

हे अनुभव ऐकताना नव्या पिढीला खूपच आश्चर्य वाटते. आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर त्यांना खरा आनंद मिळत असे. शिष्याच्या प्रगतीतच त्यांना समाधान वाटत असे, इतका जिव्हाळा या नात्यामध्ये होता. असे गुरू नव्या पिढीत पहायला मिळत नाहीत. शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे तसे गुरू-शिष्य या नातेसंबंधातही मोठा बदल होत आहे.

पाश्चिमात्य गुरूंमध्ये त्याग, आत्मियता, जिव्हाळा, तळमळ पहायला मिळत नाही. हीच संस्कृती सध्या नव्या पिढीत जोपासली जात आहे. नाती आता पैशाने मोजली जात आहेत. सध्या पदव्याही विकत मिळतात. शिक्षणासाठीचे वाढते शुल्क विचारात घेता त्यानुसारच शिक्षण मिळत आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी अधिक पैसा मोजावा लागत आहे. त्यानुसार तसे विचारप्रवाहही बदलत आहेत. शिक्षणाच्या या व्यापारामुळे गुरू-शिष्य संबंधालाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

पैशाच्या तुलनेत शिक्षण दिले जात आहे. अशा शिक्षण संस्थांत त्याग, पूज्यता, गुरूंचा सन्मान या गोष्टी कशा काय शिल्लक राहतील? वर्गात किती तास शिकवले यावरच त्यांची पात्रता ठरवली जाते. त्यावरच त्यांना पगार मिळतो. शिष्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी तीही पैशाच्या तुलनेत मोजली जाते. अशा या नव्या पिढीला त्यागी गुरू कसे मिळतील ?

पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सुक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तीच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत. आत्मज्ञान प्राप्ती ही स्वतःच्या पात्रतेने मिळते. ती पात्रता, ती शुद्धता, तो मान स्वतः मिळवावा लागतो. सद्गुरु या ज्ञानाची अनुभुती देतात अन् शिष्याला त्या मार्गानेक्रमण करण्यास सांगतात. आत्मज्ञानी झाल्यानंतर गुरु अन् शिष्यात भेद असा राहात नाही. दोघांच्यात ती साम्यावस्था प्राप्त होते. हीच परंपरा पुढे तो इतर शिष्यांना शिकवतो अन् ही ज्ञानदानाची परंपरा अखंड युगानयुगे सुरु आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीचे विहंगम चित्र

भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर पोस्टर स्पर्धा

‘सामाजिक प्रदूषण’ ठरते आहे सर्व समस्यांचे मूळ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading