March 30, 2023
A true devotee is a devotee with a desire to attain enlightenment
Home » आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त
विश्वाचे आर्त

आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त

आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो,. पण आजच्या पिढीत हे दिसून येत नाही. गणेश उत्सवात, नवरात्रीमध्ये अध्यात्माचा गंधही दिसत नाही. नुसते टिळे लावले म्हणजे भक्त झाला, असे होत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पार्था या जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तया लागी । अखंड मज ।। २३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ – अगा अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते.

सध्या अध्यात्माकडे तरुणपिढी वळलेली पाहायला मिळत नाही. साधना, अध्यात्म यात फारसा रस कोणी दाखवतही नाही, पण देवदर्शनासाठी सगळीकडे रांगांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. गणेश उत्सवात गणपती पाहण्यासाठी गर्दी केली जाते. नवरात्र आले की देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. इतरही अनेक जातीधर्माच्या मंदिरांत दर्शनासाठी रांगांच्या रांगा पाहायला मिळतात. पंढरीत तर नेहमीच दर्शनासाठी मोठी रांग असते. आळंदीतही गर्दी होते. दर्शन मिळावे, हीच प्रत्येकाची इच्छा असते.

कोणी केवळ मुख दर्शन घेऊनच समाधानी होतात, तर कोणी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. गर्दीमुळे तर केवळ कळसाचे दर्शनही घेण्याची प्रथा आहे. दर्शन कोठूनही घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचते. फक्त मनापासून दर्शन करायला हवे. मनातूनही दर्शन घडते. देवाची ओढ असणाऱ्यांना देव स्वप्नातही येऊन दर्शन देतात. फक्त दर्शनाची ओढ असावी लागते. सद्गुरूंचे सतत स्मरण करणारे भक्त त्यांना अधिक प्रिय असतात.

आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो,. पण आजच्या पिढीत हे दिसून येत नाही. गणेश उत्सवात, नवरात्रीमध्ये अध्यात्माचा गंधही दिसत नाही. नुसते टिळे लावले म्हणजे भक्त झाला, असे होत नाही. देव समजून घ्यायला हवा. ते देवत्व स्वतःमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करायला हवा. संगीताच्या तालावर नाचणे म्हणजे साधना नव्हे. भजन, कीर्तनाचे प्रकारही या अशा उत्सवांत दिसत नाहीत. नेमके हे काय चालले आहे, हेच समजत नाही.

अशा या प्रकारामुळे अध्यात्म काय आहे ? याबाबत गैरसमज पसरत आहे. नवी पिढी खऱ्या अध्यात्मापासून दूर लोटली जात आहे. देवळात दर्शनाच्या रांगा वाढल्या, पण अध्यात्म समजून घेणारे यामध्ये फारच थोडे असतात. धकाधकीच्या जीवनात या कडे दुर्लक्षही होत आहे. पर्यटन म्हणून देवदर्शनाला जाणे, हीच परंपरा आता रूढ होत आहे. देवस्थानाचा विकास हा आर्थिक विकासासाठी केला जात आहे. आध्यात्मिक विकास त्यामुळे मागे पडत आहे. तो विचारही आता या देवस्थानांच्या ठिकाणी दिसून येत नाही. यासाठी भक्तांनी खऱ्या भक्ताची लक्षणे जाणून घेण्याची आज गरज भासत आहे.

Related posts

अवधानाचे महत्त्व

छंद हा भक्तीचाच एक प्रकार

सावध रे सावध…

Leave a Comment