मानव जातीला कडेलोटाच्या,
टोकावर घेऊन जाणारा,
कोणता पाशवी विकास,
आपल्याला अभिप्रेत आहे.
आता खरंच आपण साऱ्यांनी,
गंभीर होऊन,
विचार करण्याची अनिवार्य,
गरज निर्माण झाली आहे.
हजारो शेतकऱ्यांच्या,
सृजनशील कृषी कर्माला,
मूठ माती देऊन,
एक दाणा पोटात घेऊन,
हजारो दाने करणाऱ्या,
मातीच्या पाठीवरून,
पेट्रोल, डिझेलच्या,
अजस्त्र वाहनांना,
धावण्याचा परवाना देणारा,
समृद्धी किंवा तत्सम महामार्ग ,
म्हणजे विकास ?
मातीच्या पोटातून,
तिच्या क्षमतेपेक्षा,
जास्त उत्पादन घेऊन,
तिला भाकड बनवणे,
म्हणजे विकास .?
उत्पादन वाढीच्या नावाखाली,
शेतकऱ्यांना बेसुमार कीटकनाशके,
आणि, रासायनिक औषधांचा,
फवारा करायला लावून,
माती आणि माणसाला,
नष्ट करणारी विषारी शेती व्यवस्था,
निर्माण करणे,
म्हणजे विकास ?
जगण्यासाठी जमिनीवर,
अर्धपोटी धडपडणाऱ्या,
लोकांचा विचार करण्याऐवजी,
चंद्र ,सूर्य ,मंगळाचा अभ्यास करण्यासाठी,
अब्जावधी रुपये उधळणे,
म्हणजे विकास ?
हजारो शेतकऱ्यांच्या,
जमिनी पाण्याखाली घालून,
मोठी धरणे बांधणे,.
म्हणजे विकास ?
तारांकित हॉटेल निर्माण करून ,
चायनीज ,कॉन्टिनेन्टल, पिझ्झा, बर्गर,
सारखे, विषारी पदार्थ,
खायची सवय लावणे,
म्हणजे विकास ?
ग्रामीण बाजारपेठ नष्ट करून ,
मार्ट , मॉल निर्माण करून,
वाम मार्गाने,
सामान्य माणसाच्या खिशातून,
पैसा काढणे ,
म्हणजे विकास ?
विकास म्हणजे……,
सत्य, नित्य, शुद्ध, शाश्वत जगण्याची,
प्रत्येक माणसाच्या,
मनामधील उर्मी.
विकास म्हणजे…,
रस्त्यावरून धावणाऱ्या,
वाहनांची संख्या कमी करून,
सार्वजनिक परिवहन व्यवस्था,
निर्माण करणे.
विकास म्हणजे…,
विषमुक्त शेती,
सकस ,सात्विक आहार,
प्रदूषण मुक्त वातावरण.
विकास म्हणजे……,
प्रत्येकाच्या हाताला काम,
आणि ,त्याला योग्य दाम .
तणाव विहिरीत, आरोग्यदायी,
आनंदी जीवन जगण्यासाठी,
भवताल निर्माण करणे,
म्हणजे शाश्वत विकास.
राजा माळगी 9421711367
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.