अन्य पुरस्कारार्थी असे –
लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर)
संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर)
आबा महाराज गोडसे (आळंदी)
तुकाराम महाराज भूमकर (पुणे)
राजू लोहिया (पैठण)
पैठण – ‘संत एकनाथ महाराज मिशन’च्या वतीने शांतिब्रह्मच्या नावाने दरवर्षी अध्यात्म क्षेत्रातील कर्मवीरांना देण्यात येणारे ६ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा सर्वोच्च ‘भानुदास एकनाथ पुरस्कार’ संतसाहित्याचे गाढे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांना घोषित झाला आहे. संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज तथा मिशन प्रमुख योगीराज महाराज गोसावी यांनी याबाबत माहिती दिली.
नाथांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास व प्रसार-प्रचार व्हावा या उद्देशाने शांतिब्रह्म एकनाथ महाराज मिशन (पैठण) ही सामाजिक संस्था २००६ पासून कार्यरत आहे. संस्थेद्वारा २०१८ पासून संत एकनाथमहाराजांच्या नावे प्रतिवर्षी ६ पुरस्कार दिले जातात. विशेषत: अध्यात्म क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
या पार्श्वभूमीवर यंदाचा सर्वोच्च ‘भानुदास एकनाथ पुरस्कार’ संतसाहित्याचे अभ्यासक, संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे (देहू) यांना देण्यात येणार असून, श्रीफळ, ताम्रपट, मानपत्र, नाथांचा फेटा, नाथमूर्ती, ‘एकनाथी भागवत’ ग्रंथाची प्रत आणि रोख २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संत एकनाथ महाराज संस्थानचे संस्थापक व अधिपती नाथवंशज वै. रंगनाथबुवा ऊर्फ भैयासाहेब महाराज (पैठणकर) यांच्या नावाने देण्यात येणारा दुसरा ‘वारकरी भूषण पुरस्कार’ हा बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर) यांना देण्यात येणार आहे. ‘संत एकनाथ महाराज प्रबोधन- मार्तंड पुरस्कार’ हा संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर) यांना तर संत एकनाथ महाराज स्वरमार्तंड पुरस्कार’ हा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ उपासक आबा महाराज गोडसे (आळंदी) यांना जाहीर झाला आहे. संत एकनाथ महाराज तालमार्तंड पुरस्कार’ हा मृदंगाचार्य तुकाराम भूमकर (पुणे) यांना दिला जाणार आहे. संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार’ चे मानकरी हे राजू लोहिया (पैठण) हे आहेत. पैठण येथे नाथसमाधी मंदिर परिसरात २५ वर्षांपासून ते वारकरी नाथभक्तांना संध्याकाळी अन्नदान करत आहेत.
नाथषष्ठी सोहळ्याप्रसंगी पुरस्कार वितरण
नाथषष्ठी यात्रोत्सवाचे यंदा ४२६ वे वर्ष आहे. २० ते २२ मार्चदरम्यान हा सोहळा होणार आहे. २१ रोजी सप्तमीच्या पर्वावर हा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ११ वाजता गावातील नाथमंदिर परिसरातील संत नरहरी सोनार महाराज धर्मशाळेत होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पैठणकर, वारकरी व नाथभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन योगिराज महाराज गोसावी यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.