झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे, हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।। १८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – मग मी त्या योगाने सावरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णफुले करून ती संतांना घालीन
साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर साधनेत लागले तर दूरचे आवाजही स्पष्ट ऐकू येतात. साधनेमुळे श्रवणशक्तीत सुधारणा होते. असे साधनेचे अनेक फायदे आहेत. यातील हा एक फायदा आहे, पण दूरच्या या आवाजांनी मन विचलित होऊ देऊ नये. मनाला सोहम् च्या ठिकाणीच स्थिर करणे गरजेचे आहे. हळूहळू प्रगती होत राहते. एकदम झटकी पट सर्वच मिळते, असे नाही.
सध्याच्या युगात झटपट गोष्टी मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना अशाच गोष्टीत अधिक रस वाटू लागला आहे. जुन्या पिढीत असे नव्हते. जुन्या पिढीत सहनशीलता खूप होती. हे सांगणारे अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. प्रगतीच्या वेगामुळे झटपट यश मिळायला हवे ही मानसिकता आता रुढ झाली आहे. पण अशाने सहनशीलता कमी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अशाच काही विचारातून होत आहेत. कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीतून कृषी उत्पादकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते आणि यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हे प्रमाण तरुण शेतकऱ्यांमध्ये अधिक असल्याचेही पाहायला मिळत आहे. आत्महत्या केलेल्या एका द्राक्ष उत्पादकाच्या वडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. ते म्हणाले की, सध्याच्या पिढीला झटपट यश मिळविण्याची हाव लागली आहे. त्यांनी एक एकर द्राक्षबागेच्या उत्पन्नातून काही वर्षातच दीड एकर शेती विकत घेतली होती. असे यश त्यांच्या मुलाला कमवायचे होते, पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. यात असे यश झटपट मिळणार नाही. थोडी सहनशीलता ठेवायला हवी. धीर धरायला हवा. हा विचार आताच्या पिढीत नाही. एक-दोन वर्षाच्या नुकसानीतून इतके निराश होण्याची काहीच गरज नाही. निसर्गाच्या आपत्तीने नुकसान होते. पण ते एकदा होते. वारंवार होत नाही. यातून निराश होऊन आत्महत्या हा काही मार्ग नव्हे. हे या तरूण पिढीला समजतच नाही. नुकसानीने आलेली निराशा ही पिढी बोलूनही दाखवत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हे तरुण शेतकऱ्यांच्या बाबत झाले. पण हा प्रकार इंजिनिअर, उद्योजक आदींच्याबाबतही पाहायला मिळतो. झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे, हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. ही क्रिया सतत होईल असेही नाही. मनाच्या स्थिरतेसाठी मानसिक तयारी ठेवायला हवी. अशात सहनशीलता हवी. एकदा मन रमले नाही, दोनदा मन रमले नाही म्हणून निराश न होता सातत्याने प्रयत्न करण्याची मानसिकता हवी. प्रयत्नातूनच यशाचा मार्ग मिळत असतो. पयत्नातील सातत्यच यशाकडे खेचून आणत असते. साधनेत सातत्य ठेवल्यास यश हे निश्चितच मिळते. साधनेतील यशासाठी मनात चांगले विचार, चांगले अनुभव ठेवायला हवेत. सातत्याने तसा विचार करायला हवा. कानाला चांगले ऐकण्याची सवय लावायला हवी. स्वतः करत असलेला जप स्वतःचाच कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करायला हवा. हा जप म्हणजे फुले आहेत असे समजून ऐकलेली फुले म्हणजेच ही कर्णफुले संतांना वाहावीत. यातून प्रसन्न होऊन संतांचा आत्मज्ञानाचा आर्शिवाद मिळवायला हवा.