December 2, 2023
Gulmarag the Beauty of Kashmir article by Prashant Satpute
Home » जन्नत-ए-कश्मिरच्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग !
पर्यटन

जन्नत-ए-कश्मिरच्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग !

काश्मिर सफर

‘जन्नत-ए-कश्मिर’ च्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग! गुल म्हणजे फूल ! फुलांचा मार्ग..म्हणजेच गुलमर्ग होय. सर्वधर्मसमभाव राखणारे एकमेव ठिकाण ‘जन्नत-ए-कश्मिर’ चे सर्वात सुंदर ठिकाण असे गुलमर्ग होते.

प्रशांत सातपुते

लहानपणी दारात बर्फाचा गोळेवाला यायचा..रणरणत्या उन्हात त्याचा गारवा खऱ्या अर्थाने उदरापेक्षा मनाला देवून जाई. इथे तर समोर बघेल तिकडे केवळ बर्फच बर्फ दिसत होता. शेकडो पर्यटक त्याचा आनंद घेत होते. आम्हीही मग त्यात सामील झालो. बर्फाचे गोळे एकमेकांवर मारत होतो. अगदी जत्रेत भंडारा उधळल्याप्रमाणे हवेत, अंगावर बर्फ उधळत होतो. देहभान हरपून! पुढे दूरवर बर्फाचेच पर्वत खडा पहारा देत उभे होते. जणू स्वागताला आलेले.

वर निळसर-पांढरे आकाश आणि त्याला टेकलेले पांढऱ्या शुभ्र बर्फाने संपूर्णपणे अंगभर माखलेले अन् उन्हात चमकणारे पर्वत, ताडासन करत आकाशाकडे झेपावलेले त्यावरील वृक्ष, हा स्वर्गीय नजारा मोहिनी घालून नजर खिळवून ठेवत होता. त्यातच पुन्हा ऊन जावून ढगाळ वातावरण होताना अंधारुन येणारे ढग सावलीच्या चादरीसह पळ काढत होते. आकाशरुपी कॕन्व्हासवर जणू अनेक कुंचले क्षणार्धात निसर्ग फिरवत होता. हे अलौकिक सौंदर्य डोळे भरुन पहात होतो. साठवत होतो.

एस्किमो लोक बर्फात स्लेज गाडीचा वापर करतात, असे शालेय शिक्षणात भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात वाचलेले आठवले. कारण, या ठिकाणी स्लेज पहायला मिळाली. खास पर्यटकांना ते यावरुन राईड देत होते.

घोड्यावरुन येताना अगदी सुरुवातीला स्कीईंग प्रशिक्षण केंद्र पाहिले होते. ते ही इथे पर्यटकांना उपलब्ध होते. याचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्वजण पुढे सरसावलो. ते जाडजूड वजनदार परंतु, समायोज्य बूट घालताना स्कीईंगच्या प्रशिक्षणाची जबरदस्त कल्पना आली. हातात ग्लोव्हज घातले. स्कीईंग पायात म्हणजे खरंतर बुटात अडकवले आणि दोन्ही हातात दोन आधारासाठी पोल अर्थात छडी घेतल्या. त्याच्या आधारावर तो मदतनीस आमच्याकडून स्कीईंग करवून म्हणजेच, जवळ जवळ ढकलून करवत होता. हे सगळं, सुखाचे क्षण मोबाईलमध्ये बंदिस्त होत होते.

आजवर टीव्हीतील जाहिरातींमध्ये आणि चित्रपटात पाहिलेल स्कीईंग आम्ही आज करत होतो. हा अवर्णनीय आनंद होता. हे सगळं झाल्यावर केवळ फोटोसेशन करण्यासाठी दुसरा मदतनीस आपली स्कीईंगची साधनं घेवून हजर झाला. त्यांने सुचवलेल्या पोजवर मनमुरादपणे छबी टीपून झाल्यानंतर आम्ही सर्वजण पर्वताच्या पायथ्याशी दूरवर पसरलेल्या बर्फात मार्गक्रमण केले.

थोडासा चढ चढून वर आल्यावर विस्तीर्ण बर्फाची जमीन होती ती. तेथे जमेल तसे म्हणा वा वाट्टेल तसे म्हणा, विविध पोजवर फोटोसेशन केले. बर्फात अक्षरशः मनसोक्त लोळण घेत होतो. अगदी बालपणात शिरुन मनातील लहान मुलाला जागे करुन! यात ज्येष्ठ सह पर्यटक अजिबात पाठिमागे नव्हते.

दीड-दोन तास कधी उलटले ते समजलेच नाही. या सर्व आठवणी उरात घेवून बर्फातून खाली उतरायला सुरुवात केली. पाठीवरुन आम्हाला घेवून जाण्यासाठी ‘करण-अर्जुन’ आमची वाटच पहात उभे होते. तसेच काही अंतर त्यांच्यासोबत चालत गेलो. पुन्हा खतरनाक मार्ग उतरायचा होता. यावेळी मात्र, त्याची भीती जाणवली नाही. कारण करण-अर्जुनवरील झालेला दृढ विश्वास आणि सुखद गुलमर्गच्या सौंदर्याची भूरळ अजूनही उतरलेली नव्हती.

गुल म्हणजे फूल ! फुलांचा मार्ग..म्हणजेच गुलमर्ग होय. ‘जय जय शिव शंकर..’ हे राजेश खन्नावरील चित्रित झालेले गीत ज्या मंदिराभोवती झाले, ते येथील शिवाच्या मंदिराजवळ आलो. बाजूलाच चर्च आणि मस्जिद असा सर्वधर्मसमभाव राखणारे एकमेव ठिकाण ‘जन्नत-ए-कश्मिर’ चे सर्वात सुंदर ठिकाण असे गुलमर्ग होते. सौंदर्याची खाण असणारा हा आठवणींचा गुलदस्ता सोबत घेवून आम्ही पहेलगामकडे मार्गस्थ झालो.

Related posts

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख संवाद कौशल्य धोरण राबवण्याची  गरज !

Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य

सुंडी धबधबा…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More