May 22, 2024
Every Peroson have Different Nature article by Rajendra Ghorpade
विश्वाचे आर्त

व्यक्ति तितक्या प्रकृती

गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. ही परिस्थिती उद्भवणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. मनाला प्रसन्न ठेवणारे वातावरण निर्माण करायला हवे. टीव्हीवर मनोरंजन कोणत्या पद्धतीचे आहे यालाही महत्त्व आहे. अश्लील चित्रपटातून मनाला आनंद मिळतो. पण त्यातून मनाच्या भावना भडकतात. याचा विचार व्हायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।
ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ।। 252 ।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ति, त्यांची भिन्न भिन्न नावें व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यांत अभिन्न तो मी, त्या मला ते जाणतात.

हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तसे एकाच घरातील सर्व व्यक्ती स्वभावाने सारख्या नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. कोण पुरोगामी विचारांचा असतो. तर कोण हिंदुत्ववादी असतो. तर कोणाला राजकारणच आवडत नाही. तर कोणाला फक्त समाजकार्य आवडते. सर्वांचे गुण वेगवेगळे असतात. एकाच कुटुंबात हे सर्व पाहायला मिळते. कोणाला चित्रपट पाहायला आवडतात. तर कोणाला खेळ पाहायला आवडतात. टीव्ही पाहतानाही हा फरक जाणवतो. यातून वादही होतात. सर्वांची आवड एकसारखी असू शकत नाही.

एकाच घरात चोरही असतो व पोलिसही असतो. रक्षक-भक्षक दोन्हीही असतात. कोण कसे वागेल याचा काही नेम नाही. कसे वागायचे हे प्रत्येकाच्या हातात आहे. इंद्रियातील हाव माणसाचे विचार बदलते. संत वाटणारे शिक्षकही कधी कधी नर्तकीच्या प्रेमात भुललेले दिसतात. मनावर नियंत्रण नसेल तर काहीही घडू शकते. उतारवयात स्मृती भ्रंशाचा आजारही होतो. मन नियंत्रणात ठेवले तर असे आजारही होत नाहीत. यासाठी इंद्रियांवर विजय संपादन करायला हवा.

मनाशी युद्ध करायला शिकायला हवे. जो यामध्ये यशस्वी झाला तोच खरा जितेंद्रिय ठरतो. मनाला सुटलेली हाव नियंत्रणात ठेवायला शिकले पाहिजे. आजकाल बलात्काराचे गुन्हे वाढत आहेत. खुनाच्या घटनेतही वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणावरूनही गोळीबाराच्या घटना घडत आहेत. कोणाचा तरी जीव जातो आहे याचे भानही ठेवले जात नाही. इतके मन भडकलेले आहे. या घटना रोखायच्या असतील तर माणसांची मने नियंत्रणात ठेवण्याचे उपाय योजायला हवेत. त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करायला हवा.

गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. ही परिस्थिती उद्भवणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. मनाला प्रसन्न ठेवणारे वातावरण निर्माण करायला हवे. टीव्हीवर मनोरंजन कोणत्या पद्धतीचे आहे यालाही महत्त्व आहे. अश्लील चित्रपटातून मनाला आनंद मिळतो. पण त्यातून मनाच्या भावना भडकतात. याचा विचार व्हायला हवा. अशातून गुन्हे घडत आहेत. पुढच्या पिढीस बदलत्या तंत्रज्ञानामुळे मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. अध्यात्माची कास त्यांनी यासाठीच धरायला हवी. हाच एकमेव उपाय त्यांना यातून तारणार आहे.

व्यक्ति तितक्या प्रकृती. पण या सर्व व्यक्तिमध्ये या सर्व प्रकृतीमध्ये असणारा आत्मा मात्र एकच आहे. याची जाणीव जेव्हा होईल, तेव्हा सर्वजण भानावर येतील. तेव्हा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. प्रत्येकाबद्दल आदर निर्माण होईल. साहजिकच शांतीचा नवा मार्ग उभा राहील. पण प्रत्येक व्यक्तीने आत्मज्ञानाची ओळख करून घ्यायला शिकले तरच हे शक्य आहे. तेव्हाच हे सर्व बदलेल.

Related posts

डॅा. रमेश साळुंखे यांना ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार

श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी आवाहन

काम वासनेचा नाश केल्यास क्रोधावर नियंत्रण शक्य

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406