स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. मी कोण आहे ? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे, पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात मी कोण आहे ? याचा विचार व्हायला हवा. मी एक आत्मा आहे, याचा बोध व्हायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
आतां ते तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांती निवडिलें । बीज जैसें ।।३५२।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थः ज्याप्रमाणें मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणें आतां त्यानें ते देहतादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरुपानें स्थिर राहिला आहे.
स्वतःच स्वतःचे रूप पाहायचे. स्वतःचे बाह्यरूप पाहण्यासाठी आरसा लागतो. आपल्या चेहऱ्यावर एखादा डाग लागला असेल तर तो त्यात दिसतो. चेहऱ्याचे सौंदर्य कसे आहे, हे आपण त्यात न्याहाळतो. एकंदरीत चांगले कसे दिसता येईल, याचा प्रयत्न आपण त्यातून करत असतो. केस विस्कटलेले असतील तर ते आपण व्यवस्थित करतो. नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करतो. बाह्य रूपात आपण चांगले राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो मग अंतरंगात का करत नाही ? मन स्वच्छ ठेवण्याचा का प्रयत्न करत नाही ? स्वतःचे अंतःकरणही असेच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. नुसती बाह्यरूपात स्वच्छता नको, तर अंतरंगही साफ असायला हवे. अंतर्बाह्य साफ असेल तर समस्याच उरणार नाहीत.
स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. मी कोण आहे ? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे, पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात मी कोण आहे ? याचा विचार व्हायला हवा. मी एक आत्मा आहे, याचा बोध व्हायला हवा. अंतरंगात डोकावण्यास सुरवात केल्यावर हळूहळू आपल्या चुका आपणालाच कळू लागतात. त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. यातून सात्त्विक वृत्तीत वाढ होते. याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात फरक पडतो.
काही दुखावले गेलेलेही आपल्या जवळ येऊ लागतात. संतांना अनेकांनी तुच्छ लेखले गेले आहे. त्यांचे हाल केले गेले आहे. हे फक्त भारतीय संस्कृतीतच नाही. जगातील इतर देशांतही असेच घडले आहे. येशूचाही असाच छळ झाला आहे. हे सर्व धर्मात असेच आहे, पण असत्याचा जेव्हा जेव्हा हाहाकार माजतो तेव्हा तेव्हा सत्याचा जन्म होतो आणि सत्याचा विजय होतो.
सत्यच शाश्वत आहे. सत्यच सुंदर आहे. सत्यच ईश्वर आहे, हे जाणून घ्यायला हवे. मी आत्मा आहे याचा बोध घ्यायला हवा. मळणीनंतर जसे धान्य स्वतंत्र होते तसा आत्मा या देहापासून वेगळा करावा. मग पुन्हा मिसळणे नाही. देहाची मळणी करायला हवी. आत्मा वेगळा झाल्यानंतर पुन्हा त्यात तो मिसळला जात नाही. मग तो आत्मस्वरूपी स्थिर होतो.