October 10, 2024
Love story special spiritual article by Rajendra Ghorpade
Home » Privacy Policy » एका प्रेमाची गोष्ट…
विश्वाचे आर्त

एका प्रेमाची गोष्ट…

प्रेम अंत:करणातून व्यक्त व्हायला हवे. वरवरचे दिखावू प्रेम, कधी प्रेम नसते. ती वासना असते. त्याला मोहाची किनार असते. अशा दिखावू प्रेमातून जेव्हा खऱ्या प्रेमाची ओळख होते, तेव्हा मात्र आपण इतरांना फसवल्याचे मोठे दुःख पदरी पडते. यासाठी प्रेम दिखावू नसावे. मनापासून प्रेम करावे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरी पुढें पुढें ।
रिगों लागे हें घडे । प्रेम ऐसें ।। ५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – आतां असे आहे कीं, ज्या वस्तुवर प्रेम जडतें, तीच वस्तु इतर वस्तूंना मागें सारून वेळोवेळी मनांत पुढें पुढें घुसुं लागते, असा प्रकार होतो. प्रेमाची गोष्टच अशी आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असते. दुसरे तिसरे काही नसते. प्रेम म्हणजे केवळ प्रेम असते. हे खरेच आहे. प्रेम ज्या वस्तुवर जडते. ज्या गोष्टीवर जडते. मनात त्या गोष्टी व्यतिरिक्त अन्य गोष्टींना शिरकावच करू देत नाही. पण म्हणजे ते मिळाले नाही तर कापाकापी हाही मार्ग नव्हे. कारण हे प्रेम नव्हे. प्रेम केल्यानंतरच प्रेमाचा खरा अर्थ समजतो. यासाठी प्रेम करावे. जगाला प्रेम अर्पण करावे. असे केल्याने प्रेम अधिकच वाढते. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. या धर्माचे पालन प्रत्येक मानवाने केल्यास जगात सुख, शाती, समाधान नांदेल.

प्रेमामध्ये स्पर्धा असते, पण ही स्पर्धा प्रेमाचीच असू शकते. प्रेमाची स्पर्धा केवळ प्रेमच निर्माण करते. कारण या स्पर्धेत केवळ आणि केवळ प्रेमच जिंकते. म्हणून प्रेम करायला शिकले पाहीजे. कारण प्रेमाने सर्व जग जिंकता येते. प्रेमाने दुष्ट विचारावर मात करता येते. दुष्टांच्या मनातील दुष्ट विचार घालवणे हे केवळ प्रेमानेच शक्य होते. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागायला शिकावे. प्रेमातील आंतरिक ओढच सारे जीवन बहरून टाकते. यशस्वी करते. यासाठी प्रेम करायला शिकावे. प्रेमाने बोलायला शिकावे.

प्रेम अंत:करणातून व्यक्त व्हायला हवे. वरवरचे दिखावू प्रेम कधी प्रेम नसते. ती वासना असते. त्याला मोहाची किनार असते. अशा दिखावू प्रेमातून जेव्हा खऱ्या प्रेमाची ओळख होते, तेव्हा मात्र आपण इतरांना फसवल्याचे मोठे दुःख पदरी पडते. यासाठी प्रेम दिखावू नसावे. मनापासून प्रेम करावे. मनापासून केलेले प्रेम कधीच मरत नाही. ते अमर असते. अमरत्वाची अनुभुती या प्रेमातून होत असते.

युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते असे म्हणतात. पण प्रेम म्हणजे युद्ध नव्हे. प्रेम कधी तुटत नसतं अन् संपतही नसतं. जे संपते आणि जे तुटते ते प्रेम कधीच नसतं. प्रेम तुटले म्हणून एकमेकांचे मुडदे पाडायचे याला प्रेम कसे म्हणता येईल. खरे प्रेम असते ते एकमेकांना सावरून घेते. समजून घेते. काही अडचण असेल म्हणून दुरावा झाला असेल, अबोला झाला असेल. इतके समजण्याइतके ते सहनशील अन् शहाणे असते. दुसऱ्याला समजणे हे सुद्धा प्रेमच असते. प्रेमात एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना सहज समजून येतात इतकी त्याची जवळीक असते. हे समजण्यासाठी प्रेम करावे लागते. प्रेम व्हावे लागते.

सद्गुरुंच्यावर प्रेम, भक्ती ही अशीच दृढ श्रद्धा असते. शिष्य आत्मज्ञानी व्हावा, यासाठी सद्गुरुंची सुरु असलेली धडपड ही प्रेमामुळेच असते. कधी रागावले तर त्यात सुद्धा प्रेम असते. असे म्हणतात प्रेमाच चिडलेली व्यक्ती अधिक सुंदर दिसते. हे सौंदर्य प्रेमामुळे असते. यामुळे त्यात जिव्हाळा असतो. आपुलकी असते. प्रेमासाठीच हा हटके राग असतो. तो समजून घ्यायचा असतो. या रागामागच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा त्या प्रेमाचे सौंदर्य समजते.

वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ हे देवावर असणारे प्रेमच आहे. या प्रेमासाठी तो देहू, आळंदीहून पंढरपूरला पायी चालत जातो. त्याच्या दर्शनाची ओढ त्याच्यात उर्जा उत्पन्न करते. ही उर्जा त्याला जीवनात नित्य स्फुर्ती देत राहाते. मानसिक आधार देते. मनाला सामर्थ्यवान बनवते. देवावरील प्रेमामुळेच मन सामर्थ्यावान होते. मनाला उर्जा मिळते. या उर्जेतूनच मनाचा विकास होतो. आरोग्यात सुधारणा होते. मनाच्या विकासातूनच आत्मज्ञानाचा विकास होतो. आत्मज्ञानाच्या ओढीने प्रेम अधिकच उफाळून येते. प्रेमातील अनुभुतीतूनच आत्मज्ञानाची संपन्नता लाभते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading