October 16, 2024
Home » Privacy Policy » गरजूंना सेवाभावी `संदीप’ चा ‘आधार’.
काय चाललयं अवतीभवती

गरजूंना सेवाभावी `संदीप’ चा ‘आधार’.

रुकडीतील युवकाचा सेवाभाव, पर्यावरण संरक्षण यासह अनेक उपक्रमातून प्रबोधनही. कचरा निर्मुलनासाठी लढवली ही शक्कल.. वाचा सविस्तर..

लेखन- बोंगेपाटील सर, ९८२२४४४८५२

देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत !!

“कर्मण्य वादीकारस्तु माफलेशू कदाचन ” या उक्ती प्रमाणे कार्य करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रमाणिकपणे समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याच्या हेतुने प्रेरीत होऊन ज्या मुलांना शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असते पण परीस्थिती समोर हतबल होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासुन दूर गेलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा उराशी बाळगुन संदिप बनकर यांनी आपले कार्य सुरू केले. पण हे काम एकट्याने केले तर ते सिमीत राहील आणि या कामात इतरानांही सहभागी करून घेतले तर आपणास जास्तीत जास्त मुलांना मदत करता येईल या भावनेतुन संदिप यांनी काही मित्रांना हा विचार सांगीतला आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद ही दिला. यातून २३ जुलै २००७ रोजी आधार फौंडेशन नावाने रुकडीमध्ये एक सेवाभावी संस्था सुरू झाली. संस्था सुरू करताना एकतत्व सर्वानी पाळलेते म्हणजे संस्थेत जात , धर्म आणि राजकारण या गोष्टींना जराही थारा द्यायचा नाही. कारण गरीबीला कोणताही धर्म नसतो वा कोणतीही जात नसते.

शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता ज्या समाजाने आपणास मोठे केले पद, प्रतिष्ठा दिली त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि हे ऋण आपण या जन्मीच फेडले पाहीजे. यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग किंवा किमान १०० रुपये समाजातील उपेक्षित लोकांसाठी दिला पाहीजे या भावनेने निधी गोळा करण्यास सुरूवात केली. जमा झालेल्या निधीतुन गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना निरपेक्ष भावनेने शैक्षणिक साहित्याची मदत, शाळेची फी, शाळाबाह्य परीक्षांना बसण्याची इच्छा असणा-या मुलांना परीक्षा फी, टायपींग , एम. एस. सी .आयटीची परीक्षा देणा-या मुलांची परीक्षा फी अशापद्धतीने मदत देण्यास सुरूवात झाली. आजअखेर आधार फौंडेशनच्या माध्यमातुन ६५० मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. त्यापैकी कांही मुले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत. काही मुले आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संस्थेस हात भार लावत आहेत. 

जसजसे संस्थेची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील विविध भागात काम करत असताना समाजातील लोकांना असणा-या अनेक अडचणी व अनेक दुख: समोर येऊ लागली आणि ती दुर करण्याचा प्रयत्न संदिप बनकर यांनी आधार फौंडेशनच्या माध्यमातून केला आहे. या काळातच रामनगर शिये येथील करुणालय बालगृहाला भेट देण्याचा योग आला. आनंद बनसोडे व त्यांच्या पत्नी यांनी सुरू केलेले पश्चिम महाराष्ट्रातील एच. आय. व्ही. बाधीत कुटूंबातील मुलांसाठी काम करणारे पहिले व एकमेव बालगृह आहे. या मुलांसाठी दिवाळीला नविन कपडे, शाळेचे साहित्य दिवाळीचा फराळ व मिठाई देण्यात येते. 

दरम्यानच्या काळात करुणालय बालगृहाच्या इमारतीचे काम सुरु होते. मग संदिप बनकर यांनी समाजातील काही दातृत्ववान आणि दानशूर लोकांना आवाहन करुन इमारतीसाठी लागणारे सिमेंट , सळी, दरवाजे या सारखे साहित्य गोळा करून श्री. बनसोडे यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलला. जसजशी संस्थेची ओळख लोकांना होत होती त्या अनुशंगाने मदतीचे हात पुढे आले.

लोक अनेक व्याधीनी ग्रासलेले आहेत, पण त्यांना औषधाचा खर्च पेलणारा नाही असे लोक मदत मागत होते. पण सगळयांना पूर्ण मदत करणे अशक्य होते. आमच्याकडे असणा-या निधीचा विचार करून आलेल्या विनंती अर्जामध्ये जास्त बिकट परिस्थिती कोणाची आहे व कोणाचा आजार गंभीर आहे. अशा २५ हून अधिक लोकांना यथाशक्ती ५००० ते १५००० रुपयापर्यंतची मदत आधार फौंडेशनच्या माध्यमातुन संदिप बनकर यांनी केली. यामध्ये किडणीचे आजार हृदयाचे आजार, ब्रेनटयूमर , कॅन्सर यासारखे आजार असलेल्या रूग्णांचा समावेश आहे.

दरवर्षी विदर्भ, मराठवाडयातुन पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी पुष्कळ टोळया येतात. सर्व ऊसतोडणी कामगार अत्यंत हालाकीत आपले दिवस काढता असतात. दिवाळीनंतर कडाक्याची थंडी पडलेली असते या थंडीत ऊस तोडणी कामगारांची सर्व मुले कुडकुडत झोपलेली असतात. हे दृष्य मनाला न पटणारे होते. मग ठरवले या मुलांना मायेची उब द्यायची आणि २००९ पासून दरवर्षी नवीन वर्षाची सुरूवात या मुलांना नविन स्वेटर वाटप करुन करायची. आणि आज अखेर हा उपक्रम न चुकता पार पाडला जातो ० ते १६ वयाच्या मुलांना दरवर्षी नविन स्वेटर वाटप केले जातात. 

आगळे वेगळे उपक्रम…

थोर महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यातिथ्या आधार फौंडेशनच्या माध्यमातुन एका वेगळया पध्दतीन राबविल्या जातात. या थोर परूषांच्या विचारानी प्रेरीत होऊन गावात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून महापुरुषांना आदरांजली दिली जाते. तसेच दरवर्षी येणारा होळीचा सणही एक आगळया वेगळया पध्दतीने राबविला जातो. या दिवशी सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन गावात विविध असणारा कचरा एकत्र करुन तो पेटवतात. दरवर्षी गावातून १ ते ३ टन कचरा एकत्र करुन कच-याची होळी केली जाते. या मुळे होळीचा सण तर साजरा होतोच पण गावातील कच-याचे उच्चाटणही होते. ही बाब अत्यंत महत्वाची व कौतुकास्पद आहे. 

२०१४ मध्ये बाबा आमटे यांच्या आनंदवन या संस्थेस भेट देण्याचा योग आला यावेळी संदिप बनकर यांनी गावातुन जुने व नविन कपडे गोळा केले. जवळ जवळ ३ टन कपडे गोळा झाले या सर्व कपड्यांचे वर्गीकरण करुन त्यापैकी चांगल्या व सुस्थितीत असणा-या कपड्यांना सर्व स्वयंसेवकांच्या सहाय्याने इस्त्री करून सर्व कपडे आनंदवन या संस्थेत जमा केले.

 जे कपडे वापरण्यायोग्य नसतात त्या कपडयापासून दैनंदिन जीवनातील विविध उपयोगी वस्तू तयार केल्या जातात व त्या बाजारात अत्यल्प दरात विकल्या जातात. अशा प्रकारे जवळ जवळ २ ते २.५ टन कपडे आनंदवन संस्थेस देण्यात आले. 

कुष्टरोग हा आजार औषधोपचारोन बरा होणारा आहे. पण या आजाराबद्यल लोकांच्या मनात असणा-या अज्ञानामुळे लोक या आजाराला खूप घाबरतात त्या रोग्याला अतिशय हिन वागणुक दिली जाते. अशा काही कुष्टरोगी रुग्णांना धान्य बेडशीट, ब्लॅकेंट व त्यांना झालेल्या जखमांना लावण्यासाठी औषध इ. साहित्याचे वाटप करून एक आपुलकीची ऊब देण्याचा प्रयत्न आधार फौंडेशनच्या माध्यमातुन करण्यात आला आहे.

 आज ग्लोबल वॉर्मीगचा खुपच वाईट परीणाम संपूर्ण जगावर झालेला दिसून येत आहे. अफाट प्रमाणावर झालेली वृक्षतोड आणि त्यामुळे पृथ्वीचे वाढलेले तापमान यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. यावर एकच उपाय आहे. मोठया प्रमाणात वृक्षलागवड होणे गरजेचे आहे.नुसती वृक्षलागवड न होता त्या वृक्षांचे संगोपनही होणे तितकेच गरजेचे आहे. आणि हा विडा संदिप बनकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी उचलला आहे. २००९ पासून संदिप बनकर यांनी आपल्या गावातील रुकडी अतिग्रे रोडवर वृक्षरोपण केलेच पण  लावलेल्या झाडांचे संगोपन केले. यासाठी संदिप बनकर यांनी स्वयंसेवकांचे एक चांगले संघटन केले आहे.

दर रविवारी एक तास समाजासाठी ” हा उपक्रम राबवला आहे. कॉलेजमध्ये व शाळेमध्ये शिकणारी मुले प्रत्येक रविवार सुट्टी असल्यामुळे सकाळी लवकर उठत नाहीत अशा मुलांना आपल्या झोपेतील वेळेचा एक तास समाजासाठी व निसर्गासाठी देण्यासाठी तयार करुन जवळ जवळ ५० हून अधिक मुले या उपक्रमात सामील झाली आहेत. या एक तासात ग्रामस्वच्छता अभियान तसचे झाडांना अळी करणे, पाणी घालणे काठ्या बांधणे यासारखी कामे मुले अगदी आनंदाने करतात.

संदिप बनकर यांनी आधार फौंडेशन रूकडीच्या माध्यमातुन जवळजवळ ४००० हजारहुन अधिक देशी व विदेशी झाडांची लागवड केली आहे. दरवर्षी किमान ५०० ते ८०० झाडे लावली जातात व ती जगवली जातात. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडांना जनावरांचा खूप त्रास आहे. अशा ठिकाणी झाडांना ट्री गार्ड लावणं अत्यंत गरजेचे होते. पण ट्री गार्डचा खर्च खुप होता. हा खर्च न परवडणारा होता. अशा वेळी संदिप बनकर यांनी गावातील दानशूर व्यक्तींना त्यांचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवसाचे औचित्य साधून किमान एक ट्री गार्ड किंवा दोन व्यक्तीच्यामध्ये एक ट्री गार्ड देण्याचे आवाहन केले आणि बघता बघता ६५ ट्री गार्ड मिळाले 

अतिग्रे रोडवरील सर्व झाडांना सुरवातीला बादलीने पाणी घातले जात होते पण झाडांची संख्या वाढल्यावर बादलीने पाणी घालणे अशक्य होते. मग ग्रामपंचायतीच्या टँकरव्दारे झाडांना पाणी घातले जाऊ लागले. पण गाव मोठे असल्यामुळे गावात रोज काही ना काही तरी कार्यक्रम असल्याने ग्रामपंचायतीचा टँकर मिळत नसे त्यामुळे झाडांना वेळेत पाणी घालणे अशक्य होत होते त्यामुळे संदिप बनकर यांनी लोकवर्गणीतुन एक ५००० लिटरचा टँकर व ट्रॅक्टर ३० जुन २०१९ रोजी घेतला आहे. त्यामुळे झाडांना पाणी घालणे अत्यंत सोयीचे झाले आहे. 

संदिप बनकर यांनी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस ऑक्सीजन पार्कची निर्मीती करण्याचा मानस केला आहे. गेल्या दोन वर्षात १५०० देशी व ४८ हुन अधिक देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांचे संगोपन ही केले आहे. आधार फौंडेशनने आजपर्यंत ४००० झाडे जगवली आहेत. १०००० हुन अधिक झाडाचे वाटप केले आहे. आधार फौंडेशनमार्फत गावांतील गुणवंती विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा कोणताही कार्यक्रम असो हारतुरे यांवर खर्च न करता एक देशी प्रजातीचे झाड लोकांना भेट स्वरुपात दिले जाते

दुष्काळी भागातील परिस्थिती जाणून घेऊन तेथील लोकांना मदतीचा हात द्यायचा हा सुद्धा उपक्रम हाती घेतला. तेथील परिस्थिती पाहण्यासाठी एक चार लोकांची कमिटी तयार केली व जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मित्र समाजसेवक व धडाडीचे व्यक्तीमत्व दादासाहेब श्रीकिसन थेटे यांच्याशी संपर्क साधुन तेथील खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेतले. मग “दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात“ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत तेथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या २५ कुटुंबांना मदत करण्यात आली. या कुटुंबांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तचे वाटप करण्यात आले. त्यांच्या २५ मुलांना आठवी (८वी) ते बारावी (१२ वी) पर्यतच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यात आली. तेथील चार महिलांना उपजिवेकेसाठी शिलाई मशिन वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयाचे एक वेगळे ऋणाणबंध तयार झाले. 

२०१२ साली मेच्या रखरखत्या उन्हात रुकडी गावातील लक्ष्मीनगरच्या माळावर वास्तव्यास असणा-या लमाण कुटुंबावर एक मोठे संकट ओढावले. घरातील सर्व मोठे लोक कामासाठी बाहेर गेले असताना घरातील लहान मुलांनी खेळता खेळता आग लावली व बघता बघता या आगीने रौद्र रुप धारण केले आणि या आगीत जवळ जवळ ४ झोपडया जळून खाक झाल्या, सर्व संसार जळून खाक झाला. चार कुटुंबे उध्वस्त झाली. यावेळी आधार फोंडेशनने या कुटूंबाना मदतीचा हात दिला. या कुटूंबांना लागणारं संसारोपयोगी साहित्य व कपडे पुरवले.

सर्वानांच चांगले आरोग्य लाभायला पाहिजे. पण परिस्थितीने सगळ्यांनाच लाभेल असे नाही म्हणून आधार फौंडेशन समाजातील अनाथ दारीद्र रेषेखालील असणा-या मोलमजुरी व धुणीभांडी करून कुटूंब चालविणा-या महिलांच्या व मुलींच्या आरोग्याकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे तसेच यासाठी मुलींचे रक्तगट तपासणी शिबिर, महिलांची हिमोग्लोबीन तपासणी , रक्तदान शिबिर यासारखी शिबिरे आयोजीत केली जातात.आपल्या शरीराची तसेच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे किती गरजेचे आहे. उत्तम व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे पण वाढती महागाई तसेच वैद्यकिय क्षेत्राचे झालेले बाजारीकरण याचा विचार केला, तर गरीब लोकांना आजारी पडणे म्हणजे फार मोठी शिक्षाच आहे. यासाठी आराग्यमेळावा आयोजीत करून विविध आजारावरील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तपासणी व मोफत औषधांची सोय करण्यात आली आहे. तसेच महिलांना व युवतींना आरोग्याच्या समस्याविषयी विविध तज्ञ डॉक्टरांचे मार्गदशनपर व्याख्यानेही आयोजीत केली आहेत. मुलींना बाहेरील जगात वावरताना अचानक एखादा वाईट प्रसंग ओढावला तर आपले स्वसंरक्षण कसे करायचे याबाबतचे तज्ञ शिक्षकांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले जाते मुलींना कराटे,  तायक्वांदो यासारखे स्वसंरक्षणाचे धडे देऊन युवती सक्षमीकरणाचे कामही आधार फौंडेशनच्या माध्यमातुन संदिप बनकर यांनी केले आहे. महिलांना घरच्या घरी काही तरी छोटे मोठे उद्योग सुरू करता यावेत व महिलांचा आर्थिक व समाजातील दर्जा उंचावला जावा यासाठी विविध कार्यशाळाही आयोजीत केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर येथील स्वयंसिध्दा संस्थेच्या कांचनताई परूळेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले आहे.

या सर्व कार्यामध्ये खुप लोकांनी संदिप बनकर यांच्यावर व यांच्या संस्थेवर खुप विश्वास दाखवून भरपुर मदत केली आहे. त्यांच्या सर्व सहका-यांशिवाय कोणतेही काम होणे अशक्य आहे. 

म्हणूनच

साथी हाथ बढाना ! एक अकेला थक जायेगा! मिलकर बाझ उठाना !!

लेखन – बोंगे पाटील, अध्यक्ष, राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्था, रुकडी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर

फोन ९८२२४४४८५२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading