March 19, 2024
Swabhimani First Nangrat Sahitya Samhelan in Shivaji University
Home » स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या आजच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावे. शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था यांच्यावतीने पाहिल्या नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवनच्या सभागृहात रविवारी ( ४ जुन) हे एकदिवसीय संमेलन होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी दिली आहे.

हे एक दिवशीय साहित्य संमेलन असून या संमेलनाला उत्सवी स्वरूप न देता शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी. या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी या संमेलनामध्ये ठोस उपाययोजना पुढे याव्यात. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर साहित्यातून आसूड ओढण्यात यावा, बळीराजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना आतापर्यंत साहित्यामध्ये खूपच तोकडे स्थान मिळाले आहे. नांगरट सारख्या साहित्य संमेलनातून नवोदित लेखकांनाही शेतकऱ्यांचे प्रश्न समजावेत यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या रविवारी नांगरट साहित्य संमेलन होणार असल्याचीही घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

हे संमेलन तीन सत्रात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवीवर्य डॉ. विठ्ठल वाघ हे असून संमेलनाचे उद्घाटन रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये शेतकरी प्रश्नांचे साहित्य, कला, माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावर परिसंवाद होणार आहे. याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार वसंत भोसले हे असून या परिसंवादामध्ये पत्रकार निखिल वागळे, इंद्रजित देशमुख, चित्रपट निर्माते प्रवीण तरडे, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. जालंदर पाटील, विजय चोरमारे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.

तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा.सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनात भरत दौंडकर (पुणे), अरुण पवार (बीड), विष्णू थोरे (नाशिक), रमजान मुल्ला (सांगली), आबा पाटील (बेळगाव), लता ऐवळे (सांगली), बाबा परीट (कोल्हापूर), सुरेश मोहिते (सांगली), गोविंद पाटील (कोल्हापूर), एकनाथ पाटील (सांगली), अभिजीत पाटील (सांगली), बबलू वडार (कडोली), विष्णू पावले (कोल्हापूर) आदी कवी सहभागी होणार आहेत.

संमेलनाचा उद्देश…

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याची निकड लेखकाला अस्वस्थ करणारी असली पाहिजे. राजकारणाच्या निर्विकार कोडगेपणात किंवा मिडियातल्या थरारक सनसनाटीपणात माणसातलं माणुसपण जागं करण्याचा हेतू कुठतरी मागं पडतो आहे का ? शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रती होत असलेली अवहेलना लक्षात घेता समाजचिंतन तोकडं पडतय का ? अल्पभूधारक झालेले जिरायतीवर जगणारे, अवर्षण-अतिवृष्टी – दुष्काळ – महापूर यात सापडून खचलेले – पिचलेले अशा दुबळ्यांवरच विकासाचा वरवंटा फिरवून शेतकऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आणण्याचा हक्क संघटित शक्तींना कोणी दिला. शेतकऱ्याच्या प्रत्येक आत्महत्येमागे एक मोठी बातमी कथा-कादंबरी असते ! टोमॅटोची भरलेली ट्रॉली रिकामी करून भररस्त्यात लाल चिखल करणारा वा दुधाचे भरलेले कॅन रस्त्यावर ओतणारा आगतिक शेतकरी इतर जनांना अमानुष – उन्मत – उर्मट का वाटतो ? तसा तो असतो का ? त्याच्या हताश – हतबल मानसिकतेच्या मुळाशी का कोणी जात नाही ?

सर्वांच्याच मेंदूत समज – गैरसमज – अपसमजांचे प्रचंड, प्रदूषित, तणकट वाढलय की काय कसं काढायचं हे तणकट ? साहित्यप्रांतात, राजकारणात, पत्रकारितेत ही नवविचारांची पेरणी करण्याआधी मशागत सुरूवात काहीच्या मेंदूत वाढलेले तणकट काढण्यासाठी वैचारिक नांगरट करावी लागेल ! त्यासाठीच हे शेतकऱ्यांचे, शेती संबंधीचे, शेतीसाठीचे पहिले नांगरट साहित्य संमेलन आयोजित केले आहे. ज्यांची ज्यांची नाळ शेती मातीसाठी जोडलेली आहे अशा सर्व साहित्यिक, नव साहित्यिक, वाचक व विद्यार्थी यांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related posts

परदेशस्थ मुलांचे प्रश्न मांडणाऱ्या दीर्घकथा

सीलबंद वस्तू नियमामध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा

महागाईचा भस्मासुर

Leave a Comment