‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे, ते सगळे विषय या कवितांमधून आले आहेत.
सदानंद कदम. ९४२०७९१६८०
‘मुलांसाठी लिहिणं हे सगळ्यात अवघड’, असं शान्ताबाई शेळके एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
जे लोक मुलांसाठी कथा-कविता लिहितात त्यातले बरेचजण आपली उंची सोडत नाहीत. जराही खाली उतरत नाहीत. आपल्या उंचीवरून ते मुलांच्या भावविश्वात डोकावतात. अशांच्या कथा-कविता मुलांच्या काळजाला भिडत नाहीत. लिहिणारे त्या कथा-कविता या ‘बालकथा-कविता आहेत’ असं म्हणतात, म्हणून आपणही म्हणत असतो इतकंच. अर्थात याला अपवाद आहेतच.
विंदांपासून शान्ताबाईंपर्यंत अनेकांनी बालकविता लिहिल्या. त्या मुलांना तर आवडल्याच पण मोठ्यांनाही गुणगुणाव्याश्या वाटल्या, यातच त्यांचं यश दडलेलं आहे. ससा-कासवाच्या शर्यतीची कविता बालपणी आपल्या आयुष्यात येते आणि तिचं गाणं शेवटच्या श्वासापर्यंत सोबतीला असतं एवढं सांगितलं तरी पुरे. अशी काही बालगीतं कानावर पडली तर आजही मोठ्यांची पावलं थबकतात, ताल धरू लागतात ही त्या कवींच्या शब्दांची ताकद असते. पायांना ठेका धरायला पठ्ठे बापूरावच लागतात असं नाही.
‘थुई थुई आभाळ’ हा गोविंद पाटील यांचा कविता संग्रह हाती पडला, तसं हे सारं आठवलं.
गोविंद पाटील कवी म्हणून स्थिरावले आहेत. ते गातातही ऐकत राहवं असं. त्यांच्या ‘शिळगाण्या’नं चहुमुलूख खुळावलाय. आता या बालकविता. अत्यंत देखण्या स्वरूपातला, मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या चित्रांनी सजलेला हा संग्रह. यातल्या ५५ कवितांना पुंडलिक वझेंच्या चित्रांचं कोंदण.
गोविंद पाटील यांच्या या सगळ्या कविता मुलांना आनंदाच्या बागेत घेऊन जाणाऱ्या. यातल्या कवितांमधून जसे बोली भाषेतले ग्रामीण शब्द आलेत, तसेच काही इंग्रजी शब्दही. अर्थात असे शब्द आता मुलांना नवे राहिलेले नाहीत. पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्यानं असे शब्द आता मुलांच्या तोंडात बसले आहेत. कुठल्याही वाडीवस्तीवर गेलात, तर सगळ्या विषयांच्या तासाला मुलं तुमचं स्वागत करतील ते इंग्रजीतूनच. मराठी मधूनही स्वागत करता येतं हे मुलं विसरूनच गेली आहेत आता.
बॅटरी, बॉडी, मोबाईल, टॅंकर, कॅट, आयडिया, वेलकम, आॉफीस, चॉकलेट असे पन्नास एक शब्द या कवितांमधून येतात. कॉम्प्युटर, माऊस, क्लिक, ऑनलाईन, लिंक, टच, युट्युब असे शब्द आता मुलांच्याही ओळखीचे आणि त्यांच्या पालकांच्याही ओळखीचे झालेत. ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम.
हुमान, हैय्या, बेगमी, गारद, गुडूप, वाघरं, खांड, कुणगा, छकडा, दावण, खरवड असे ग्रामीण बोलीतले… कृषिसंस्कृतीशी संबंधित शब्दही यातल्या अनेक कवितांमधून डोकावतात. ही कविता इथल्या मातीचा गंध घेऊन आल्याचं जाणवत राहतं ते त्यामुळंच. मुलांच्या शब्द संपत्तीत वाढ होण्यास ही कविता हातभार लावणारी. यातले अनुभव हे मुलांच्या रोजच्या जगण्यातले असल्यानं त्यांचं समृद्ध भावविश्व त्यांच्या समोर मांडणारी ही कविता आहे. यातल्या सगळ्याच कविता सहज तोंडात बसणाऱ्या. गुणगुणत राहाव्यात अशा.
‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे, ते सगळे विषय या कवितांमधून आले आहेत.
आपला परिसर, शेती, प्राणी-पक्षी-कीटक आणि वनस्पती जीवन, वृक्ष संवर्धनाचे फायदे, ऋतू, फळझाडे-फुलझाडे यांची ओळख करून देणारी ही कविता. घराघरात राबणारी आई जशी या कवितेमधून भेटते, तसेच परिसरात राहणारे कलावंतही भेटतात. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हे कलावंत नवे नसले तरी, शहरी मुलांना यांच्याविषयी खूपच औत्सुक्य. कारण त्यांनी अशा कलावंतांना प्रत्यक्ष पाहिलेलं नसतं. पाहिलं असेल तर घरातल्या छोट्या पडद्यावरच. या लोककलावंतांची ओळख पाटील यांनी आपल्या कवितांमधून मुलांना करून दिली आहे. वासुदेव, आराध्या, गारुडी, दरवेशी, कोकेवाला.,. सगळेच मुलांच्या मनात घर करून राहणारे.
बोली भाषेतले शब्द जसे आपल्या बोलण्यातून कमी होत आहेत, तसेच मुलांच्या आयुष्यातून देशी खेळ. असे देशी खेळ या कवितांमधून भेटतात. ‘थुई थुई आभाळ’ या कविता संग्रहातील साऱ्याच कविता लयबद्ध आणि तालबद्ध आहेत. यातल्या अनेक कवितांमधून आलेले नादानुकारी शब्द मुलांना आपल्याकडं खेचून घेतील. मुलं या कविता सतत गुणगुणत राहतील.
कवी गोविंद पाटील यांचं हे ‘थुई थुई आभाळ’ मुलांचं भावविश्व समृद्ध करेल यात शंका नाही.
या कवितांमुळं मुलं पुन्हा वाचनाकडं… पुस्तकांकडं वळतील हे नक्की. उत्तम कागद, सुंदर छपाई आणि पुंडलिक वझे यांची देखणी चित्रं यामुळं हा संग्रह मुलांच्या हातात जायलाच हवा.
पुस्तकाचे नाव- थुई थुई आभाळ ( बालकविता संग्रह )
कवी : गोविंद पाटील, कोल्हापूर. ९८८१०८१८४१
प्रकाशक : सृजन प्रकाशन, सांगली.
पृष्ठे ६४ ( आर्ट पेपरवर संपूर्ण रंगीत)
मुखपृष्ठ व सजावट : पुंडलिक वझे, मुंबई
किंमत रु. १६०