पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते ती उत्तम बालकविता – आव्हाड
पुणे : केवळ पुस्तक विक्रीच्या आकड्यांतून बालकविता उत्तम ठरत नाही तर मुलांना पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते ती उत्तम बालकविता असते. विश्वास वसेकर यांच्या बालकवितेत उत्तम बालकवितेची सर्व लक्षणे आहेत त्यामुळेच ती मुलांना भावते, असे गौरवौद्गार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी काढले.
ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक प्रा. विश्वास वसेकर लिखित ‘दोस्त ऋतु’ या बालकविता संग्रहाचे प्रकाशन आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रमणबाग शाळेतील वाड्मय मंडळाचे उद्घाटन यावेळी आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार, मुख्याध्यापिका चारूता प्रभुदेसाई उपस्थित होत्या.
सध्या बालसाहित्याच्या नावाने जे पेव फुटलंय त्यावर टीका करताना आव्हाड म्हणाले, पंधरा-वीस कविता, त्यातही यमक – अलंकार – गेयतेचा अभाव, असे तीस-चाळीस पानांचे काव्यसंग्रह बालकविता म्हणून माथी मारले जात आहेत. गेल्या सुमारे दोन दशकांत बालसाहित्याला आलेली मरगळ त्यामुळे आणखी गडद होताना दिसते. अशा वातावरणात वसेकरांची कविता अत्यंत आश्वासक आणि ही मरगळ दूर करणारी आहे. आव्हाड यांनी ‘दोस्त ऋतु’ या संग्रहातील तसेच अन्य काही बालकविताही सादर केल्या.
सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविकात त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिशू गट, बाल गट आणि कुमार गट या तिन्ही गटांचे भावविश्व, आकलनशक्ती आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. असे असतानाही आपल्याकडे बालसाहित्य या एकाच वर्गवारीत या सगळ्यांचे साहित्य गणले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चारूता प्रभुदेसाई यांनी शाळेतील मुलांवर साहित्यिक संस्कार रुजविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक उपक्रमांविषयी माहिती दिली. वसेकर यांनी ‘दोस्त ऋतु’ या काव्यसंग्रहामागची भूमिका मांडली. सोहम बागवे आणि तेजस कवितके या विद्यार्थ्यांनी ‘दोस्त ऋतु’ काव्यसंग्रहातील कवितांचे अभिनव पद्धतीने सादरीकरण केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.