September 18, 2024
PM Narendra Modi Comment in Pune
Home » लोकमान्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करू : पंतप्रधान मोदी
सत्ता संघर्ष

लोकमान्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करू : पंतप्रधान मोदी

भाषणाची सुरुवात मराठीतून

पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट आणि ‘मोदी’, ‘मोदी’चा जयघोष झाला. त्यांनी हात उंचावत उपस्थितांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी ‘आज लोकमान्यांची १०३ वी पुण्यतिथी. त्यांना कोटी कोटी वंदन. आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. इथे येऊन मी जितका उत्साही आहे, तितकाच भावुक आहे.’ अशा शब्दांत त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यावर, उपस्थितांनी टाळ्या गजरात त्यांचे स्वागत केले.

पुणे : स्वराज्य, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेची दिशा लोकमान्यांनी आखली होती. त्याच दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. लोकमान्यांचे आशीर्वाद आणि विचारांच्या ताकदीमुळे सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीचे स्वप्न आम्ही साकार करू, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. जगही भारताकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्या 103 व्या पुण्यतिथीनिमित्त सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी प्रदान केला. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. या प्रसंगी राज्यपाल रमेश बैस, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्‍वस्त प्रणति रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

मोदी म्हणाले, आज भारतीयांचा वाढता विश्‍वास हा देशाच्या प्रगतीचे माध्यम बनत आहे. देशातील बदलते जनमानस आणि वाढलेला जनविश्‍वास देशाला प्रगतीच्या वाटचालीत महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशाचे स्वप्न आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. देशाची प्रगती मानवतेसाठी आश्‍वासन बनले आहे. लोकमान्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालय अशा संस्थांची स्थापना केली. या संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या युवकांनी लोकमान्यांचे ध्येय पुढे चालवण्याचे काम केले. राष्ट्रनिर्मितीमध्ये लोकमान्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. व्यवस्था निर्मितीबरोबर संस्था निर्मिती, संस्था निर्मितीबरोबर व्यक्ती निर्मिती, व्यक्ती निर्मितीमधून राष्ट्र निर्मिती हे ध्येय राष्ट्र भविष्यासाठी दिशादर्शक ठरले.

लोकमान्यांविषयी बोलताना मोदी म्हणाले, गीतेमधील कर्मयोगाप्रमाणे लोकमान्य जीवन जगले. इंग्रजांनी त्यांना स्वातंत्र्य लढ्यापासून दूर ठेवण्यासाठी मंडालेच्या तुरुंगात डांबले. लोकमान्यांनी गीता रहस्याच्या माध्यमातून सोप्या भाषेत कर्मयोग सांगितला. त्यांच्या जीवनाला अनेक पैलू आहेत. मी हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या चरणी अर्पण करतो. देशवासीयांची सेवा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीच उणीव सोडणार नाही. ज्यांच्या नावामध्ये गंगाधर आहे, त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा निधी मी ‘नमामी गंगे अभियाना’साठी दान देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही मोदी यांनी जाहीर केले.

प्रारंभी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पंतप्रधान मोदी यांचा परिचय करून दिला. ऋषीकेश बडवे यांनी लोकमान्य स्तवन सादर केले. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.

१४० वर्षांनंतरही केसरी सुरू

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला मजबूत करण्यासाठी पत्रकारितेचे शस्त्र निवडले. इंग्रजीमध्ये मराठा, तर मराठीमध्ये केसरी वर्तमानपत्र सुरू केले. 140 वर्षांनंतरही केसरी अविरत सुरू आहे. आजही ‘केसरी’ची विश्‍वासाहर्ता टिकून आहे. लोकमान्यांनी अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या. या संस्थांबरोबरच देशाच्या परंपरा जपल्या. समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे साहस, आदर्श पुढे आणण्यासाठी शिवजयंती सुरू केली. या आयोजनाच्या पाठीमागे समाजाला एकत्र आणण्याची भावना आणि संपूर्ण स्वराज्याची संकल्पना होती.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महागाईचे वास्तव…

काजव्यावरील शास्त्रीय अभ्यास…

मनाच्या स्थिरतेसाठी विचार शून्य व्हायला हवेत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading