December 1, 2023
Review of Latika Choudhari Book Gawaksha
Home » अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह
काय चाललयं अवतीभवती

अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह

शब्दप्रेमी लतिका चौधरी यांचा गवाक्ष हा ललित लेख संग्रह म्हणजे त्यांचे 10 वे बौद्धिक अपत्य होय. 2012 पासून सतत आपल्या साहित्यकृतींना प्रकाशित करत मांडलेला साहित्य प्रपंच नुकताच दशकपार झाला आहे. पुस्तकी संख्येच्या चौपटीहून अधिक पुरस्काररुपी ओझ्यांनी विचलित न होता त्यांची लेखणी वाचकाच्या मनाला भुरळ घालत फुलत राहते. समाजातील चाकोरीबाहेरचे जीवन आपलंस करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत दिसून येते. त्यांच्या अशा लेखणीची साक्ष म्हणजेच हा गवाक्ष…..

बा. स. जठार

गारगोटी

अठरा विश्वे दारिद्रयाला कर्माच्या गाठींनी झाकण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलांच्या गगनभरारीसाठी सुखदुःखाचे चटके सोसत यंत्रवत राबत असते. सारेजण जरी तिची थोरवी गात असले तरी तिच्या आयुष्यात वसंताच्या बहराचा शिडकावा फारच कमीजण करतात. अशा आईची थोरवी लिहीताना लेखिकेचे भावूक मन बापाचं वास्तव जगणंही त्याच ताकदीने रेखाटते तेव्हा जखमेतून भळाभळा वाहणाऱ्या रक्तागत भूतकाळाचा सारीपाट नजररूपी पटलावरून पुढे सरकत राहतो. हेच वैशिष्टय लेखिकेच्या ललितलेखणीतून दिसून येते.

जगतरुपी संसाराच्या वेणा सोसत हरप्रकारच्या चिंतेने ग्रासलेल्या भूमिपुत्राला आपल्या लेखणीतून जागे करताना संवेदनशील मनाच्या लेखिका मृगजळाच्या मागे न धावण्याचा सल्ला देतात. तसेच निर्विकार मनाच्या पाखरांचा गोतावळा, त्यासाठी केलेल्या धडपडीचे वर्णन वाचताना मानवी वृत्तींचे वलय नजरेसमोर उभे करतात. कृत्रिमतेच्या आधारावर जीवन जगणाऱ्या मानवी मनाला निसर्गाचं देणं समजावताना लेखिकेचा हिरवा कोपरा अगदीच घोडेस्वारासारखा मनावर विराजमान होतो.
माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या आईबापाची अनुवंशिकता पुढच्या पिढीत न येणाऱ्या वैज्ञानिक कारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या लेखिका बालआठवणींच्या हिंदोळ्यावर मनाला झुलवत कोकणातल्या पावसाचा मनमुराद आनंद घेत, हृदयात पेरलेल्या पावसाला हळूवारपणे उलगडत अख्ख्या कोकणचे दर्शन घडवून आणतात.

सण, उत्सव, चालीरीती, परंपरा याद्वारे अक्षय्यतृतीयेचा अक्षय्य आनंद मिळवणाऱ्या बालमनाचा भूतकाळ, हृदयाच्या कप्प्यात घर करून बसलेल्या माणसांचा दुरावा, साथ, संगत आणि त्यांच्यातील संपलेलं प्रेमपर्व….असा हा प्रसंग अश्रूंना मोकळीक करून देतादेता प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभारतो हे वैशिष्ट्य या लेखात आढळून येते.

साऱ्या चुकांचे खापर स्त्रियांच्या माथी फोडणाऱ्या सामाजिक घटकांना आपल्या लेखणीने भानावर आणता आणता रुजणारी, फुलणारी लेखिकेची लेखणी सहलीतील मनमुराद अनुभव मांडताना आसावरच्या चाकासारखी फेर धरते. तर श्रावणातल्या व्रतवैकल्यांबरोबर हिरवाईने नटलेल्या निसर्गासारखी बहरून येते. योग्य वेळी योग्य वाटाड्या भेटला तरच मानवी जीवनाला अर्थ असतो. अशाच वाटाड्याची भूमिका पत्करत शब्दवेड्या दिशाला मौलिक सल्ला देणाऱ्या लेखिकेचे तिच्याशी जमलेले नाते प्रांजळपणाच्या आरशागत वाटते.

स्वार्थाच्या त्यागातून कर्माचे इमले बांधत गेल्यास सुखाची व्याप्ती वाढतच राहील. पण त्याचबरोबर ऋषी, देव, पितर यांचे ऋणही विसरून चालणार नाही. असा मौलिक सल्ला लेखिका आजच्या आत्मकेद्रीत पिढीला श्राद्ध – सत्कृत्य पाथेय या लेखातून देतात. चेतनामयी लेखातून लेखिकेने डोळा आणि कान यातील चार बोटाचे अंतर फारच कमी करण्याचा केलेला प्रयत्न मनाची भावनिकता वाढवतो.

रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे स्वार्थी जगात वर्तनबदल करायला लावणारं सौंदर्य कुरूपतेतलं, आभासी आणि वास्तव दुनियेतला फरक दाखवणारं what’s app ची आभासी दुनिया अन् रोमीयोज, अबलांच्या सक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारा असाही मृत्यू, या लेखांसोबत भिलारची भेट, प्रतापगडचे दर्शन हे लेख प्रादेशिक वैशिष्ट्यांचा आरसा दाखवतात. अंधश्रद्धेची पाळंमुळं किती खोलवर रुतलेत याची साक्ष देणारा लेख भगतचा उतारा आणि देवीचं वारं. अशा अनेक लेखांतून मानसिक भावतरंग उठवणारी लेखिकेची लेखणी कागदाला मित्र मानून गवाक्षला पूर्णविराम देते.
अनुभवाचे विश्व व्यापून टाकणारा हा गवाक्ष उत्कृष्ट मुखपृष्ठासह अंतरंगातील लेखांनी सजला आहे.

ललित लेखसंग्रह – गवाक्ष
लेखिका – लतिका चौधरी ( मोबाईल – 9326656059)
प्रकाशक – दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक
पृष्ठे – 132
मूल्य – ₹ 180

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६

Related posts

विठ्ठल भक्त सावळाराम…

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

ज्ञानप्राप्तीसाठी जाणून घ्या अज्ञानी लक्षणे

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More