June 18, 2024
guru love like Mother so we call Dnyneshwar as Mauli
Home » गुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली
विश्वाचे आर्त

गुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली

यशोदा जन्माने कृष्णाची आई नव्हती, पण तरीही कृष्ण- यशोदाच्या प्रेमाचे गोडवे गायिले जातात. मुलाला घडवायला माता तिची जन्माने आई असायला हवी असा काही नियम नाही. इतिहासात अशा अनेक माता होऊन गेल्या आहेत ज्यांनी अनेक थोर व्यक्ती घडवल्या आहेत. म्हणजे ही जादू प्रेमाची आहे. माऊलीच्या मायेची आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

अहो तान्हयाची लागे झटे । तरी अधिकची पान्हा फुटे ।
रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ।। १८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ – अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगानें तिला जास्तच पान्हा फुटतो. ( कारण ) आवडत्याच्या रागानें प्रेम दुप्पट होत असतें.

माऊली म्हणजे आई. मुलांना आईची जास्त सवय असते. झोपेत सुद्धा मुले आईचा स्पर्श लगेच ओळखतात. वडिलांनी प्रेमाने अंगावरून हात फिरवला तरी ते ओळखते की हा आईचा हात नाही. लगेच ते जागे होते व हात फिरवण्यास नकार देते. असे प्रसंग अनेकदा घडतात. आईचा हळुवार हात अंगावरून गेल्यानंतर लहान मुलांना लगेच झोप लागते. इतके प्रेम आईच्या स्पर्शात असते.

आईने मार दिला, बदडले तरीही रडत रडत ते मूल आईच्याच कुशीत जाते. इतरांनी त्याला प्रेमाने जवळ करण्याचा प्रयत्न केला तरीही ते आईलाच लगडते. आईच्या प्रेमाची ही जादू आहे. इतरांनी कितीही प्रयत्न केले, तरी तिच्या प्रेमाची ही जादू त्यांना आणता येत नाही. जन्म देणारी माताच फक्त मुलांना लळा लावू शकते असे नाही. जन्माने जरी आई नसली तरी ती प्रेमाने त्याला आपलेसे करून घेऊ शकते. यशोदा जन्माने कृष्णाची आई नव्हती, पण तरीही कृष्ण- यशोदाच्या प्रेमाचे गोडवे गायिले जातात. कृष्णाला उखळाला बांधून ठेवले तरी पण तो त्याचा खोडकरपणा जावा यासाठी, पण तिचे प्रेम यात कमी होते असे नाही. मुलाला घडवायला माता तिची जन्माने आई असायला हवी असा काही नियम नाही. इतिहासात अशा अनेक माता होऊन गेल्या आहेत ज्यांनी अनेक थोर व्यक्ती घडवल्या आहेत. म्हणजे ही जादू प्रेमाची आहे. माऊलीच्या रागातही माया असते. खोड्या करणाऱ्या मुलावर तर तिचे अधिकच प्रेम जडते व त्या प्रेमाने ती त्या मुलाला घडवते.

प्रेमाने जीवांमध्ये मोठा फरक पडतो. हिंस्रप्राणीही प्रेमाने माणसाळतात. प्राण्यातला हिंस्रपणा जर प्रेमाने जात असेल तर मग माणसातला हिंस्रपणा, गुन्हेगारीवृत्ती का नष्ट होऊ शकणार नाही. यासाठी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. पण तसा प्रेमळ स्वभाव प्रथम स्वतःमध्ये उत्पन्न व्हायला हवा. यासाठी स्वतःपासूनच आपण याची सुरवात करायला हवी. प्रेमाची भूकही समजते. मुलाला भूक लागली आहे, हे आईला लगेच समजते. मुलाला बोलता येत नाही. ते सांगत नाही. तरीही त्यांच्या हालचालीवरून आईला त्याला काय हवे आहे हे ओळखते. प्रेमाने या गोष्टी ज्ञात होतात.

सद्गुरूही आपल्या आईसारखे असतात. प्रेमाने ते सर्व गोष्टी शिकवत असतात. शिष्यामध्ये प्रगती घडवत असतात. शब्दामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य आहे. पण ते शब्द प्रेमळ असतील तर चांगला बदल घडतो. ते शब्द कडवट असतील तर दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. हा बदल अयोग्य आहे. यासाठी शब्दांचा वापर हा जपून करायला हवा. त्याचे सामर्थ्य हे ओळखायला हवेत. त्याला प्रेमाची गोडी लावायला हवी. सद्गुरूंचे प्रेमळ शब्द मनाला उभारी देतात. खचलेल्या मनाला सामर्थ्य देतात. आपल्या मनात कितीही राग असला तरी ते प्रेमाने हा सर्व राग घालवतात. मंत्र हा सुद्धा एक शब्द आहे. तो प्रेमाने जपला, तर मन सुद्धा प्रेमाने भरते. या प्रेमातूनच आध्यात्मिक विकास होतो. गुरूंचे प्रेम हे आईसारखे असते. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटले जाते. या माऊलीच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रेमात डुंबायला हवे.

Related posts

भारतातील लोकशाही “सदोष”; स्थान ४६ वे !

गुरु, शिक्षक हे विचारवंत अन् संशोधकवृत्तीचे हवेत

स्त्रीचे प्रेम

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406