June 6, 2023
Bramha Sakshatkar article by Rajendra Ghorpade
Home » ब्रह्माचा साक्षात्कार केंव्हा अन् कसा होतो ?
विश्वाचे आर्त

ब्रह्माचा साक्षात्कार केंव्हा अन् कसा होतो ?

बाह्यरंग, अंतरंग यातील फरक ज्ञानाने ओळखता यायला हवा. बाह्य स्वच्छता ही असायलाच हवी. स्वच्छ कपडे घालावेत. स्वच्छ अन् टापटीप राहावे. पण अंतरंग स्वच्छ नसेल तर या बाह्य रंगाच्या टापटीप असण्याला काहीच अर्थ नाही. बाह्य रंगाच्या स्वच्छतेने मग पापे कशी धुवून जाणार ? यासाठी मग कोणत्याही तिर्थावर स्नान केले तरी पापे धुवून जाणार नाहीत. जोपर्यंत अंतरंगातील स्वच्छता होत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आइकतां कौतुकें । कानातेंचि निघती मुखें ।
जें साचरिवेचेनि विकें । ब्रह्मही भेदी ।। ११९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – जे सत्य भाषण सहज ऐकत असतां कानालाच मुखें उत्पन्न होतात. पुन्हा पुन्हा ऐकावें अशी कानाला इच्छा होते आणि जें सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते. ( ब्रह्माचा साक्षात्कार करून देते.)

गंगा स्नानाने सर्व पापातून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. असे असते तर पाप करायचे आणि गंगा स्नानाला जायचे असा उद्योग सुरु झाला असता. पापाचा पश्चाताप होणे अन् झालेली चुक मान्य करून पुन्हा अशी चुक होणार नाही अशी प्रतिज्ञा करणे ही पापातून मुक्ती असू शकते. यासाठी गंगा स्नानाची काही गरज नाही. पाप केले नाही अशी व्यक्ती शोधूनही मिळणार नाही. पण यातून मुक्ती मिळवण्यासाठी गंगा स्नान करा, समुद्रात आंघोळ करा किंवा घरातील नळाखाली, शॉवर खाली अंघोळ करा म्हणजे पाप धुवून जाते. असे कधी घडत नाही हे सत्य समजून घ्यायला हवे. आंघोळीने बाह्य स्वच्छता होते. अंतरंगातील स्वच्छता महत्त्वाची आहे. आंघोळीने अंतरंगातील स्वच्छताही होणे गरजेचे आहे.

बाह्यरंग, अंतरंग यातील फरक ज्ञानाने ओळखता यायला हवा. बाह्य स्वच्छता ही असायलाच हवी. स्वच्छ कपडे घालावेत. स्वच्छ अन् टापटीप राहावे. पण अंतरंग स्वच्छ नसेल तर या बाह्य रंगाच्या टापटीप असण्याला काहीच अर्थ नाही. बाह्य रंगाच्या स्वच्छतेने मग पापे कशी धुवून जाणार ? यासाठी मग कोणत्याही तिर्थावर स्नान केले तरी पापे धुवून जाणार नाही. जोपर्यंत अंतरंगातील स्वच्छता होत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. अंतःरंगाची स्वच्छता, मनाची स्वच्छता गरजेची आहे. मनाच्या स्वच्छतेसाठी तिर्थावरील स्नानाची गरज नाही. शुद्ध विचारांच्या, सात्विक विचारांच्या तिर्थात डुबकी मारण्याची गरज आहे. सात्विक विचारांच्या तुषारांनीच मनाची स्वच्छता होऊ शकते. हे सत्य जाणून घ्यायला हवे.

पाप घडले. पण त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी मन परिवर्तन होणे गरजेचे आहे. मनाची स्वच्छता होईल, मनातील दुष्ट विचार नाहीसा होईल अन् सात्विक विचारांचा उमाळा फुटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने पापातून मुक्तीचा मार्ग मिळू शकेल. यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी. मन बदलले तर सर्व काही बदलू शकते. यासाठी दृढनिश्चयाची गरज आहे. सत्याचाच विजय होतो यावर विश्वास असायला हवा. सत्याच्या विजयासाठी मग आपण झटायला हवे.

जीवनाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आपला जन्म कशासाठी झाला आहे ? जन्माचा खरा अर्थ बोध करून घ्यायला हवा. या जन्माचे रहस्य जाणून घ्यायला हवे. जन्माच्या सत्याची ओळख मनाला व्हायला हवी. मी कोण आहे ? येथून या शोधाची सुरुवात व्हायला हवी. स्वतःचे सत्य जेव्हा स्वतःला समजेल तेव्हाच सर्व सृष्टीचे ज्ञान होईल. यासाठी हे सत्य समजून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न व्हायला हवी. मनाच्या ठराविक अवस्थेतच ही ओढ लागू शकते. तेव्हा आपोआप आपले मन तिकडे वळते. त्यावेळी सांगावेही लागत नाही.

मी कोण आहे ? मी सोहम आहे. याची जाणीव जेव्हा होते. तेंव्हा आपोआप हे सत्य अधिक जाणून घेण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होते. सोहम च्या स्वराची ओळख जेंव्हा होते तेव्हा तो स्वर पुन्हा पुन्हा ऐकावा अशी इच्छा आपोआप मनात उत्पन्न होते. त्या स्वरात नित्य राहावे असाही भाव उत्पन्न होतो. मनाला तो स्वर ऐकण्याची गोडी लागते. या स्वरातूनच मग स्वतःची ओळख स्वतःला होते. म्हणजेच आत्मज्ञान होते. या आत्मज्ञानाच्या नित्यतेला, सहजतेलाच ब्रह्मसंपन्नता असे म्हणतात. हेच अध्यात्म आहे. खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानाची अनुभुती तेंव्हा येते. याचा साक्षात्कार होईल. या साक्षात्काराने खऱ्या जीवनाचे रहस्य उलघडले जाईल अन् तसा बदल आपल्या जीवनात होईल. यासाठी बाह्यरंगाबरोबरच अंतरंगाचे सत्य जाणून घ्यायला हवे. जीवनाचे खरे ध्येय तेच आहे हे समजून घेऊन वाटचाल करायला हवी. जीवनात तसा बदल करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लागेल.

Related posts

स्वःचा विसर हे अज्ञानाचे रुप

ध्यानामृत…

व्यक्ति तितक्या प्रकृती

Leave a Comment