July 27, 2024
India's demand for gold has been overtaken by China
Home » सोन्याच्या मागणीत भारताला चीनने टाकले मागे !
विशेष संपादकीय

सोन्याच्या मागणीत भारताला चीनने टाकले मागे !

जगभरातील विविध देशांमध्ये  सोन्याची खरेदी,  त्यातील गुंतवणूक हा विषय छोट्या-मोठ्या व मध्यम अशा सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांमध्ये सातत्याने चर्चेचा असतो. जागतिक पातळीवर सोन्याच्या सर्व खरेदी विक्री, उत्पादन इ. व्यवहारांची नोंद तसेच अन्य सर्व माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिल  संकलित करत असते. त्यांचा अहवाल 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला. 2023 या संपूर्ण वर्षाचा त्यांनी त्यात आढावा घेतला आहे. 2022 या वर्षाच्या तुलनेत त्यांनी विविध आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 2023 मध्ये जागतिक सोने मागणीने उच्चांकी पातळी नोंदवली असून ती 4,899 टन इतकी आहे. यामध्ये या वर्षातील एकूण मागणी 4,448 टन इतकी होती व त्यात ओव्हर दि काउंटर (ओटीसी) आणि पूर्वीचा साठा ( ज्याला ते स्टॉक फ्लो म्हणतात) तो 398 टन होता.

मात्र 2023 या वर्षातील मागणीचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक खरेदी केली असून या वर्षात 1037 टन सोने खरेदी केली आहे. 2022 मध्ये मध्यवर्ती बँकेने 1082 टन सोन्याची खरेदी केली होती. जागतिक गोल्ड ईटीएफ ( एक्स्चेंज ट्रेडेड फंड) यावर 244 टन सोन्याचे व्यवहार करण्यात आले. त्याचप्रमाणे सोन्याची बिस्कीटे (बार) व नाणी यांच्यातील गुंतवणूक 2022 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या वर्षात दागिन्यांसाठी वापर करण्यात आलेल्या सोन्याचा आकडा 2093 टन इतका होता. वास्तविकता या वर्षात सोन्याची सातत्याने उच्च किंमत राहिली होती. या वर्षा अखेरची  प्रति औंस बंद किंमत 2,078 डॉलर इतकी उच्चांकी होती. या वर्षभरात या किंमतीने  त्यात 15 टक्के परतावा दिलेला होता. त्याचप्रमाणे या वर्षातील सोन्याची सरासरी किंमत 1,940.54 डॉलर प्रति औंस इतकी होती. 2022 च्या सरासरी किंमतीपेक्षा ही 8 टक्के जास्त आहे. 2022 मध्ये ही किंमत प्रति औंस 1800.90 डॉलर इतकी होती.

या वर्षातील सोन्याचे खाणीच्या माध्यमातून असलेले उत्पादन 3644.4 टन इनके होते. 2022 मध्ये हे उत्पादन 3624.8 टन इतके होते. तसेच रिसायकल्ड म्हणजे फेरवापर केलेले सोने 1237.3 टन निर्माण झाले. जगात निर्माण झालेल्या एकूण सोन्याचा वापर विविध गोष्टींसाठी कशाप्रकारे झाला हे लक्षात घेतले तर त्यात दागिने तयार करण्यासाठी ज्याला फॅब्रीकेशन म्हणतात त्यासाठी 2168  टन सोने वापरले गेले. तसेच  दागिन्यांसाठी सोने 2092.6 टन वापरले गेले. दागिन्यांच्या साठ्यांसाठी (इनव्हेन्ट्री) 75.4 टन; तंत्रज्ञान वापर 297.8 टन; इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 241.3 टन; अन्य औद्योगिक क्षेत्रात 47.1 टन वापरले गेले. सोन्याचे दात तयार करण्यासाठी या वर्षात 9.50 टन सोने वापरले गेले. तसेच गुंतवणुकीसाठी945.1 टन सोने वापरले गेले. एकूण बार व नाणी यासाठी 1189.5 टन वापरले गेले तर बिस्किटे ( बार) यासाठी 775.90 टन सोन्याचा वापर झाला. काही देशांच्या अधिकृत नाण्यांसाठी 297.1  टन सोने वापरले गेले. सोन्याची पदके आणि सोन्याचा मुलामा देण्यासाठी116.50 टन सोन्याचा वापर झाला. ईटीएफ व तत्सम व्यवहारांसाठी 244.40 टन सोने वापरले गेले. जगभरातील विविध  देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व अन्य संस्थांनी 1037.40 टन सोन्याची खरेदी केली.

जगात भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी व गुंतवणूक केली जाते. 2023 या वर्षात चीनने आपल्याला मागे टाकले आहे. भारतापेक्षा त्यांनी दहा टक्के  दागिन्यांची मागणी व 28 टक्के जास्त सोने गुंतवणुकीसाठी खरेदी केलेले  आहे. या वर्षात चीनने 959 टन सोन्याची खरेरी 2022 मध्ये ती 824 टन होती. त्यात 16 टक्के वाढ नोंदवली गेली. त्या तुलनेत भारताचा विचार करता आपण 2023 मध्ये 630 टन सोन्याची खरेदी केली.2022 मध्ये हा आकडा 571 टन इतका होता.

असे असूनही संपूर्ण जगातील सोन्याची एकूण मागणी 2023 या वर्षात 5 टक्क्यांनी घसरून 4448 टन असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र यामध्ये ओटीसी व्यवहारांचा समावेश नाही. मात्र दागदागिने व गुंतवणूक यांचा विचार करता 2023 मध्ये त्यात घट झालेली दिसते.

गेल्या वर्षातील सोन्याच्या एकूण जागतिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये फार मोठी दरामध्ये उलथापालथ होणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.भारताची  २०२३ या वर्षांमध्ये  सोन्याची आयात 20 टक्के वाढली असून ती 2022 मधील 651 टनांवरून 781 टनांवर गेलेली आहे. यामुळे केंद्र सरकारची चालू खात्यावरील तूट  चिंताजनकरीत्या वाढण्यास मदत झाली आहे. भारतातही सोन्याचे रिसायकलिंग (पुनर्वापर ) 20 टक्के वाढले असून ते 98 टनांवरून 117 टनांवर गेलेले आहे. भारतामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी जागतिक पातळीवरील सोन्याची खरेदी विक्री त्यांच्या भावातील चढ उतार लक्षात घेऊन योग्य वेळी गुंतवणूक करणे हे जास्त लाभदायक ठरू शकते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

विषमतेचे गगन भेदत घेतलेली उंच झेप…

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

यंदा लेट खरीप किंवा रब्बी पट्ट्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे, असे का ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading