दरडी कोसळती…!
रस्ते बनवताना, लोहमार्ग तयार करताना विक्रमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पोखलँडसारखी जास्त ताकतीची यंत्रे वापरली जातात. त्यांच्या धक्क्यामुळे दरड तयार होताना, दरडीमध्ये असणाऱ्या दगड आणि मातीमध्ये भेगा पडतात. या भेगांमध्ये पाणी मुरते आणि दरडी कोसळतात.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
आसेतुहिमाचल सर्वत्र नियोजित पद्धतीने पाऊस सुरू झाला आहे. यावर्षी पाऊस भरपूर पडणार हे हवामान खात्याने सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलमध्ये जाहीर केले. शेतकऱ्यांसाठी सुखाच्या बातम्या मान्सून केरळमध्ये आला…, गोव्यात आला…, कोकणात आला झळकू लागल्या. या सर्व गदारोळात निसर्गाचे नेमके म्हणणे काय आहे, याचा विचार खूप कमी लोकांनी केला. निसर्ग संकेतानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बेतास बेत पाऊस पडणार. पेरण्या होतील पिके वाढण्यासाठी पाऊस पडेल… मात्र अपेक्षित पाऊस जुलैच्या उत्तरार्धात पडेल, असे निसर्ग सांगत होता. टिटवीच्या अंडी घालण्याची वेळ आणि संख्या उशिरा पण भरपूर पाऊस पडण्याचे संकेत देत होती. त्यानुसारच पाऊस आला. मात्र हा पाऊस पिकांना वाहून नेणारा ठरत आहे.
महाराष्ट्रात माळीण, इर्शाळवाडी आणि अनेक रस्त्याच्या कडेच्या दरडी कोसळण्याच्या घटना आपणास ज्ञात आहेत. गतसाली उत्तराखंडमध्ये दरडी मोठ्या प्रमाणात कोसळल्या होत्या. यावर्षी त्याची पुनरावृत्ती झाली. त्याखेरीज यावर्षी वायनाडमधील घटना मनाला चटका लावणारी ठरली. दरडी कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी होण्याची परिस्थिती दक्षिण आणि उत्तरेत उद्भवली आहे. अशा प्रकारे दरडी कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वायनाडमध्ये दरड कोसळून शेकडो जीव गेले आहेत. उत्तराखंडमध्येही मोठ्या प्रमाणात वित्त आणि काही प्रमाणात जिवीत हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर दरडी कोसळण्याचे प्रमाण का वाढत आहे, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे.
अविचारी विकास हे दरडी कोसळण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. उत्तर भारत आणि पश्चिम घाटातील डोंगररांगा मातीच्या आहेत. याच भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे. दरड कोसळली की महामार्ग, रेल्वे मार्ग थांबतात. वाहने जाताना दरड कोसळून जिवीत आणि वित्त हानी होते. माणसाची काही काळासाठी त्या मार्गावरील गती थांबते. त्यामुळे दरड कोसळताच माध्यमे मोठ्या बातम्या प्रसिद्ध करतात. आज ज्या पद्धतीने विकास सुरू आहे ते पाहता भविष्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढच होणार आहे.
दरड म्हणजे डोंगराची तीव्र कडा होय. निसर्गत: असे नैसर्गिक तीव्र कडे फारच कमी तयार होतात. जे तयार होतात ते कठीण दगडांच्या भागात. मात्र आपण जेव्हा डोगरामधून लोहमार्ग, रस्ता तयार करतो, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरडी तयार होतात. किमान रस्त्याच्या एका बाजूला तरी दरड राहते. मुख्यत्वे डोंगरातून मार्ग बनवताना बहुतांश दरडी तयार झाल्या आहेत. दरडी कोसळण्याची नैसर्गिक आणि कृत्रिम कारणे आहेत. भूकंपामध्ये जमीन खचते आणि भूस्खलन होते. अशावेळी दरड नैसर्गिकरित्या कोसळते. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक घटना नाहीतच. त्या भागात मानवी हस्तक्षेप झाल्याखेरीज घडत नाही. मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग किंवा खडक मूळ भागापासून सुटून कडा कोसळतो, त्यास दरड कोसळणे किंवा भूस्ख्खलन असे म्हणतात. कठीण पाषाणात निसर्गत: भेगा किंवा फटी असतात. उन, वारा पाऊस यांचा परिणाम होऊन खडकाचे तुकडेही होतात. या भेगा वाढून त्यामध्ये पाणी साठले की दगडाचे किंवा भूभागाचे वजन वाढते आणि तो खडक उताराच्या बाजून घसरतो. ही नैसर्गिक दरड कोसळण्याची प्रक्रिया असते.
सध्या दरड कोसळल्याच्या येणाऱ्या बातम्या या त्या भागातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने आहेत. काही वर्षांपूर्वी माळीण गाव पूर्ण गाडले गेले होते. ती घटना सुरुवातीला नैसर्गिक मानली गेली. मात्र ती घटनासुद्धा तेथील डोंगरावर शेतासाठी बांध घातल्याने, कृत्रीम कारणाने घडली होती. निसर्गात आढळणाऱ्या सर्व पदार्थांना एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य करणारी बले असतात. एकाच प्रकारच्या रेणूंना किंवा अणूंना संसजी (cohesive) बले बांधून ठेवतात. पाणी आपणास द्रव रूपात मिळते कारण पाण्याच्या रेणूंमध्ये संसजी बल असते. सोने-चांदीचे दागीने बनवता येतात कारण त्यांच्या अणूंत संसजी बल पाण्यापेक्षा जास्त असते. दोन भिन्न प्रकारच्या रेणूंमध्ये असंसजी (Adhesive) बल असते. या बलांमूळे पाण्याचे रेणू पात्राला चिकटून राहतात. असंसजी बलामूळे दगड आणि माती एकत्र राहतात. संसजी किंवा असंसजी बल जितके जास्त असेल तितका पदार्थ कठीण बनतो. मातीमध्ये असणाऱ्या कणांमध्ये संसजी बल कमी असल्याने मातीचे कण सहज वेगळे होऊ शकतात. दगडाच्या कणातील बल मातीपेक्षा जास्त असल्याने दगड कठीण असतो. दगड आणि माती यांनी बनलेल्या दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते. कठीण खडकांच्या दरडी कोसळण्याची शक्यता अत्यल्प असते.
माती आणि दगडातील संसजी आणि असंसजी बले जास्त नसली तरी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी स्थीर पडलेले असतात. त्यावर उगवलेले गवत मातीला आणि झाडांची मूळे दगड, मातीला घट्ट पकडून ठेवतात. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या उतारावरून पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामध्ये मातीचा अंश फार कमी असतो. मात्र मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. शेतीसाठी डोंगर माथ्यावरील झाडे तोडली. गवताचे आवरण नष्ट केले. डोंगरमाथ्यावरील बांधामुळे माथ्यावर पाणी साठू लागले. हे पाणी डोंगरावर असणाऱ्या भेगांमध्ये मुरते. या पाण्यामुळे माती सुटी होते कारण माती आणि पाण्याच्या रेणूमध्ये असंसजी बल दगड आणि मातीतील बलापेक्षा जास्त असते. दगडाला पकडून ठेवणारी माती सुटी झाली की दगड गुरुत्वाकर्षण बलामुळे चिखलात रूतायला सुरुवात होते. दगड माती सगळे काही गुरुत्वीय बलांमुळे खाली घसरते.
रस्ते बनवताना, लोहमार्ग तयार करताना विक्रमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पोखलँडसारखी जास्त ताकतीची यंत्रे वापरली जातात. त्यांच्या धक्क्यामुळे दरड तयार होताना, दरडीमध्ये असणाऱ्या दगड आणि मातीमध्ये भेगा पडतात. या भेगांमध्ये पाणी मुरते आणि दरडी कोसळतात. जेथे दगड आणि मातीच्या दरडी असतात, तेथे जाळी आणि त्यावर काँक्रीट आवरण घालून धोका कमी करता येतो. आज सर्वत्र शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवत विकस करण्याची चर्चा होते. त्यासाठी रस्ते बनवताना नैसर्गिक रचना न बदलता रस्ते बनायला हवेत. जोवर आपण शाश्वत विकासाच्या केवळ गप्पाच मारणार तोवर दरडी कोसळणार…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.