संदीप भानुदास तापकीर यांच्या ‘अपरिचित दुर्गांची सफर’ या पुस्तकाची लेखनसीमा रत्नागिरी जिल्हा असल्याने राजापूरपासून सुरुवात होऊन मंडणगडपर्यंतच्या क्षेत्रात येणाऱ्या 28 किल्ल्यांबाबत त्यांनी यात विस्तृत लिहिलेले आहे. यात परिचित, काहीशा अपरिचित किल्ल्यांचा, गढ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक किल्ल्यांची एकत्रित नोंद असलेले हे पहिलेच पुस्तक ठरावे. त्या अर्थाने हे पुस्तक रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांचा उपयुक्त दस्तावेज आहे.
धीरज वाटेकर
राजापूर तालुक्यातील राजापूर, यशवंतगड, आंबोळगड हे किल्ले आपल्याला सुरुवातीच्या प्रकरणांत भेटतात. राजापूर हे अर्जुना आणि गोडी नदीच्या संगमावरील तत्कालीन प्रमुख शिवकालीन बंदर. वास्को द गामाने हिंदुस्थानचा शोध लावल्यावर परकीयांची पावले इकडे वळली. मुघल सम्राट जहांगीर याने परकीय व्यापाऱ्यांना वखारी बांधण्यास परवानग्या दिल्या. डच, पोर्तुगीज, इंग्रज व्यापारी हिंदुस्थानच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थिरावले. इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. 1612 मध्ये पहिली वखार सुरतेत उघडली. पुढे इ. स. 1640 मध्ये मद्रास (चेन्नई), इ. स. 1687 मध्ये मुंबई, इ. स. 1689 मध्ये कोलकाता येथे वखारी उघडल्या गेल्या. अशाच वखारी राजापूरला डच, इंग्रज, फ्रेंच लोकांनी उभारल्या. त्यातली इंग्रजांची वखार म्हणजेच किल्ला. त्याला तटबंदी आणि खंदकही हाेता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वखार लुटली, तेव्हा त्यांच्या हाती लागलेल्या तब्बल 97 हजार रुपयांच्या 85हून अधिक वस्तूंसह मुद्देमालाची यादी शिवभारतकार कवी परमानंद नेवासकर यांनी नोंदविलेली आहे. ती यादी वाचल्यावर या वखारीचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
अर्जुना ही नदी जैतापूर गावी समुद्रास मिळते, त्या जैतापूर खाडीच्या काठावर यशवंतगड आणि खाडीमुखाशी आंबोळगड हे दोन्हीही किनारी दुर्ग आहेत. गेल्या वर्षी इ. स. 2018 मध्ये जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी वर्षभर अगोदर नियोजन करून स्थानिकांच्या मदतीने यशवंतगडावर स्वच्छता मोहीम राबविली. यशवंतगडाला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांसह गडाचे तट, चौथरे स्वच्छ केले गेलेत. या साऱ्या ठिकाणांविषयीचे तपशीलवार वर्णन पुस्तकात वाचावयास मिळते. लेखकाने आंबोळगडाविषयी दिलेली माहिती अनेकांसाठी नवीन ठरावी. आंबोळगडानजीकच्या गगनगिरी महाराज आश्रमाच्या मागील बाजूला महाराजांनी तपश्चर्या केलेली गुहा आहे, तीही पाहण्यासारखी आहे.
लांजा तालुक्यात साटवली गढी / भुईकोट किल्ला हा पाच बुरुजांचा आहे. याच्या संवर्धन आणि स्वच्छतेसाठीही स्थानिक तरुणांनी या वर्षी पुढाकार घेतला आहे. ज्या नदीच्या काठावर हा गढीवजा किल्ला आहे, त्या मुचकुंदीचा उगम किल्ले विशाळगड येथे आहे. ही नदी प्रभानवल्ली, भांबेड, वाकेड, इंदवटी, दसुरकोंडमार्गे साटवलीत येते. पुढे पूर्णगडजवळ समुद्राला मिळते. एका गडाजवळ उगम होऊन दुसऱ्या गडाजवळ समुद्राला मिळणारी बहुधा ही एकमेव नदी असावी. साटवली बंदरात येणारा माल बैलांच्या पाठीवरून विशाळगड येथे जात असे. या परिसरात साटवली बंदराला महत्त्व होते. माल उतरवण्याची, साठविण्याची व्यवस्था असल्याने या ठिकाणाला ‘बंदरसाठा’ म्हणत. त्यातूनच पुढे साटवली नाव रूढ झाले. किल्ल्याची तटबंदी व बुरूज बांधणी करताना चिऱ्याचे दगड एकमेकांवर रचलेले असून, सांधणीसाठी चुना अथवा इतर मिश्रण वापरले नसावे. किल्ल्याच्या पूर्व व दक्षिण बाजूस खोल खंदक होता. साटवलीतील एकपाषाणी मंदिर (जनार्दन मंदिर) आणि तिथली 4थ्या/5व्या शतकातील विष्णुमूर्ती जरूर पाहावी. याचा उल्लेख लेखकाने आवर्जून केलेला आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार दौलतखान आणि सिद्दी संबूल यांच्यात झालेली साटवलीची लढाई प्रसिद्ध आहे. मार्च 1674दरम्यान मुचकुंदीच्या खाडीत, पूर्णगड किल्ल्यासमोर साटवलीमध्ये ही लढाई झाली. या दोन्ही किल्ल्यांचे ऐतिहासिक बारकावे लेखकाने छान मांडले आहेत.
जयगड आणि विजयगड हे शास्त्री नदीच्या जयगड खाडीतीरावरील दुतर्फा पहारेकरी आहेत. महिमतगडाची बांधणी दक्षिण स्वारीवर जाणाऱ्या मावळ्यांना विश्रांतीसाठी करण्यात आली होती. पाहुण्यांच्या विश्रांतीची जागा म्हणून मेहमानगड ! त्याचा अपभ्रंश होऊन महिमतगड झाले. विशेष म्हणजे या किल्ल्यावर जाताना विविध जातींची फुलपाखरे पाहायला मिळतात. महिमतगड छत्रपती शिवाजी महाराजांनी शृंगारपूरच्या मोहिमेदरम्यान इ.स. 1661मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला असावा. संगमेश्वरजवळच्या महिमतगडाचीही अलीकडे जवळच्या निगुडवाडी ग्रामस्थांनी साफसफाई केली आहे. शिवरायांनी 29 एप्रिल 1661 रोजी शृंगारपूर जिंकले. त्याचवेळी कोकणावर नजर ठेवता येईल, असा प्रचितगडही घेतला. हा किल्ला रत्नागिरीसह एकूण चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. इ.स. 1347मध्ये अब्दुल मुज्जाफर अल्लाउद्दीन बहमनीच्या आधिपत्याखाली असलेला विजयगड हाही जिल्ह्यातील अपरिचित किल्ला आहे. इ.स. 1698मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्याकडे विजयगडाचे अधिकार दिले.
अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे किल्ले वशिष्ठीचे पहारेकरी आहेत. अनेक वर्षांच्या शिवप्रेमींच्या उठावानंतर गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिकृतपणे स्मारकांच्या नकाशावर आला आहे. मात्र, त्यापुढील कार्यवाहीबाबत आजही अनभिज्ञता आहे. लेखकाने तत्पूर्वीची या किल्ल्याची अवस्था पुस्तकात जिवंत केली आहे. ती वाचल्यावर आपल्याला किल्ल्याची स्थिती, त्याकडे पाहण्याचा सार्वत्रिक दृष्टिकोन जाणवेल. गोविंदगडावर पूर्वी 16 तोफा होत्या. स्थानिकांनी अलीकडे गोविंदगडाच्या पायथ्याशी असलेल्या 6 तोफांची गडावर पुनर्स्थापना केली आहे. रसाळगड-सुमारगड-महिपतगड हे जिल्ह्यातील किल्ल्यांमधलं अनोखं त्रिकूट आहे. महाराष्ट्रातील एकमेव स्वीवेल गन (लांबसडक बंदूक) यातल्या रसाळगडावर मिळाली होती. रसाळगडला जाणं सोपं आहे; मात्र आजही सुमारगड आणि महिपतगडावर डोंगरवाटा नित्य धुंडाळणारे भटकेच पोहोचतात. लेखकाने लिहिताना अनेक ठिकाणी जुन्या दस्तऐवजातील माहितीत नव्याने सुधारणा करून साधार मांडणी केली आहे. यातून लेखकाचा विषयातील बारीक-सारीक घटनांकडे पाहण्याचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन सहज जाणवतो.
बाणकोटचा उल्लेख पहिल्या शतकात ग्रीक प्रवासी प्लिनी याने मंदारगिरी किंवा मंदगोर असा केला आहे. रत्नागिरीपूर्वी ही जिल्ह्याची राजधानी होती. बाणकोटच्या हिंमतगडाविषयीचे लेखन वाचनीय आहे. शिवरायांच्या आगमनाची चाहूल लागताच किल्लेदार पळाल्याने मंडणगड किल्ला शिवरायांना न लढताच मिळाला. पुढे त्याची डागडुजी त्यांनी करविली. लेखकाने ज्या काळात किल्ल्यांची भ्रमंती केली, त्या काळची वर्णने आलेली आहेत. ती दुर्गअभ्यासक, जिज्ञासूंसाठी उपयुक्त वाटतात.
निसर्गाच्या सान्निध्यात, किल्ल्यांवर जाण्याचे वेड वाढते आहे. याचा विचार सर्वत्र होतो आहे. किल्ल्यावर जसा भटकंतीचा स्वर्गीय अनुभव घेता येतो, इतिहासाचे काही क्षण वेचता येतात, तसेच जैवविविधतेतील काही महत्त्वाच्या गोष्टीही पाहता येतात. लोकांनी ट्रेकिंग करावे, त्यांना वाईल्ड लाईफची म्हणजे जंगलाची आवड लागावी, ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा, किल्ल्यांचे महत्त्व वाढावे, प्रचार, प्रसार वाढावा यासाठी अधिकाधिक बारकावे पुढे यायला हवेत. या अनुषंगाने लिखाणाशी निगडित काही बाबी चिपळूणचे जंगल अभ्यासक नीलेश बापट यांच्याकडून समजून घेतल्या आहेत. त्यानुसार जयगडावर अजगर, महिमतगड आणि भवानीगडावर समृद्ध पक्षी, प्राणीवैभव आहे. किल्ले बारवाई येथे भेकर, खवले मांजर, रानमांजर, क्वचितप्रसंगी शेकरू, सापांच्या जाती, फुलपाखरे, साळिंदर दिसू शकते. या किल्ल्यावर पूर्वी एक तोफ होती. कोळकेवाडी किल्ल्यावर सह्याद्रीच्या कड्यात हळदीचे पाणी आहे. पूर्वीच्या वाटांवरल्या पाण्यापैकी हे एक होय. या भागातही शेकरू, बिबट्या, घुबडांचे काही प्रकार पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर बांदा, खापर खवल्या, बहुरंगी बिनविषारी सापांचे येथे दर्शन होते. महिपतगडावरील आवाजाचा प्रतिध्वनी चकवा देऊन जातो. पन्हाळेदुर्ग भागात घोरपड, विंचू, साप, कोळ्यांच्या प्रजाती यांचे अस्तित्व आहे. बाणकोट भागात शिकारी पक्षी पाहायला मिळतात. गोपाळगड भागात किमान 5-6 प्रकारच्या घुबडांचे प्रकार दिसतात. इथल्या कातळावरची झाडे वेगळ्या धाटणीची, नैसर्गिकदृष्ट्या काहीशी आदर्शवत आहेत.
संदीप तापकीर यांनी हे पुस्तक रत्नागिरी जिल्ह्यातीलच दोन सहकारी प्राध्यापक मित्र – डॉ. बाळासाहेब लबडे आणि विनायक बांद्रे यांना सस्नेह अर्पण केले आहे. संदीप तापकीर यांचे लेखन त्यांच्या अनुभवाची फलश्रुती आहे. ती अनुकरणीय आहे. पुस्तकाची मांडणी विषयाला साजेशी अशीच आहे. खरं तर राज्यातल्या ज्या-ज्या जिल्ह्यात किल्ले आहेत, त्या प्रत्येकावर असे पुस्तक प्रकाशित व्हायला हवे आहे. मुख्य म्हणजे अशी सारी पुस्तके वाचकांना एकत्रित उपलब्ध व्हायला हवीत, ती गरज आहे. संदीप तापकीर हे स्वत: लेखक, संपादक आणि पुस्तकविश्वात कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते याबाबत नक्कीच विचार करतील. वाचकांना भविष्यात अधिकचे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतील. सुजाण वाचकही त्याचे मनापासून स्वागत करतील, अशी आशा करू या ! पुस्तकातील साऱ्या किल्ल्यांचे दगड, चिरे संवेदनशील मनाशी खूप काही बोलताहेत, असं अनेकांना वाटतं. यातल्या काही किल्ल्यांच्या भोवताली असलेली खंदकांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. संदीप तापकीर यांचे हे पुस्तक जिल्ह्यातल्या किल्ल्यांचा इतिहास नि भूगोल आपल्याला सांगते. हे सारे किल्ले फिरताना दुर्गांबाबतचा सामाजिक दृष्टिकोन किती करंटा आहे, हेही जाणवते. मात्र, अशा लेखनातून किल्ल्यांच्या वाटा नव्या पिढीकडून पुन्हा तुडविल्या जातील, किल्ल्यांकडे वळणाऱ्या पावलांची संख्या वृद्धिंगत होईल, तीच किल्ल्यांना पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यास मदत करेल. म्हणून अशा लिखाणाचे स्वागत करायला हवे.
आम्ही जन्माने, वास्तव्याने, कर्माने याच जिल्ह्यातील आहोत. निसर्गाच्या ओढीने फिरायला लागल्यापासून गेल्या 22 वर्षांत पुस्तकातल्या बऱ्याचशा किल्ल्यांवर स्वतः जाऊन आलेलो आहोत. त्या पार्श्वभूमीवर संदीप तापकीर यांनी पुस्तकात दिलेली किल्ल्यांची माहिती वाचताना पुन्हा त्या भारून टाकणाऱ्या वातावरणात गेल्याचा आनंद आम्हास घेता आला. हे पुस्तक पूर्वी फिरताना आमच्या सोबत असतं, तर फिरण्यातली गंमत काही वेगळीच असू शकली असती, असं आता वाटतंय. यातच या पुस्तकाचं यश सामावलेलं आहे. पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे, रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्ग आज उपेक्षित आहेत. अनेकांची तटबंदी ढासळलेली आहे. आतल्या वास्तूंची पडझड झाली आहे. कडे कोसळून पडलेले आहेत. किल्ल्यांवर रान माजलेले आहे. काही ठिकाणी तरुणाई सजगतेने स्वच्छतेचे काम करताना दिसते आहे. दुसरीकडे एकूणच तरुणाईत निसर्गात, किल्ल्यांवर फिरण्याचं वेड वाढलंय! त्याला डोळस, अभ्यासपूर्ण दिशा देण्याचं काम हे पुस्तक नक्की करेल, असा विश्वास वाटतो.
धीरज वाटेकर
पुस्तकाचे नाव – ‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’
लेखक : संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे मोबाईल – 9168682204
पृष्ठे : १३१
किंमत : १८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.