अमावस्येची रात्र होती…आम्ही मुद्दाम हाच दिवस निवडला होता कारण त्यावेळी आकाशात चंद्र नसतो आणि त्या निरभ्र आकाशात अनेक तारेतारका अगदी सुस्पष्टपणे कॅमेरा मध्ये टिपता येतात…आणि तेच कॅमेरामध्ये टिपण्यासाठी तर आम्ही इतक्या लांब आलो होतो…
हिमालयाच्या स्पिती व्हॅलीमधील कॉमिक व्हिलेज वरून संध्याकाळी आम्ही निघालो आणि आमचा प्रवास अजून एका अफलातून स्थळाकड़े सुरू झाला…त्यांच नाव लांजा व्हिलेज…लांजा हे हिमालयातलं एका उंच ठिकाणावरचं खेडगाव…समुद्रसपाटीपासून अंदाजे साडेचार हजार मीटरवर इतक्या उंचावर वसलेलं एक छोटंसं गाव…लोकसंख्या जेमतेम दीडशे…इथली सगळी घर ही माती-चिखलापासून बनलेली…इथल्या स्थानिक लोकांचं जीवनमान अतिशय खडतर आणि अत्यंत जीवघेणे…हिवाळ्यात सहा महिने या गावचा संपर्क सगळ्या जगाशी तुटतो…सगळीकडे बर्फाचे थर उभे राहतात, रस्ता बंद आणि मग इथले गावंकरी स्वतःला या मातीच्या घरात बंद करुन घेतात…येथे या गावात पोहोचणे इतके सोपे नाही…प्रचंड असा घाटाघाटाचा, खाचखळग्यांचा, दगड धोंड्याचा पंधरा सोळा तासाचा प्रवास करून येथे पोहोचावे लागतं…त्यांत आम्ही गेलो तेंव्हा प्रचंड वादळी पाऊसाच वातावरण होत…जागोजागी जमीन सरकून सगळा डोंगर खाली यायची भिती मनात असायची…
या गावांत आपल्याला घेऊन जाणारा रस्ता इतका जीवघेणा की प्रत्येक वळणावर यम अक्षरशः हातात मिसळ घेऊन उभा असल्यासारखा दिसायचा…असं वाटायचं तो म्हणतोय ‘ बेट्या तुला मिसळेचा लै नाद आहे ना?…चल तुला वर नेऊन मिसळ खावू घालतो’…
त्या पंधरा सोळा तासाच्या प्रवासात तहान, भूक, सुसू काही लागायची हिंमत होत नाही…भल्या सकाळी उठून आम्ही प्रवास सुरू केला तेंव्हा आम्ही संध्याकाळी आठ नऊ वाजता येथे पोहोचलो होतो…आम्ही पोहोचलो तेंव्हा अगदी गडद गुडूप अंधार होता…अमावस्येची रात्र होती…आम्ही मुद्दाम हाच दिवस निवडला होता कारण त्यावेळी आकाशात चंद्र नसतो आणि त्या निरभ्र आकाशात अनेक तारेतारका अगदी सुस्पष्टपणे कॅमेरा मध्ये टिपता येतात…आणि तेच कॅमेरामध्ये टिपण्यासाठी तर आम्ही इतक्या लांब आलो होतो…
हे ठिकाणचे वैशिष्ट्यचं मुळात रात्रीची फोटोग्राफी हे असतं…चारही बाजूने पर्वत आणि मध्येच छोट्याशा जागेत वसलेलं हे काही वीस बावीस घरांच गावं…वाहनांची रेलचेल नसल्याने आणि अतिशय उंचावर असल्याने येथे प्रकाशाचं प्रदूषण अगदीच नगण्य असतं…या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात असलेला एका उंच जागेवर स्थापित केलेला भगवान गौतम बुध्दांचा नितांत सुंदर असा पुतळा…त्यांच्या चेहऱ्यावरील अतिशय शांत आणि प्रसन्न भाव आपल्याला खूप काही देऊन जातात…हिमालयाच्या खाली दरी कडे तोंड करून असलेला हा पुतळा हे इथले प्रमुख आकर्षण…तेथेच आम्ही रात्री फोटोग्राफी करणार होतो…
हिमालयाच्या या साडेचार किमी उंच ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी असते की पाच दहा पाऊले टाकली की लगेच दमछाक व्हायची…अक्षरशः पुढचे पाऊलं टाकणे जिवावर यायचं…अशातच रस्त्याला लागून थोडंस खालच्या बाजूला असलेल्या आमच्या होम स्टेमध्ये जरासं खाऊन आम्ही पुन्हा चढतं पायी आमच्या गाडीपाशी आलो…हे पायी चालताना अक्षरशः ब्रह्मांड आठवलं…चढ आणि ऑक्सिजनची तीव्र कमतरता…पण त्यावेळी काही झालं नाही…तसाच गाडीत बसलो आणि डोळे फिरले…डोक्यात घणघन असे ठोके पडतं होते…’गाडीतच बसून रहावं का?’ हा विचार मनात आला…पण इतक्या लांब येऊन फोटो न घेता जाणे मनाला पटेना…तेवढ्यात गणेशचा आवाज आला
‘ कुलकर्णी येताय ना?…’ आता हा गणेश बागल म्हणजे एक निष्णात फोटोग्राफर, त्याला नाही म्हणणे केवळ अशक्य…गपचूप कॅमेरा उचलली आणि गाडीतून खाली उतरलो…बाहेर पाऊल टाकलं आणि अंगावर बाहेरच्या अतिशय थंड वातावरणाने शिरशिरी आली…तापमान होते फक्त एक अंश सेल्सिअस…अंगात पाच सहा लेयर्सचे कपडे असूनही थंडीचा कडाका सगळी हाडे हादरून सोडत होता…दातांच्या पंक्ती पियानो सारख्या वाजत होत्या…आणि आता अशा परिस्थितीत पुन्हा किमान अर्धा किमी चालतं कॅमेरा बॅग सांभाळत त्या मूर्तीपाशी पोहोचायचे होतं…सीमेवरील सैनिक कशा परिस्थितीत काम करत असतील याची क्षणात जाणीव झाली…
कसाबसा स्वतःला ओढत त्या पुतळ्यापाशी घेऊन आलो…तुम्हाला सांगतो आम्ही त्या मूर्तीपाशी पोहोचलो, आकाशाकडे वर बघितलं आणि अक्षरशः डोळे विस्फारले…काय अदभुत नयनरम्य दृश्य होतं…मन अक्षरशः हरखून गेलं…तो नजारा बघताना अगदी डोळ्यांचे पारणे फिटले…मनात म्हंटल यांच साठी केला होता हा सगळा अट्टाहास… तुम्हाला सांगतो आकाशात अगणित, असंख्य तारे तारकांची जणू जत्राचं भरली होती…मंगळ अगदी सुर्यासारखा चमकतं उघड्या डोळ्यांनी समोर दिसतं होता…काय काय बघू आणि कसं बघू असं झालं होतं…आकाशगंगा तर सुस्पष्ट समोर दिसतं होती…
भगवान गौतम बुद्धाच्या पुढ्यात साक्षात तार-तारकांची जणू उभी दीपमाळच धरली असावी असा तो नजारा होता…जणू काही ते तारे तारकांचे पुंजके भगवान बुद्धाच्या चरणी अर्पण केले जात होते…डोळे विस्फारून मन भरून तो नजारा डोळ्यात साचवून, मनात छापून घेतला आणि फोटोला सुरुवात केली…
मनसोक्त हवे तसे फोटो घेतले…हव्या तशा अँगलचे , वेगवेगळ्या पोझिशन मधून, वेगवेगळ्या कॅमेरासेटिंगचे असंख्य फोटो घेतले…बराच वेळ झाला होता…मला वाटतं रात्रीचे दोन-तीन वाजले असावेत, आम्ही पुन्हा आमच्या राहण्याच्या ठिकाणी निघालो…पावलापावलावर ऑक्सिजनची कमतरता भासतं होती…फोटो काढण्याच्या नादात जाणवलं नाही पण जेव्हा पुन्हा चढत-उतरतं आणि पुन्हा चढतं आमच्या मुक्कामी पोहोचलो तेंव्हा शरीराची हालत प्रचंड खराब झाली होती…शरीरातील प्रत्येक अंगाने असहकार आंदोलन सुरू केले…श्वास लागायला लागला होता…प्रचंड दम लागत होता…डोक्यात कोणीतरी मोठे मोठे घाव घालतंय असं वाटतं होतं…
पायातले बूट कसेबसे काढले आणि आहे त्या अवस्थेत, अंगावरील तशाच कपड्यानीशी अंग बिछान्यावर टाकलं… प्रचंड दम लागायला लागला होता…बराच वेळ गेला तरी श्वास कोंडल्याच जाणवत होतं…साधं एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळल तरी दम लागत होता…झोप येता येतं नव्हती….कधी सकाळ होईल आणि आपण येथून निघू असं झालं होतं पण वेळ जाता जात नव्हती…कोणाला उठवून काही फायदा नव्हता…बरोबर भीमसेनी कापूर होता पण त्याचाही काही परिणाम होत नव्हता…जीव अक्षरशः तळमळतं होता…माणसाचा गुदमरून जीव जाताना नेमकं काय होतं असेल याची कोणाला प्रचीती घ्यायची असेल तर त्याने असे उद्योग जरूर करून पहावेत…
रात्र सरता सरेना…तसाच अर्ध सुन्न अवस्थेत पडून राहिलो…सकाळी उजाडलं…काहीही न करता उठलो…आता पुन्हा गाडीपर्यंत चालतं जाणं गरजेचं होत…कसेबसे पायात शूज चढवले आणि निघालो…एक एक पाऊल अक्षरशः किलो किलोचे भासतं होते…साधारण पन्नास एक मीटर अंतर चालायला मला पंधरा ते वीस मिनिटे लागली….गाडीत बसलो आणि मान मागे टाकून बसून राहिलो…
आता आम्ही पुन्हा काजा या आमच्या बेस स्टेशनकडे निघालो होतो…खाली जाऊन मगच काय ते होऊ शकत होतं…भीमसेनी कापूर नाकासमोर धरून चुपचाप बसून राहिलो…हा कापूर ऑक्सिजनच्या कमतरतेवर बऱ्यापैकी कामाला येतो…हिमालयात जाणाऱ्या लोकांनी हा नेहमी बरोबर ठेवावा…या आधीच्या लडाख मधल्या प्रवासाचा मला अनुभव असल्याने यावेळी मी सावध होतो…जसे आम्ही खाली यायला लागलो तसे ऑक्सिजनचे वातावरणातील प्रमाण वाढायला लागले आणि श्वासा मागून श्वासात ऑक्सिजन शरीराला मिळायला लागला आणि मग बरे वाटायला लागले…
तुम्हाला सांगतो या हिरव्या झाडांचे महत्व तिथे गेल्यावर अशा अवस्थेत चांगले समजते…जसजसे आपण वरवर जातो तसतसे झाडी कमी कमी होतं जातात आणि जी काही थोडी फार असतात त्यांची उंचीही कमी कमी होतं जाते…सर्वात उंचावर तर अतिशय तुटक विरळ आणि तेही जमिनीला धरून पसरलेली छोट्या छोट्या झुडुपासारखी जेमतेम अर्धा इंच उंचीची झुडूप दिसतात…जसजसे आपण उंचावरून खाली प्रवास करू लागतो तसतसे या झाडांची उंचीही वाढलेली दिसून येते…खालच्या भागात आलो…जरा उंच झाडे दिसू लागली…शरीराला ऑक्सिजन जरा मुबलक मिळू लागला तसं बरं वाटायला लागलं…आणि मग मेंदू भानावर यायला लागला…तुम्हाला सांगतो ही ऑक्सिजन कमतरतेमुळे शरीराची होणारी दुरावस्था भयानक असते…
जसजसे वातावरणातील ऑक्सिजन कमी व्हायला लागतो तसतसे आपल्या शरीरात असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी कमी व्हायला लागते…सर्वात आधी डोकं दुखायला लागतं…डोळे बारीक होऊन अंधुक अंधुक बघू लागतात…पुढे पुढे हे प्रमाण वाढत जाऊन डोके प्रचंड दुखायला लागते…डोक्याच्या मागच्या बाजूने कोणी आपला मेंदू खेचून बाहेर ओढतो की काय असा भास होऊ लागतो…प्रचंड दम लागायला सुरुवात होते…जोराचा श्वास लागतो…मोठ्याने धाप लागू लागते…छातीचे ठोके धपाधपा वाढायला लागतात…माधुरीची धकधक विसरून आता आपल्याला आपली स्वतःचीच धकधक नाशिकच्या ढोल सारखी सुस्पष्ट आवाजात ऐकायला येऊ लागते…हातपाय शिथिल पडतात…त्यांच्यात त्राण उरतं नाही…दृष्टिभेद व्हायला सुरू होते…आपण काय बघतोय आणि ते खरंच तसं आहे का? याचा ताळमेळ लागतं नाही…जवळपासच्या अंतराचा अंदाज देखील बांधता येत नाही…चालता चालता मध्येच हेलपटायला होते…तुम्ही साधं झोपून असाल आणि एका अंगावरून दुसऱ्या अंगावर कूस जरी बदललेली तरी जोराचा श्वास लागतो…एक विलक्षण अस्वस्थ आणि गुदमरून जाणारी भावना मनात तयार होते…अशी खूप सारी लक्षण दिसू लागतात…असो
खाली काजा या बेस कॅम्प मध्ये पोहोचलो…तिथेच तात्पुरते एक हॉटेल घेऊन आन्हिक उरकली…आता आम्हाला हा चंद्रताल लेक याठिकाणी जायला निघायचं होतं…तिथला आमचा मुक्काम असाच उघड्या आकाशाखाली तंबूमध्ये होता…संकट आणि भय पिच्छा सोडतं नव्हतं…चंद्रतालचा अनुभव असाच भयावह आणि तितकाच मजेशीर होता…
कुलकर्ण्यांचा ” जाता जाता परत आलेला ” प्रशांत
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.