May 23, 2024
पर्यटन

दूधसागराची साहसकथा!

साधारण अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर एकदाचा तो प्रचंड आणि खराखुरा दुधाचा वाटावा असा दूधसागर साक्षात समोर!!! वैखरी अगदी अभावितपणे म्हणून गेली, बाबा किती भारीये धबधबा आणि सगळ्या कष्टाचे चीज झाले!!! ३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मी एकदाचा त्या दूधसागराला प्रत्यक्ष भेटत होतो.

दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला गेलो होतो. आजकाल प्रत्यक्ष न भेटणारे मित्र फेसबुकवर हमखास भेटतात. अशाच एका विशाल वाघ नामक मित्राच्या पोस्टने दूधसागराचा किडा वळवळला.

दूधसागर… गोव्यातील एक अप्रतिम धबधबा. लहानपणापासून त्याच्याबद्दल ऐकत आलेलो. पण प्रत्येकवेळी ठरवून सुद्धा आमची प्रत्यक्ष गाठभेट होत नव्हती. विशालच्या दूधसागराच्या पार्श्‍वभूमीवर काढलेल्या फोटोंनी आता काही झाले तरी जायचेच हे भक्ती आणि मुलांना अस्मादिकांनी सांगून टाकले.

सकाळी १० वाजता गुगलमॅपवर दूधसागर टॅक्सी स्टॅन्ड टाकून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. फोटो बघून मी विशालला कसे जायचे हे जुजबी विचारले होते आणि त्याने सुद्धा अगदी जुजबी माहिती दिली होती. एकंदर चित्र अगदी सुखकारक असे डोक्यात होते. टॅक्सी स्टॅन्डला जायचे गाडी बुक करायची आणि नदी नाले ओलांडून धबधब्यापाशी जायचे, मजा करायची आणि तसेच पुढे पुणे गाठायचे असा प्रोग्रॅम सेट केलेला होता.

साधारण १२ च्या सुमारास टॅक्सी स्टॅन्ड पाशी पोहोचलो. गुगल अजून ४०० मीटर दाखवत होते पण गाड्यांचा महापूर पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली. तिथेच गाडी पार्क करून आमची वरात निघाली.पुढचे चित्र पाहून एकदम हबकलोच. साधारण ५०० लोक रांगेत उभे. आता काय करायचे?? पण यावेळी दूधसागराला मिठी मारुनच जायचे हे डोक्यात पक्के होते. ही नुसतीच लाईन आहे आणि आधी टोकन घेतलेले अजून ३०० आहेत हे ऐकून गरगरलोच. पण तरी सुद्धा डोक्यात विशालचा दूधसागराच्या पार्श्‍वभूमीचा फोटो!!!!

जवळपास जरा विचारपूस करताच वेगवेगळ्या आॅप्शनची माहिती झाली. डबल पैसे दिले की स्पेशल गाडी वगैरे…. पण दुर्दैवाने आदल्या दिवशी पाऊस पडल्याने त्या दिवशी टोकन घेतलेल्यांना सुद्धा जाता आले नव्हते आणि त्यामुळे आज सर्व कायदेशीर होते. आता परत जाण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून तिथल्याच एका दुकानदाराला काही होईल का असे विचारले. त्याने पण एका मिनिटात प्रथमेश नामक प्राण्याची गाठ घालून दिली. माझ्याकडे २५१ नंबरचा टोकन आहे आणि मी तो द्यायला तयार आहे असे सांगताच डोळ्यासमोर परत दूधसागर!!!

काहीही घासाघीस न करता मी त्याच्याकडून ते टोकन अवाच्या सवा किंमतीला घेतले. पण ही तर अर्धीच लढाई होती. आत्ता चालू असलेला नंबर होता १७५. म्हणजे अजून साधारण १.५-२ तासांची निश्चिती. एकतर तिथला सगळा सावळागोंधळ बघून प्रचंड चिडचिड होत होती. विशालला मनातल्या मनात असंख्य शिव्या घालून झाल्या होत्या. अर्धवट माहिती दिली म्हणून सगळी भडास त्याच्यावर काढून झाली होती. पण तरीही डोक्यात दूधसागराचा फोटो!!!!

साधारण ३ वाजता आम्हाला गाडी अॅलाॅट झाली आणि आमच्या सफरीला सुरुवात झाली. जवळपास एक पुरुष खोल नदीच्या पाण्यातून गाडी गेली आणि हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे याची जाणीव झाली. रोज साधारण १७५ गाड्या या सफरीवर जातात. पण आदल्या दिवशीच्या बॅकलॉगमुळे साधारण ५०० गाड्या सोडायचे नियोजन होते. जंगलातील छोटासा कच्चा रस्ता आणि ५०० बोलेरो गाड्या म्हणजे विचार करा… आदल्या दिवशी झालेल्या पावसाने सगळीकडे चिखल…गोव्यातील प्रचंड उकाडा आणि माझ्या दूधसागराच्या ओढीने हकनाक भरडले गेलेले राधेय आणि वैखरी… कच्च्या रस्त्यावर कशीही आदळआपट करत चालणारी बोलेरो. दरदरून फुटलेला घाम अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा माझ्या समोर मात्र दूधसागरच…

लाईफ सेविंग जॅकेट अगदी सुरुवातीलाच का दिले या मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर या ८ कि. मी. च्या प्रवासाने देऊन टाकले होते. लाईफ सेविंग जॅकेटचा शाॅक अॅब्सॉरबर म्हणून नवीन उपयोग हा प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला न सांगता होत होता आणि समजतही होता.प्रचंड गर्दी मुळे आमच्या ड्रायव्हरने गाडी १ कि. मी. आधीच उभी केली. आणि आता जा पायीपायी असे फर्मान सोडले. तो चिखलातला रस्ता बघून राधेय ने मी येणार नाही असे जाहीर करून टाकले. राधेय नाही म्हणून भक्ती नाही. हे दोघे नाहीत म्हणून वैखरी पण नाही म्हणेल असे मला वाटले. पण ती पक्की बिलंदर. बाबा मी येणारच म्हणून रडायला लागली. मग काय डोक्यावर वैखरी घेऊन अस्मादिक निघाले दूधसागराच्या भेटीला. पर्यावरणाला हानी नको म्हणून पाण्याची बाटली पण बरोबर नाही. लगेच परत येणार म्हणून न घेतलेला गाडीतला प्रचंड फराळ प्रत्येक पावलावर आठवत होता. डोक्यावर वैखरी पोटात प्रचंड कोकलणारे कावळे आणि अशा बिकट परिस्थितीत सुद्धा डोळ्यापुढे दूधसागरच!!!!
वाटेत येणाऱ्या प्रत्येक ओढ्याच्या वेळी वैखरी न चुकता मला नाही जायचे पाण्यात असे म्हणत होती. पण आपण काय बघायला चाललोय तर धबधबा हे पण तेवढेच निरागसपणे सांगत होती.

साधारण अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर एकदाचा तो प्रचंड आणि खराखुरा दुधाचा वाटावा असा दूधसागर साक्षात समोर!!! वैखरी अगदी अभावितपणे म्हणून गेली, बाबा किती भारीये धबधबा आणि सगळ्या कष्टाचे चीज झाले!!! ३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मी एकदाचा त्या दूधसागराला प्रत्यक्ष भेटत होतो. फक्त वैखरी डोक्यावर/कडेवर असल्याने मलाही त्याची गळाभेट काही घेता आली नाही. पण तरीही तो अनुभव हा अवर्णनीयच होता.

साधारण ३ तासात दूधसागर बघून रात्री १० वाजता पुण्यात पोहोचू असा विचार केलेला मी दुपारी १२ ते रात्री ७.३० तिथेच होतो. आणि मुलं बरोबर असताना रात्री प्रवास करायचा नाही हे प्रत्येक वेळी ठरवणारे मी आणि भक्ती, राधेय आणि वैखरी ला घेऊन रात्री २.३० वाजता पुण्यात घरी पोहोचलो.

लेखन – हृषीकेश

Related posts

कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…

बीदरचा किल्ला…

मियामी फ्लोरिडामधील समुद्र किनारे…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406