ज्या खुंटाच्या आधाराने आपणास काही करायचे आहे तो अगोदर हलवून बळकट आहे की नाही ते पाहावे असा व्यावहारिक सल्ला तुकाराम देतात. खूंट घट्ट नसेल तर पुढची प्रक्रिया कशी यशस्वी होणार ? कार्यसिद्धीसाठी मन बळकटपणाची खात्री झाल्यास मग त्याच्या आधाराने जे काही कराल ते उत्तम होईल अशा त्यांचा आग्रह आहे.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
हालवूनि खुंट। आधी करावा बळकट ।।१।।
मग तयाचे आधारे । करणें ते अव बरें ।।२।।
सुख दुःख साहे। हर्षामर्षी भंगा नये ।।3।।
तुका म्हणे जीवें। आधी मरोनि राहावे ।।४।। १२४७
तुकारामांनी कर्मविचार व नीतीधर्म याविषयीची भूमिका सातत्याने मांडली. त्यांच्या कर्मयोग व नीतीविचारांची सांगड अध्यात्मविचारांशी निगडित होती. कारण सामाजिक भानाइतकेच आध्यात्मिक भान जागृत करणे जरुरीचे होते. जे तुकारामांजवळ होते. एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे मानवतावादी सामाजिक दृष्टिकोन या दोहोंवर आधारलेला कर्मयोग व नीतीविचार त्यांनी दिला. कर्मयोग, नीती विचार सक्रियता हा विचार देणाऱ्या तुकारामांनी प्रस्थापित धर्मास विरोध करण्याचे धाडस दाखविले.
सर्वसामान्य माणसांची, भक्तांची नस न् नस ओळखणाऱ्या तुकारामांनी दैववाद निष्क्रियता आणि विषमता या तत्कालीन सामाजिकतेच्या दुष्परिणामांची दखल घेतली. ते दोष बाजूला सारून ज्ञानकर्म भक्तीची शिकवण लोकांपुढे ठेवली. प्रपंच आणि परमार्थाची उचित सांगड घालणान्या तुकारामांनी प्रयत्नवादावर भर तर दिलाच, पण ‘हलवूनि खुंट… असे सांगितले
ज्या खुंटाच्या आधाराने आपणास काही करायचे आहे तो अगोदर हलवून बळकट आहे की नाही ते पाहावे असा व्यावहारिक सल्ला तुकाराम देतात. खूंट घट्ट नसेल तर पुढची प्रक्रिया कशी यशस्वी होणार ? कार्यसिद्धीसाठी मन बळकटपणाची खात्री झाल्यास मग त्याच्या आधाराने जे काही कराल ते उत्तम होईल अशा त्यांचा आग्रह आहे. मन घट्ट असले पाहिजे तर कोणतेही काम चांगले होईल असा या उदाहरणाच्या सहाय्याने त्यांनी सूचना केली. मनाचा निर्धार असेल, ईश्वरावर श्रद्धा असेल तर भक्ती आणि धर्माचरण करणे शक्य आहे. हा अध्यात्म विचार आणि नीती तुकारामांनी सांगितली आहे.
जो अनेक प्रकारची सुख-दुःखे सहन करतो त्याच्या हर्षशोकाने त्याचा मनोभंग होत नाही. समाजामध्ये विषमतेच्या दोषाबरोबर उच्च-नीच भेद कायम असलेल्या तुकारामांचा काळ होता. समाजाची चातुर्वर्ण्य व्यवस्था व कर्मठ मते कायम राहावी म्हणून उच्चवर्णीयांचा धार्मिक दहशत बसवून सामान्यांना गुलाम बनविण्याचा धंदा होतो. हीन, क्षुद्र म्हणवून हिणवण्यातून त्यांची अवहेलना उपहास, हेटाळणी करण्याचा त्याकाळच्या उच्चवर्णीयांनी जणू चंग बांधला होता. त्यामुळे मानसिक छळ, आर्थिक शोषण, भावनिक उद्विमातता यातून संतही सुटले नाहीत. चोखा महार, गोरा कुंभार, सेना न्हावी, विसोबा खेचर, वेश्या कान्होपात्रा, दासी जनाबाई यांच्यासह तुकारामांनाही किती दुःख, कष्ट सोसावे लागते. तुकारामांवर खटला भरण्यात आला आणि सर्वात महत्त्वाचा आरोप वेदांच्या संदर्भातील होता. तुकारामांनी तेही सोसले.
अशा तऱ्हेने आलेल्या कटू अनुभवातून तावून सुलाखून तुकारामांना मान्यता मिळाली ती संतश्रेष्ठ म्हणून युगपुरूष, युगाचा प्रतिनिधी, सतराव्या शतकात आपल्या प्रखर वाणी दुमदुमत ठेवणारे विद्रोही, क्षुद्रातिक्षुद्रांचा जननायक. तुकारामांनी सतराव्या शतकात आपल्या वयाची बेचाळीस वर्षे मानवाच्या आत्मिक आणि सामाजिक कल्याणासाठी खर्च केली. कारण सर्व प्रकारची सुख-दुःखं सहन करतो त्याचा हर्षशोकाने मनोभंग होत नाही हेच सिद्ध करणारा स्वतःचाच अनुभव जणू त्यांनी यातून सांगितला.
तुकारामांनी पूर्णत्वाने जगण्याचाही विचार मांडला. शरीराने नाहीसे होऊन आत्मारूपाने जिवंत जगणे ही अंतिम अवस्था आहे. ब्रह्मरूपाने जगत राहावे ‘मरावे परि। किर्ती रूपी उरावे ।।’ ही उक्ती किती उचित। तुकारामांच्याच नव्हे, अनेक महान महापुरुष, उत्तुंग कामगिरी करणारे, यशाचे शिखर गाठणारे अनेक क्षेत्रांत अतुलनीय यश संपादन करणारे महामानव हे शरीराने या जगातून अनंतात विलीन होतात, मात्र त्यांचे कार्य कर्तृत्व आणि कामगिरी या रूपाने समाजासमोर मार्गदर्शक, प्रबोधनकार म्हणून त्यांचे तेज सतत तेवत राहते. ‘आधी मरीनी मग जगावे’, मरणानंतर माणसाचा चांगुलपणा स्मरणात राहावा, जिवंतपणी उचित, उपकारण व उमदे असेल तर तो स्वर्गवासी झाल्यावर त्याच्यामागे त्याचे गोडवेच गायिले जातील.
साधं उदाहरण म्हणून सासूने सुनेला न छळ करता आपल्या मुलीसारखी माया लावली तर तिच्या निधनानंतर ‘असावी सासु तरी अशी असेच नाव निघेल. वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनात दुसरे काय कमवायचे आहे ? हे कमावणं म्हणजेच देवकार्य होय. भक्ती, ईश्वरसेवा करणाऱ्यांनी अध्यात्म क्षेत्रात सुद्धा निखळ, निरपेक्ष, निर्व्याज वृत्तीने राहिल्यास त्याच्या नावाचा बोलबाला होतो. त्यांच्या नंतरही त्यांची कीर्ती मागे राहते. असेच कार्य पुढे नेण्याचे काम त्यांचे शिष्यही करतात. म्हणून संत ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा, विसोबा खेचर, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई, समर्थ रामदास ही मानवतावादी पुरोगामी विचार देणारी संतमंडळी आजही आपली कार्यरूपी ज्योत तेवत ठेवण्याइतपत सामर्थ्यता, धर्मनीती संस्कृतीची भव्यता, आणि मानवता वृतीचा झेंडा फडकत आहे. तुकाराम महाराज तर विद्रोही, बंडखोर आणि सत्यधर्म पालनातून पुरोगामी, परिवर्तनवादी संत म्हणून वारकरी पंथाच्याही नव्हे सर्वसामान्यांच्या अंतःकरणात वास करीत आहेत. प्रबोधनाच्या चळवळीस पोषक असा पुरोगामी विचार, प्रागतिक दृष्टिकोन महाराष्ट्रात निर्माण करणाऱ्या, तो रुजवण्यासाठी अनन्वित छळ सोसूनही माघार न घेणाऱ्या संतश्रेष्ठ तुकारामांच्या विचारांना मरण नाही तर चिरकाल स्थरण ठेवावेच लागेल. म्हणून त्यांनी अभंगरूपातून मांडलेले विचार कीर्तन, प्रवचन, भजन तसेच व्याख्यान, लेखन व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधून सतत समाजासमोर येणे आवश्यक आहे. आजच्या पिढीला तर त्याची फार गरज आहे.
ढेकणांचे संगे हिरा जो भंगला । कुसंगे नाडला तैसा साधु ।।धृ।।
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.