May 23, 2024
Mahakaleshwar Coridor Ujjayani Prashant Satpute article
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

केवळ..विस्मयकारक..विलोभनीय..श्री महाकालेश्वर कॉरीडॉर..!

एकमेव दक्षिणमुखी असणारे अन् बारा जोतिर्लिंगांमधील एक असे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर ! ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५० कोटी खर्चून ९२० मीटर लांब असलेल्या ‘कॉरीडॉर’ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. पाहताचक्षणी ‘केवळ..विस्मयकारक’ उद्गार निघावेत असे हे विलोभनीय कॉरीडॉर लवकरच जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळ बनेल यात शंका नाही..!

प्रशांत सातपुते

इंदोर येथून अवघ्या अर्धा-पाऊणतासाच्या अंतरावर असणाऱ्या ‘सम्राट विक्रमादित्या’ची राजधानी असणाऱ्या उज्जैनला श्री महाकालेश्वर मंदीर आहे. उज्जयनी ही एक ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिप्राचीन नगरी आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या उज्जयनीचे आज उज्जैन नामकरण झाले. भगवज्जिनसेनाचार्य कृत ‘आदिपुराण’ मध्ये भगवान ऋषभदेव यांनी भारताला ५२ जनपदांमध्ये अर्थातच जिल्ह्यात विभाजित केले होते. त्यामध्ये ‘अवंती’ हा एक होता. प्राचीन काळात अवंतीची राजधानी उज्जयनी होती. सातव्या-आठव्या शतकात अवंतीचे नाव मालवा झाले.

सिंहासन बत्तीशीमधीलच राजा सम्राट विक्रमादित्याची हीच ती राजधानी.. उज्जैन. आजही ‘विक्रमादित्य का टिला’ येथे ३२ मुर्त्यांची शिल्पे उभारण्यात आली आहेत. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे गुरु ऋषी सांदीपनी यांचा आश्रमही आहे. उज्जैन नगरी ही क्षिप्रा नदीच्या काठावर वसली आहे. रुद्रसागर तलावाच्या काठावर हा मंदिर परिसर विस्तारलेला आहे. अगदी महामार्गालगतच असणाऱ्या भव्य असे उभारण्यात आलेल्या नंदीद्वारपासून याच्या दिव्यतेची प्रचिती येते.

राजस्थानमधून खास यासाठी मागवण्यात आलेल्या सॅण्डस्टोनमध्ये ही सर्व कल्पकता आखीव-रेखीव उभारण्यात आली आहे. ३० फूट उंच भिंतीवर शिवपुराणातील अनेक प्रसंग कोरण्यात आली आहेत. हे कोरीव काम पुरातन काळात केले असावे, अशा कल्पक शैलीचा आणि कलाकुसरीचा वापर यात करण्यात आला आहे. त्या खाली संस्कृतमधील श्लोक ठसावदारपणे उमटवण्यात आले आहेत. या श्लोकांचा अर्थ समजावून घेण्यासाठी यावर ‘क्यू आर’ कोड स्थापित करण्यात येणार आहे. जेणेकरुन हा भ्रमणध्वनीच्या सहाय्याने तपासून निरखल्यास तो प्रसंग चित्रफितीद्वारे पडद्यावर पाहता येणार आहे. यावर अत्यंत सुंदर पद्धतीने प्रकाश झोत टाकण्यात आलाय, त्यासाठी सौर प्रकाश यंत्रणा उभी करण्यात आलीय. ४५० वाहनांकरिता उभारण्यात आलेल्या तळावर सौर पॕनेल बसवण्यात आली आहेत.

मध्यभागी उभारण्यात आलेल्या १०८ स्तंभांवर शिवाच्या तांडवनृत्यांमधील अद्भूत प्रसंग कोरलेली आहेत. सप्तऋषी मंडळ, समुद्र मंथन प्रसंगाचा मूर्तीस्वरुप देखावा, नवगृह मंडळ, शिवचरित्र जीवनपट कथासार, खंडोबा रुपातील भव्य मूर्ती, कमलकुंडातील ध्यानस्त शिवमूर्ती, कारंजे, प्रकाशामधील कारंजे, ध्वनी-प्रकाश देखाव्यासाठी खुले सभागृह याचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

नंदीद्वार, पिनाकद्वार आणि महाकालद्वार असे तीन द्वार आहेत. हा भारावून टाकणारा परिसर पाहतानाच, पर्यटकांसाठी जागोजागी बैठक व्यवस्था, विस्तीर्ण अशी स्वतंत्रपणे खुली बैठक व्यवस्था, कॅफे-कॅण्टीन, सुविधा केंद्र, शिवाला आवडणारे आणि महत्त्व असणारे वृक्षरोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरीवरील वाहनाची सोयही हे सारंच मनाला भारावून टाकणारे आहे.

पहिल्या टप्प्यातील हे कॉरीडॉर पर्यटक-भक्तगणांसाठी खुले करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरु आहे. हा परिसर न्याहाळताना आपण कधी हरपून जातोय हे कळत नाही. भारावलेला हा इतका परिसर चालूनही दमल्याची जाणीव होत नाही. उलट त्यानंतरही कित्येक वेळ आपण त्यातच गुंगून गेलेलो असतोय, याची अनुभुती येणारा प्रत्येकजण घेतोय. निश्चितपणे हे एक जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र ठरेल.

महाकालेश्वर भस्मारती..

महाकालेश्वरच्या भस्मारतीला पहाटे ४ वा. सुरुवात होते. शिवाय दररोजच्या भस्मारतीला ताजे भस्म लागते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्मशानभूमीतील चितेची राख कपालिकाद्वारे वापरली जात होती. जसजशी सुत्रे कपालिकांकडून नव्या पुजाऱ्यांकडे आलीत, तसे हे भस्म गाईच्या शेणाकुटापासून आणि सुगंधी, औषधी वनस्पतींपासून हे भस्म सध्या बनविले जाते. कपड्यातून चाळून या भस्माचा वापर दररोज ब्रह्मपर्वावर होणाऱ्या आरतीसाठी वापरले जाते.

सर्व देवी-देवतांच्या अंगावर भरजरी वस्त्रे, रत्नजडीत मौल्यवान धातूचे अलंकार आहेत. परंतु, जटाधारी, देवांचा देव, आदिदेव महादेव हा केवळ व्याघ्रचर्म आणि अंगावर भस्म लेवून तल्लीन आहे. प्रकृती आणि पुरुष यांचे प्रतीक असणारे शिवलिंग हे मानवी जीवनाचे आत्मलिंग द्योतक आहे. तेही अगदी साधेपणात सामावलेले. यातून विचार करण्यापेक्षा आचरण करा हाच प्रमुख संदेश उचलायला काय हरकत आहे. !

Related posts

दहीहंडी

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची नारंगी छटा…

साखर निर्यातीत 291 टक्क्यांनी वाढ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406