निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच एक भाग आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मानवनिर्मित यंत्रांनी निसर्गचक्र मोडले आहे. मानवाला थांबायला वेळ नाही. थांबला तो संपला हे पक्के त्याच्या मनात रुजल्याने तो थांबायला तयारच नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणे सदा ।। 865 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे. शत्रुला कधीही पाठ न दाखविणे.
सुर्यफुलाचे झाड हे नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. उन्हाळ्यात उन्हाची दाहकता प्रचंड असते. या उन्हामध्ये काही काळ उभे राहणेही शक्य होत नाही. सूर्यफूल मात्र यामध्ये दिवस-रात्र उभे असते. त्याच्या दाहकतेचा फुलाच्या पाकळ्यावर किंचितही परिणाम दिसून येत नाही. पिवळ्या धम्मक पाकळ्या उन्हाच्या तीव्रतेतही तितक्याच ताज्यातवान्या असतात. असे सामर्थ्य आपल्या अंगात असायला हवे. शेतकरीही या आदित्याच्या झाडाप्रमाणेच काटक असतो. ऊन नाही म्हणत, वारा नाही म्हणत, धो धो पडणारा पाऊस नाही म्हणत, थंडीतही तो असाच राबत असतो. त्याला या सर्वांशी सामना करतच कष्ट करावे लागतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग याप्रमाणे त्याला सदैव जागरूक राहावे लागते. वेळ चुकवून चालत नाही.
जवान जसा युद्धभूमीवर पहारा देत असतो. तसा शेतकरीही शेतात असेच राबत असतो. कामात कुचराई करून चालत नाही. दोघांचे जीवनही सारखेच आहे. कष्टाचे व सदैव जागरूकतेचे आहे. इतके कष्ट करूनही हाती काय मिळेल याची अपेक्षा शेतकरी कधीही ठेवत नाही. मिळाले ते निसर्गाने दिले, देवाने दिले या भावनेने तो त्याचा स्वीकार करतो. यंदा कमी उत्पादन मिळाले पुढच्या वर्षी भरभरून मिळेल अशा आशेने तो राबत राहतो. कमी मिळाले म्हणून तो खचून जात नाही.
सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत माणसांची वैचारिक बैठकही विस्कळित झाली आहे. धावपळीच्या जगात झटपट उत्तरे हवी आहेत. सकाळी पेरणी केली की संध्याकाळी त्याचे उत्पन्न हवे असते. पण शेतीमध्ये तसे होत नाही. धीर धरावा लागतो. हा धीर कोणालाच धरवेनासा झाला आहे. यामुळे पिकाचा कालावधी कमी करून जास्तीत जास्त पिके कधी घेता येतील यावर अधिक भर दिला जात आहे. बदलत्या काळात याची गरजही आहे. पण याला मर्यादा आहेत. निसर्गाच्या नियमापुढे नतमस्तक हे व्हावेच लागते.
निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच एक भाग आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मानवनिर्मित यंत्रांनी निसर्गचक्र मोडले आहे. मानवाला थांबायला वेळ नाही. थांबला तो संपला हे पक्के त्याच्या मनात रुजल्याने तो थांबायला तयारच नाही. झटपट निर्णयामुळे त्याची मानसिकताही तशीच झाली आहे. स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार तो झटक्यात करू लागला आहे. केव्हा जीवन संपवेल याचा नेम नाही. सुखाच्या शोधात तो दुःखाच्या गर्तेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागे हीच कारणे आहेत. धीर सुटल्यानेच त्याची ही अवस्था झाली आहे.
घाईगडबडीच्या या जीवनात धीराची गरज आहे. यासाठी चांगल्या सवयी अंगी जोपासायला हव्यात. मनाला सवयी लावल्यावर चुका होणार नाहीत. नियम करून बऱ्याचदा तो मोडल्याने मानसिकता ढळू शकते. याचसाठी नियमाऐवजी मनाला सवयी कशा लागतील यावर विचार करायला हवा. नियमाने बोजड वाटते. नियम नकोसे वाटतात. पण मनाला सवय लावली तर नियमाची गरजच वाटणार नाही. आज चांगले वागायचे. आज खूप काम करायचे. आजपासून चुका करायच्या नाहीत असा मनाचा दृढनिश्चय केला तर चुका होणार नाहीत. यासाठीच मनामध्ये हा संकल्प करायला हवा.
मानसिक तयारी करायला हवी. शेतकऱ्याची कष्ट करण्याची मानसिक तयारी असते. कार्यालयात काम करणारी व्यक्ती नियमात काम करत असते. नियमाने कामावर जाणे. नियमाने काम करणे. नियमाने काम वेळेत पूर्ण करणे. काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. या भीतीने तो काम करत असतो. बऱ्याचदा त्याला मनाविरुद्ध काम करावे लागते. नियमांचे उल्लंघन करून चालत नाही. शेती करताना नियमापेक्षा कामाची सवय असावी लागते. मारून मुरगटून, जबरदस्तीने येथे काम होत नाही. कष्टाची सवय असावी लागते. आदित्याच्या झाडाप्रमाणे समोरच्या परिस्थितीशी सामना करावा लागतो.शेतीत शास्त्राचे नियम असतात. शास्त्रोक्त नियम हे पाळावेच लागतात. आळस हा शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. शेतातील तण काढण्यास आळस केला तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. कामात आळस करून चालत नाही.
शेतकऱ्यांचे जसे जीवन आहे तसेच आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या साधकाचे आहे. साधकासही सदैव जागरूक राहावे लागते. साधनेत मन विचलित होणार नाही. मन भरकटणार नाही. यासाठी जागरूक राहावे लागते. मन भरकटले तर वासनांच्या, विषयांच्या माऱ्याला साधक बळी पडतो. साधनेचे ते शत्रू आहेत. साधनेत मन रमावे यासाठी त्याला मनावर नियंत्रण ठेवावे लागते. यासाठी काही नियम त्याला पाळावे लागतात. काही नियम हे तयार करावे लागतात. नियमनाने सवय लागते. मनाला या नियमांची सवय व्हावी लागते. मनाची तशी तयारी व्हावी लागते. साधनेतील सोऽहमचा नाद मनाने ऐकण्याची सवय लावावी लागते. कधी चार ते पाच वेळाच ऐकले जाते. तर कधी एकदाच ऐकला जातो. आता हा स्वर सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. सद्गुरू हा स्वर सतत ऐकत असतात. चालता-बोलता हा स्वर त्यांच्या मनाने ते ऐकत असतात. हा स्वर सतत ऐकायला यावा यासाठी ही सवय लावावी लागते. मन त्यातच रमवावे लागते. एकदा तो स्वर ऐकण्याची सवय लागली की मन आपोआप त्यामध्ये रमते. आज चार स्वर ऐकले उद्या दहा परवा पंधरा ठरवा एक माळ अशी माळांची संख्या वाढवावी लागते. हळूहळू माळ ओढण्याचीही गरज पडत नाही. मोजत बसण्याचीही गरज लागत नाही. ती सवय होऊन जाते. स्वर सदैव ऐकू येऊ लागतो. ही अवस्था साधकाला प्राप्त होते. तेव्हा तो आत्मज्ञानाचा स्वीकार करण्यास योग्य होतो. त्याला उचित फळ प्राप्त होते.
शेतकऱ्याप्रमाणे मात्र कष्टात राहावे लागते. स्वर ऐकण्याचे कष्ट करावे लागतात. या स्वरात राहिल्यानंतर कष्ट कमी होतात. शहाणा शेतकरी या स्वरात राहतो. नांदतो. त्याला कष्ट पडत नाहीत. तो स्वरांच्या मागे धावतो. काम होत जाते. संसार होत जातो. स्वर ऐकण्याच्या नादात केलेल्या कष्टाचा विसर पडतो. अंगाला कष्टाची सवय लागते. मनाला स्वर ऐकण्याची सवय लागते. यातच त्या शेतकऱ्याचा आत्मज्ञानाचा मळा फुलतो. बहरतो. त्यातूनच ज्ञानाचा सुवास दरवळतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.